
विजयासाठी ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी ४८ धावांची सलामी दिली; पण त्यानंतर भारताने आपले तीन गडी झटपट गमावले.
शिखर धवन सहाव्या षट्कात बाद झाला. रोमरिओ शेफर्डने त्याला काईल मेयर्सच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. शिखरने ३१ चेंडूंत १३ धावा केल्या. त्यानंतर शुभमन (४९ चेंडूंत ४३) लयीत असतानाच मेयर्सने स्वत:च्याच गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. सूर्यकुमार यादवला (८ चेंडूंत ९) फार काही करता आले नाही. अठराव्या षट्कात मेयर्सने त्याचा त्रिफळा उडविला. भारताची अवस्था ३ बाद ७९ अशी झाली.
त्यानंतर श्रेयस अय्यर (७१ चेंडूंत ६३) आणि संजू सॅमसन (५१ चेंडूंत ५४) यांनी ९९ धावांची बहुमोल भागीदारी केली. दोघांच्या अर्धशतकी खेळींनी भारताच्या विजयाच्या अपेक्षा पल्लवित ठेवल्या. श्रेयसला ३३व्या षट्कात अल्झारी जोसेफने पायचीत केले. त्यानंतर संजू ३९व्या षट्कात धावबाद झाला. भारताची अवस्था पाच बाद २०५ अशी झाली. भारताच्या हातून सामना निसटण्याची शक्यता वाटत असतानाच दीपक हुडा (३६ चेंडूंत ३३) आणि अक्षर पटेल (३५ चेंडूंत ६४) यांनी आपला निर्धार कायम ठेवला. हुडा ४५व्या षट्काच्या पहिल्या चेंडूवर बाद झाला. अकील हुसेनच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल हेडन वॉल्शने टिपला. शार्दूल ठाकूर (६ चेंडूंत ३), आवेश खान (१२ चेंडूंत १०) हे झटपट बाद झाल्यानंतही अक्षर पटेलने आशा कायम ठेवत धमाकेदार खेळी करून सामना शेवटच्या षट्कापर्यंत पोहोचविला.
भारताला शेवटच्या षट्कामध्ये विजयासाठी आठ धावांची आवश्यकता होती. पटेलने शेवटच्या षट्कातील चौथ्या चेंडूवर षट्कार खेचून भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३५ चेंडूंत नाबाद ६४ धावा करताना तीन चौकार आणि पाच षट्कार लगावले. त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. कायले मेयर्स आणि शाय होप यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ चेंडूंत ६५ धावांची भागीदारी केली. दहाव्या षट्कातील पहिल्या चेंडूवर मेयर्सचा (२३ चेंडूत ३९ धावा) झेल हुडाने स्वत:च्याच गोलंदाजीवर टिपून त्याला चालते केले. त्यानंतर ब्रुक्स आणि होप यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. ब्रुक्सला २२व्या षट्कात अक्षर पटेलने धवनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. ३६ चेंडूंत ३५ धावा करून तो बाद झाला.
ब्रँडन किंगला भोपळाही फोडता आला नाही. युजवेंद्र चहलने त्याला धवनच्या हाती सोपविले. त्यांनतर शाय होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. ४४व्या षट्कात पूरन (७७ चेंडूत ७४ धावा) धडाकेबाज खेळी करून बाद झाला. या दरम्यान, शाय होपने आपले शतक पूर्ण केले. त्याने १३५ चेंडूत ११५ धावा केल्या. भारताच्या शार्दूल ठाकूरने ५४ धावांच्या तीन बळी टिपले. दीपक हुडा, अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.