Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर एक विकेट राखून थरारक विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद पुन्हा एकदा आपल्या नावावर केले.
Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक
Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायकX| BCCI
Published on: 

अल अमेरात (ओमान): शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर एक विकेट राखून थरारक विजय मिळवत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद पुन्हा एकदा आपल्या नावावर केले.

मोहित उल्वा (२६ चेंडूंत नाबाद ४९ धावा) भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. १ चेंडूत ३ धावांची गरज असताना मोहितनेच चौकार लगावला. भारताने विक्रमी नवव्यांदा आशिया चषक जिंकला, हे विशेष, पाकिस्तानने विजयासाठी दिलेले ३३८ धावांचे विशाल लक्ष्य भारताने नऊ विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

लक्ष्य रायचंदानीच्या नेतृत्वात आणि ऋषिकेश कानिटकर यांच्या प्रशिक्षणाखाली भारताला साखळी फेरीत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. अंतिम लढतीतही पाकिस्तानचेच पारडे जड दिसत होते. ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था ४२व्या षटकात २५२ धावांवर आठ बाद अशी बिकट झाली होती. अशा वेळी मानल चौहान (४७ धावा, ३२ चेंडू) आणि मोहित यांनी नवव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मानल बाद झाल्यानंतर भारताला विजयासाठी ३६ धावांची गरज होती आणि हातात केवळ एक विकेट शिल्लक होती.

मात्र, मोहितने हार न मानता अकराव्या क्रमांकावरील सी. व्यंकटाला (नाबाद ११ धावा, ८ चेंडू) सोबत घेत विजयासाठी प्रयत्न सुरू ठेवले. शेवटच्या षटकात भारताला आठ धावांची आवश्यकता होती. अखेर सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला. विजयासाठी तीन धावांची गरज असताना मोहितने पाकिस्तानचा लेगस्पिनर अहमद हुसेनच्या चेंडूवर लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत चौकार ठोकला आणि भारताच्या नवव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

रायचंदानी आणि सेहवाग यांची दमदार सुरुवात

भारताचा कर्णधार लक्ष्य रायचंदानीने ८० धावांची, तर आर्यवीर सेहवागने ५८ धावांची खेळी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी करत भारताला भक्कम सुरुवात करून दिली. मात्र, सेहवाग बाद झाल्यानंतर रायचंदानी आणि अन्वय द्रविड (१९) हेदेखील लागोपाठ बाद झाले. त्यामुळे भारत अडचणीत सापडला. त्यानंतर खालच्या फळीतील फलंदाजांनी संयम आणि धाडस दाखवत विजय खेचून आणला. त्यामुळे भारताने एकच जल्लोष केला.

उस्मानचे शानदार शतक

तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना नऊ विकेट्स गमावून ३३७ धावा केल्या. सलामीवीर उस्मान खानने १०७ धावांची संयमी आणि शानदार खेळी केली. त्याने अब्दुल कादिरसोबत दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या १८ षटकांत १३५ धावांची भागीदारी केली.

कादिरने ५४ चेंडूंत ८० धावा फटकावत भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने ३९ चेंडूंत पहिले युवा एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार फरहान युसूफनेही ६० धावांचे योगदान दिले. भारताकडून काव्या पटेलने ६८ धावांत चार, तर सी. व्यंकटाने ४० धावांत तीन विकेट्स घेतल्या. मात्र, पाकिस्तानने उभारलेले मोठे आव्हान पार करत भारतीय युवा संघाने अंतिम क्षणी विजय मिळवून आशिया चषकावर पुन्हा आपले नाव कोरले.

आजचा दिवस माझा - मोहित

भारताला एका विकेटने थरारक विजय मिळवून देणारा युवा फलंदाज मोहित उल्वा याने आपल्याला स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. कठीण परिस्थितीतही लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून संघाला विजय मिळवून देण्याचा विश्वास मनात होता, असे त्याने सांगितले.

सामन्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात उल्वा म्हणाला, "शेवटच्या षटकात माझा देवावर विश्वास होता. मी स्वतःला अष्टपैलू खेळाडू मानतो. ही स्पर्धा माझ्यासाठी फारशी चांगली गेली नव्हती; मात्र आजच्या दिवशी मी नक्कीच चांगली कामगिरी करू शकेन, असा मला विश्वास होता."

"आजचा दिवस माझाच आहे आणि मी माझ्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणार, हे मला माहीत होते. १० क्रमांक माझ्यासाठी नेहमीच भाग्यवान ठरला आहे. माझ्या धावा याच क्रमांकावर फलंदाजी करताना आल्या आहेत," असेही त्याने सांगितले. त्याने कठीण प्रसंगी साथ दिल्याबद्दल मानलचे आभार मानले.

आर्यवीर सेहवाग स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

भारताचा सलामीवीर आर्यवीर सेहवागने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या कोपराला दुखापत झाली होती; मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करत फलंदाजी सुरू ठेवली. सेहवाग म्हणाला, "आता माझ्या हातात कोणतीही वेदना जाणवत नाही. मी जे पाहिले त्यावर अजूनही विश्वास बसत नाही. अंगावर रोमांच उभे राहत आहेत. भारत-पाकिस्तान सामना असला की भावना नेहमीच तीव्र असतात. मागील सामन्यात मी पाकिस्तानविरुद्ध लवकर बाद झालो होतो. त्यामुळे आज दुखापत झाली तरी धावा करण्याचा निर्धार केला होता. मैदानावर टिकून राहिल्याने पाकिस्तानवर दबाव राहील, हे मला माहीत होते." सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल सेहवागला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. त्याने ५ सामन्यांत ३ अर्धशतके व १ शतकासह ३६१ धावा फटकावल्या.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)