
नवी दिल्ली : दिवाळीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय क्रिकेट संघाने मंगळवारी वेस्ट इंडिजचे साफसफाई अभियान पूर्ण केले. उभय संघांतील दुसऱ्या कसोटीत भारताने विंडीजला ३ गडी राखून पराभूत केले आणि मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने प्रथमच कसोटी मालिका जिंकली, तर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारताचा हा दुसराच (विरुद्ध बांगलादेश, २०२४) मालिका विजय ठरला. याबरोबरच भारताने गंभीरला ४४व्या वाढदिवशी विजयाची भेट दिली.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) झालेल्या या कसोटीत मंगळवारी पाचव्या दिवशी विंडीजने दिलेले १२१ धावांचे लक्ष्य भारताने ३५.२ षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. ६ चौकार व २ षटकारांसह १०८ चेंडूंत नाबाद ५८ धावा करणाऱ्या के. एल. राहुलने विजयी चौकार लगावला. ध्रुव जुरेल त्यावेळी ६ धावांवर नाबाद होता. लढतीत एकूण आठ बळी घेणारा चायनामन फिरकीपटू कुलदीप सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला, तर २ सामन्यांत १०४ धावा करण्यासह ८ गडी टिपणारा डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याबरोबरच विंडीजचा भारत दौरा समाप्त झाला असून आता १९ ऑक्टोबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ होईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ एकदिवसीय व ५ टी-२० सामने होणार आहेत.
भारतीय संघाने सप्टेंबरमध्ये दुबईत आशिया चषक टी-२० स्पर्धा विक्रमी नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर आता २५ वर्षीय गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात प्रथमच कसोटी मालिका खेळत होता. भारताने ऑगस्ट महिन्यात इंग्लंडला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत २-२ असे बरोबरीत रोखले. मायदेशात २०२४मध्ये झालेल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने आपल्याला ३-० अशी धूळ चारली होती. त्यामुळे गिल सेनेपुढे मायदेशात पुन्हा कसोटी मालिका विजयाची परंपरा सुरू करण्याचे आव्हान होते. त्याच्या नेतृत्वात भारताने विंडीजचा पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांच्या फरकाने धुव्वा उडवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या कसोटीत मात्र विंडीजने भारताला पाचव्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करण्यास भाग पाडले.
तत्पूर्वी, उभय संघांतील दुसऱ्या कसोटीत प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला. यशस्वी जैस्वाल व गिल यांनी भारताकडून शतके झळकावली. मग विंडीजचा पहिला डाव भारताने २४८ धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोऑन लादला. २७० धावांनी पिछाडीवर असूनही दुसऱ्या डावात मात्र विंडीजने कडवा प्रतिकार केला. जॉन कॅम्पबेल व शाय होप यांच्या शतकांमुळे विंडीजने ३९० धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. चौथ्या दिवसअखेर मग भारताने १ बाद ६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना मंगळवारी पाचव्या दिवशी विजयासाठी फक्त ५८ धावांची गरज होती.
राहुल व सुदर्शन यांनी १ बाद ६३ वरून पाचव्या दिवसाला प्रारंभ करताना भारताला झटपट विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. राहुलने कसोटीतील २०वे अर्धशतक साकारले. मात्र सुदर्शन ३९ धावांवर चेसचा शिकार ठरला. त्याने राहुलसह दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भर घातली. कर्णधार गिलने १ चौकार-षटकार लगावून आक्रमण केले. मात्र चेसच्याच गोलंदाजीवर जस्टिन ग्रीव्ह्सने त्याचा अफलातून झेल टिपला. गिलने १५ चेंडूंत १३ धावा केल्या. अखेरीस जुरेलने षटकार लगावून भारताला विजयासमीप नेले. मग राहुलने जोमेल वॉरिकन टाकत असलेल्या ३६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
भारत (पहिला डाव) : ५ बाद ५१८ (डाव घोषित)
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : सर्व बाद २४८
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : सर्व बाद ३९०
भारत (दुसरा डाव) : ३५.२ षटकांत ३ बाद १२४ (के. एल. राहुल नाबाद ५८, साई सुदर्शन ३९; रॉस्टन चेस २/३६)
सामनावीर : कुलदीप यादव
मालिकावीर : रवींद्र जडेजा