

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सने शनिवार दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे सर्व देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताने बॉक्सिंगमध्ये ७ सुवर्णपदकांसह एकूण १० पदकांची कमाई केली. त्यामुळे भारताची पदकसंख्याही कमालीची वाढली.
ग्लासगो येथे राष्ट्रकुलचे २३वे पर्व उत्साहात गेल्या १० दिवसांपासून सुरू आहे. यावेळी फक्त १० खेळांचा स्पर्धेत समावेश आहे. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले होते, जिथे भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताच्या पदकसंख्येवर परिणाम होईल, असे भाकीत वर्तवले जात होते. १२२ खेळाडूंसह सहभागी झालेल्या भारताला वेटलिफ्टिंग, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग या क्रीडाप्रकारांतूनच सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती. या क्रीडापटूंनी हा विश्वास सार्थ ठरवून भारताला पदकतालिकेत चौथे स्थान मिळवून दिले.
भारताने शनिवारी मिळवलेल्या एकूण ८ सुवर्णपदकांपैकी ७ सुवर्णपदके बॉक्सिंग रिंगमधून आली. महिला विभागात विद्यमान जागतिक विजेती जास्मिन लंबोरिया (५७ किलो), आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती प्रीती पवार (५४ किलो), आशियाई विजेती प्रिया घांघस (६० किलो), साक्षी चौधरी (५१ किलो) आणि अरुंधती चौधरी (७० किलो) यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले. ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोर्गोहैनला (७५ किलो) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या विभागात सचिन सिवाच (६० किलो) आणि अंकुश (७० किलो) यांनी सुवर्ण, तर जादुमणी सिंग (५५ किलो) व नरिंदर बेरवाल (+९० किलो) यांनी रौप्यपदक पटकावले. यापूर्वी २०१८च्या गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने ३ सुवर्णपदकांसह ७ पदके जिंकली होती. आता सप्टेंबर महिन्यात रंगणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय बॉक्सर्सकडून अशीच चमकदार कामगिरी अपेक्षित आहे.
पॅरा ॲथलेटिक्समध्ये सोमन राणाने पुरुषांच्या एफ५७ पॅरा गोळाफेक प्रकारात १३.४० मीटर फेकीसह सुवर्णपदक पटकावले, तर भारताच्याच शुभम जुयालने १३.२८ मीटर फेकीसह रौप्यपदक जिंकले. गुलवीर सिंहने ५,००० मीटर शर्यतीत १३ मिनिटे २४.९५ सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो पहिला भारतीय ॲथलीट ठरला.
पुरुषांच्या तिहेरी उडीत प्रवीण चित्रावेलने १६.५८ मीटरसह रौप्य तर सेल्वा प्रभू तिरुमारनने १६.५२ मीटरसह कांस्यपदक जिंकले. भारतीय पॅरा क्रीडापटूंनी या स्पर्धेत एकूण ७ पदके (३ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य) जिंकून २००६ नंतरची सर्वोत्तम कामगिरी केली. ज्युदोमध्ये उन्नती शर्माने महिलांच्या ६३ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. ज्युदोमधील भारताचे हे चौथे पदक ठरले. यापूर्वी हर्ष सिंग आणि अस्मिता डे यांनी सुवर्ण, तर यामिनी मोर्याने भारतासाठी ज्युदोमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
रविवारी सायकलिंग, ज्युदोमध्ये निराशा
राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी म्हणजेच अखेरच्या दिवशी भारताला पदक जिंकता आले नाही. ९ वाजेपर्यंत भारताची पदकसंख्या ३९वरच स्थिरावलेली होती. भारताला ज्युदो, सायकलिंगमध्ये आशा होत्या. ज्युदोमध्ये अवतार सिंग, यश घांघस यांना आगेकूच करता आली नाही. तसेच महिलांच्या ७८ किलो वजनी गटात इशरूप नारंग कांस्यपदकाच्या लढतीत दाखल झाली होती. मात्र तिला पराभव पत्करावा लागला. सायकलिंगमध्ये दिनेश कुमार, हर्षवीर सिंग, रोनाल्डो सिंग यांना साखळी फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे रात्री होणाऱ्या पॅरा सायकलिंगमध्ये पदकाची अपेक्षा असेल.
दिवसभरात १६ पदके, भारत चौथ्या स्थानी
भारताने शनिवारी दुपारी ३ वाजल्यापासून मध्यरात्री १.३० पर्यंतच्या वेळेत तब्बल १६ पदके कमावली. यामध्ये ८ सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदकांचा समावेश होता. राष्ट्रकुलच्या गेल्या ९ दिवसांत भारताने सर्वाधिक पदक कमाई शनिवारी केली. त्यामुळे भारताने पदकतालिकेत चौथ्या १०व्या क्रमांकावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली.
भारताच्या खात्यात १३ सुवर्ण, १७ रौप्य, ९ कांस्य अशी एकूण ३९ पदके जमा आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व कॅनडा हे देश भारतापुढे आहेत. भारताने एका दिवसातच स्कॉटलंड, नायजेरिया यांच्यावर सरशी साधली.
राष्ट्रकुलमध्ये यावेळी फक्त १० खेळांचा समावेश होता. बर्मिंगहॅम २०२२च्या तुलनेत यात ९ खेळ कमी करण्यात आले आहेत. २०२२मध्येही भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य अशा ६१ पदकांसह चौथे स्थान पटकावले होते. बॅडमिंटन, हॉकी, स्क्वॉश, टेबल टेनिस, कुस्ती यांसारखे खेळ यंदा राष्ट्रकुलचा भाग नसल्याने भारताची पदकसंख्या काहीशी कमी झाली.