किवींकडून शिकण्याची गरज! एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या भारतीय संघावर गावस्करांचा निशाणा

भारतीय संघातील युवा खेळाडूंनी विराट कोहलीसह न्यूझीलंड संघातील खेळाडूंकडून शिकण्याची गरज आहे. कठीण परिस्थितीत कामगिरी उंचावण्यात आपले खेळाडू अपयशी ठरले. मुख्य म्हणजे न्यूझीलंडने दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह आपल्यावर सरशी साधली, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले.
किवींकडून शिकण्याची गरज! एकदिवसीय मालिका गमावणाऱ्या भारतीय संघावर गावस्करांचा निशाणा
Published on

इंदूर : भारतीय संघातील युवा खेळाडूंनी विराट कोहलीसह न्यूझीलंड संघातील खेळाडूंकडून शिकण्याची गरज आहे. कठीण परिस्थितीत कामगिरी उंचावण्यात आपले खेळाडू अपयशी ठरले. मुख्य म्हणजे न्यूझीलंडने दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह आपल्यावर सरशी साधली, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. इतिहासात प्रथमच न्यूझीलंडने भारतात भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली, हे विशेष.

शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताला रविवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडकडून ४१ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे किवी म्हणजेच न्यूझीलंड संघाने मालिकेत २-१ असे पिछाडीवरून यश संपादन केले. पहिली लढत गमावूनही न्यूझीलंडने हार न मानता भारताच्या नाकीनऊ आणले. मुख्य म्हणजे पुढील महिन्यात टी-२० विश्वचषक असल्याने न्यूझीलंडचे बहुतांश प्रमुख खेळाडू या मालिकेचा भाग नव्हते. ते फक्त टी-२० मालिकेत खेळणार आहेत. तरीही किवी संघाने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अन्य तारांकित खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतावर सरशी साधली.

इंदूर येथील तिसऱ्या लढतीत विराट कोहलीने (१०८ चेंडूंत १२४ धावा) एकदिवसीय कारकीर्दीतील ५४वे शतक साकारले. मात्र अन्य फलंदाजांची त्याला पुरेशी साथ लाभली नाही. डॅरेल मिचेल (१३१ चेंडूंत १३७ धावा) व ग्लेन फिलिप्स (८८ चेंडूंत १०६ धावा) यांनी झळकावलेल्या शतकांच्या बळावर न्यूझीलंडने तिसऱ्या सामन्यात भारतापुढे ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारतीय संघ २९६ धावांत गारद झाला. मिचेलला सामनावीर व मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

“दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडने ज्या सहजतेने धावांचा पाठलाग केला, तेव्हाच तिसऱ्या सामन्यातही भारताला संघर्ष करावा लागेल, हे स्पष्ट झाले. विराटला फलंदाजीत पुरेशी साथ मिळणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यातही अनेकदा अशीच वेळ ओढवू शकते. धावांचा पाठलाग करताना भारताला एकदाही उत्तम सुरुवात मिळाली नाही. तसेच गोलंदाजीतही आपण कमी पडलो,” असे गावस्कर म्हणाले.

“राहुल बाद झाल्यावर नितीश रेड्डी व हर्षित राणा यांनी विराटला साथ दिली. मात्र ती विजयासाठी पुरेशी नव्हती. आघाडीच्या पाच फलंदाजांनी अधिक जबाबदारी घेत विराटवरील दडपण कमी केले पाहिजे. गोलंदाजीतही आपल्याला रवींद्र जडेजा व कुलदीप यादवचा योग्य वापर करता आलेला नाही. अर्शदीप सिंगला पहिल्या लढतीपासून खेळवणे उचित ठरू शकले असते,” असे गावस्कर यांनी नमूद केले. आता भारताची पुढील एकदिवसीय मालिका थेट जून अथवा जुलै महिन्यात असेल.

दरम्यान, उभय संघांत आता २१ जानेवारीपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित शर्मा व विराट कोहली यांना एकत्रित खेळताना पाहण्याची संधी मिळाली. टी-२०मध्ये मात्र सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांना मात्र फेब्रुवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने विश्रांती देण्यात आली होती. ते आता टी-२० मालिकेत परततील. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेलासुद्धा मुकणार आहे. त्याच्या जागी लेगस्पिनर रवी बिश्नोईचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच तिलक वर्माच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in