भारताचे दक्षिण आफ्रिकेवर दीड दिवसांतच वर्चस्व; केपटाऊनमध्ये प्रथमच यश

उपहारानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी खेळपट्टी व आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा धोका ओळखून पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केले.
भारताचे दक्षिण आफ्रिकेवर दीड दिवसांतच वर्चस्व; केपटाऊनमध्ये प्रथमच यश

केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वेगवान दुसऱ्या कसोटी सामन्याने ऐतिहासिक विक्रमांची नोंद केली. अवघ्या दीड दिवसांतच संपलेल्या या कसोटीत भारताने आफ्रिकेवर ७ गडी राखून वर्चस्व गाजवत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजेच अवघ्या ६४२ चेंडूंत (१०७ षटके) निकाल लागणारी ही कसोटी ठरली. याबरोबरच भारताने वर्षाचा वेगवान विजयारंभ केला.

केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने दुसऱ्या डावात ७९ धावांचे लक्ष्य १२ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले. ३१ वर्षाच्या इतिहासात भारताने प्रथमच केपटाऊन येथे कसोटी जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या डावात ६ बळी घेणारा मोहम्मद सिराज सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तर दुसऱ्या डावात ६ आणि मालिकेत एकूण सर्वाधिक १२ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आफ्रिकेचा कर्णधार आणि कारकीर्दीतील अखेरची कसोटी खेळणाऱ्या डीन एल्गरलासुद्धा (२०१ धावा) मालिकावीर पुरस्कार बहाल करण्यात आला.

वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर भारताने बुधवारी आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांत गुंडाळला. त्यानंतर भारताचा पहिला डाव १५३ धावांत आटोपला. मात्र त्यांनी ९८ धावांची निर्णायक आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसअखेर आफ्रिकेने ३ बाद ६२ धावांपर्यंत मजल मारली होती. गुरुवारी या धावसंख्येवरून पुढे खेळताना बुमरासमोर आफ्रिकन फलंदाज ढेपाळले. बुमराने डेव्हिड बेडिंगहॅम (११), कायले वेरान (९), मार्को यान्सेन (११), केशव महाराज (३) या चौघांना १० षटकांच्या आत माघारी धाडले.

एका बाजूने फलंदाज बाद होत असताना एडीन मार्करमने एक बाजू लावून धरत आक्रमक शतक साकारले. त्याने १७ चौकार व २ षटकारांसह १०३ चेंडूंतच १०६ धावा केल्या. मार्करमचे हे कसोटी कारकीर्दीतील सातवे शतक ठरले. अखेर सिराजने मार्करमचा अडथळा दूर केला. प्रसिध कृष्णाने कॅगिसो रबाडाच्या रूपात लढतीतील एकमेव बळी मिळवला. मग बुमराने लुंगी एन्गिडीला बाद करून आफ्रिकेचा डाव ३६.५ षटकांत १७६ धावांत संपुष्टात आणला. दुसऱ्या डावात त्यांनी ७८ धावांची आघाडी घेतल्याने भारतापुढे ७९ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.

उपहारानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी खेळपट्टी व आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा धोका ओळखून पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केले. यशस्वी जैस्वालने २३ चेंडूंत ६ चौकारांसह २८ धावा केल्या. ही जोडी विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच ५.४ षटकांत ४४ धावा झालेल्या असताना यशस्वी बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल (१०) व विराट कोहली (१२) हेदेखील झटपट विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात माघारी परतले. मात्र कर्णधार रोहित शर्मा (नाबाद १६) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ४) या मुंबईकरांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. अखेर श्रेयसने यान्सेनच्या गोलंदाजीवर चौकार लगावून भारताच्या विजयावर १२व्या षटकात थाटात शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : २३.२ षटकांत सर्व बाद ५५

भारत (पहिला डाव) : ३४.५ षटकांत सर्व बाद १५३

दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ३६.५ षटकांत सर्व बाद १७६ (एडीन मार्करम १०६; जसप्रीत बुमरा ६/६१, मुकेश कुमार २/५६)

भारत (दुसरा डाव) : १२ षटकांत ३ बाद ८० (यशस्वी जैस्वाल २८, रोहित शर्मा नाबाद १६; मार्को यान्सेन १/१५)

सामनावीर : मोहम्मद सिराज

मालिकावीर : जसप्रीत बुमरा-डीन एल्गर

आकड्यांचा जलद आढावा

बुमराने कसोटी कारकीर्दीत नवव्यांदा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी मिळवले. ३२ कसोटींत बुमराचे १४० बळी झाले आहेत.

बुमराने आफ्रिकेत तिसऱ्यांदा डावात पाच बळी मिळवले. तसेच आफ्रिकेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो ३८ बळींसह तिसऱ्या स्थानी आहे. अनिल कुंबळे (४५), जवागल श्रीनाथ (४३) हे बुमराच्या पुढे आहेत.

केपटाऊन येथे कसोटी जिंकणारा भारत हा एकमेव आशियाई देश आहे.

केपटाऊन येथे अखेर सातव्या कसोटीत भारताने विजय मिळवला. यापूर्वी भारताने येथील सहा सामने गमावले होते.

आफ्रिकेत कसोटी मालिका बरोबरीत सोडवणारा रोहित हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी २०१०-११मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती.

भारताने तिसऱ्यांदा एखादी कसोटी दोन दिवसांतच जिंकली. यापूर्वी २०१८मध्ये अफगाणिस्तान, तर २०२१मध्ये इंग्लंडविरुद्धही भारताने असा कारनामा केला होता.

भारताचा हा आफ्रिकन भूमीत एकंदर पाचवा कसोटी विजय ठरला. यापूर्वी २००६, २०१०, २०१८, २०२१मध्ये भारताने आफ्रिकेत प्रत्येकी एक कसोटी जिंकली होती.

उभय संघांतील ही कसोटी ६४२ चेंडूंतच संपली. या कसोटीने १९३२मध्ये ऑस्ट्रेलिया वि. आफ्रिका यांच्यातील ६५६ चेंडूंतील कसोटीचा विक्रम मोडीत काढला.

कसोटी क्रिकेटमध्ये २५व्यांदा एखादी लढत दोन दिवसांतच संपली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in