

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी रविवारची मध्यरात्र आणि सोमवारचा दिवस शुभदायी ठरला. भारताच्या तीन बॉक्सर्सनी आपापल्या लढती जिंकताना उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. यामध्ये जादुमणी सिंगने पाकिस्तानी प्रतिस्पर्ध्याला सहज नमवल्याने त्याची चर्चा अधिक आहे. त्याशिवाय अंकुश पंघाल, सचिन सिवाच यांनी आगेकूच केली.
एसईसी सेंटरमध्ये झालेल्या पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटातील राऊंड ऑफ १६ लढतीत जादुमणीने पाकिस्तानच्या सुमामा रहमानचा उत्कृष्ट तंत्र, वेग आणि रिंगक्राफ्टच्या जोरावर ५-० असा फडशा पाडला. कारगिल विजय दिनानिमित्त हा विजय कारगिलच्या वीरांना समर्पित करत, सर्वांचा पराभव करून भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याचा मानस त्याने व्यक्त केला. पहिल्या फेरीत प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेतल्यानंतर जादुमणीने सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले. दुसऱ्या फेरीत त्याच्याण कडक उजव्या हाताच्या ठोशाने पंचांना रहमानसाठी स्टँडिंग काऊंट द्यावा लागला. या विजयामुळे तो पदकापासून अवघा एक विजय दूर आहे.
त्याशिवाय पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात २६ वर्षीय सचिनने सुरेख कामगिरी करत इंग्लंडच्या विल्यम ह्युईटवर ४-१ अशी मात केली. पाचपैकी चार पंचांनी सचिनच्या बाजूने २९-२७ असा निकाल दिला, तर एका पंचाने ह्युईटच्या बाजूने २९-२७ असे गुण दिले. सचिनने तिन्ही फेऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला. अंतिम फेरीत गुण कपात झाल्यानंतरही सचिनने आपला विजय निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत सचिनचा सामना बोत्स्वानाच्या ट्रेझर मोरेमीशी होणार आहे. मोरेमीने लेसोथोच्या टॉक लिटाबेचा ३-२ असा पराभव केला आहे.
पुरुषांच्या ८० किलो गटात हरयाणाच्या २० वर्षीय अंकुशने अँटिग्वा आणि बारबुडाच्या जॅन झालानचा ५-० असा धुव्वा उडवला. आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खेळणाऱ्या अंकुशलाही आता पदकासाठी केवळ एका विजयाची गरज आहे. बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरीत दाखल झाल्यावर किमान कांस्यपदक पक्के होते.
महिलांमध्ये प्रीतीची आगेकूच
महिलांमध्ये ५४ किलो वजनी गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या प्रीती पवारनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तिने मालावीच्या डेबोराह मतेंजे हिचा दुसऱ्या फेरीत रेफ्री स्टॉप कॉन्टेस्ट (आरएससी) नियमाने पराभव केला. प्रीतीने पहिल्या फेरीपासून सामन्यावर पकड मिळवली होती. पहिल्या फेरीत पाचही पंचांचे मत तिच्या बाजूने राहिले. दुसऱ्या फेरीत सामना थांबवण्यापूर्वी मालावीच्या बॉक्सरला दोनदा स्टँडिंग काऊंटचा सामना करावा लागला. प्रीतीही तिचे पहिले राष्ट्रकुल पदक सुरक्षित करण्यापासून एक विजय दूर आहे.