
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी भारताच्या २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपदासाठी बोलीला मंजुरी दिली. जागतिक दर्जाची स्टेडियम्स, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि उत्साही क्रीडा संस्कृती" असल्यामुळे अहमदाबाद हा 'आदर्श' यजमान ठरेल, असे मंत्रिमंडळाने म्हटले आहे.
हा निर्णय भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने या महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या मान्यतेनंतर आणि मार्चमध्ये दाखल केलेल्या 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' नंतर घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' साठी बोली अर्ज करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. याशिवाय, संबंधित मंत्रालये, विभाग व प्राधिकरणांकडून आवश्यक हमीपत्रांसह होस्ट कोलॅबोरेशन करार करण्यास, तसेच बोली स्वीकृत झाल्यास गुजरात सरकारला आवश्यक अनुदान देण्यासही मंत्रिमंडळाने संमती दिली आहे.
या स्पर्धांसाठी बोली अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन येत्या ४८ तासांत औपचारिकता पूर्ण करणार आहे. भारताने यापूर्वी २०१० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते.
कॉमनवेल्थ स्पोर्ट्सच्या महासभेत यजमान देशाचा निर्णय नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात ग्लासगो येथे होणार आहे. कॅनडाने खर्चामुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताची संधी अधिक वाढली आहे.
अहमदाबाद हे जागतिक दर्जाची स्टेडियम्स, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि समृद्ध क्रीडा संस्कृती असलेले आदर्श यजमान शहर आहे. जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी स्टेडियमने आधीच २०२३ क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना यशस्वीरीत्या आयोजित करून आपली क्षमता सिद्ध केली आहे," असे निवेदनात नमूद आहे.
भारत २०३६ ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन करण्याचाही प्रयत्न करत असून त्यासाठीही अहमदाबाद हे अग्रणी यजमान शहर मानले जात आहे. त्यासाठी शहरातील क्रीडा पायाभूत सुविधा उन्नत केल्या जात आहेत.
सध्या बांधकामाधीन सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह हे प्रमुख ठिकाण ठरणार असून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त या प्रकल्पात जलक्रीडा केंद्र, फुटबॉल स्टेडियम आणि दोन इनडोअर अरेना यांचा समावेश आहे.
७२ देशांतील खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेतात आणि सरकारच्या मते या आयोजनामुळे "स्थानिक व्यवसायांना फायदा होईल व महसूल निर्माण होईल."
"क्रीडाबाहेरही, भारतात कॉमनवेल्थ खेळांचे आयोजन झाल्यास पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील आणि कोट्यवधी तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल. तसेच, स्पोर्ट्स सायन्स, इव्हेंट ऑपरेशन्स आणि मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स व ट्रान्सपोर्ट, ब्रॉडकास्ट आणि मीडिया, आयटी व कम्युनिकेशन्स, पब्लिक रिलेशन्स यांसारख्या क्षेत्रांत व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होतील," असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.