IND vs AUS : रोहित-विराटकडून चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट! भारताचे ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून वर्चस्व; शतकवीर रोहित मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू

रोहित-विराटच्या दीडशतकी भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी आणि ६९ चेंडू राखून धुव्वा उडवला. शतकवीर रोहितलाच ३ सामन्यांत २०२ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
IND vs AUS : रोहित-विराटकडून चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट! भारताचे ऑस्ट्रेलियावर ९ गडी राखून वर्चस्व; शतकवीर रोहित मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू
ICC
Published on

सिडनी: गेल्या आठवडाभराच्या प्रतीक्षेचे अखेर चाहत्यांना फळ मिळाले. रोहित शर्माने (१२५ चेंडूंत नाबाद १२१ धावा) साकारलेल्या शानदार शतकाला विराट कोहलीच्या (८१ चेंडूंत नाबाद ७४ धावा) अर्धशतकाची सुरेख साथ लाभली. या दोघांनी जणू देशभरातील तमाम चाहत्यांना दिवाळीचे रिटर्न गिफ्ट दिले. त्यांच्या दीडशतकी भागीदारीमुळे भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी आणि ६९ चेंडू राखून धुव्वा उडवला. शतकवीर रोहितलाच ३ सामन्यांत २०२ धावा केल्यामुळे मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाला भारताने ४६.४ षटकांत २३६ धावांत गुंडाळले. मग रोहित-विराटच्या १६८ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने ३८.३ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. रोहितने १३ चौकार व ३ षटकारांसह एकदिवसीय कारकीर्दीतील ३३वे शतक साकारले, तर विराटने ७चौकारांसह ७५ वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. विशेषतः विराट सलग दोन लढतींमध्ये शून्यावर बाद झाला होता. तसेच २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी मालिकेपूर्वी या दोघांच्याही संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र तूर्तास शनिवारी दोघांनी आठवणींना उजाळा देणारी भागीदारी साकारून भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यामुळे भारताने मालिका १-२ अशी गमावली असली, तरी रोहित-विराटला गवसलेला सूर व मालिकेचा शेवट गोड केल्यामुळे चाहते आनंदी आहेत. आता ३० नोव्हेंबरपासून भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची पुढील एकदिवसीय मालिका होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात गेल्या रविवारपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली. या मालिकेत कांगारूंनी शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवताना २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. पावसामुळे पहिली लढत प्रत्येकी २६ षटकांची खेळवण्यात आली. भारताला १३६ धावांत रोखल्यावर ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांतच हे लक्ष्य गाठून सात गडी राखून दमदार विजय नोंदवला. मग दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेले २६५ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४६.२ षटकांत गाठून मालिकेवर कब्जा केला. त्यामुळे सिडनीतील तिसऱ्या सामन्यात कांगारूंना व्हाइटवॉशची संधी होती.

रोहित आणि विराट हे दोन्ही तारांकित खेळाडू या मालिकेद्वारे तब्बल सात महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले. त्यामुळे या दोघांच्याच कामगिरीकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून होते. दोघेही मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताकडून अखेरचे खेळले होते. रोहितच्या नेतृत्वात भारताने ती स्पर्धा जिंकली. त्यानंतर मे महिन्यात प्रथम रोहितने, मग विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्यातच आता २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघबांधणी करण्याच्या हेतूने आता ३८ वर्षीय रोहितकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेत २५ वर्षीय गिलकडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी झालेल्या तिसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी स्वीकारली. कर्णधार मिचेल मार्श (४१) व ट्रेव्हिस हेड (२९) यांनी १० षटकांतच ६१ धावांची सलामी नोंदवली. त्यावेळी भारताला ३०० धावांचा पाठलाग करावे लागेल, असे वाटले. मात्र मोहम्मद सिराजने हेडचा अडसर दूर केला. त्यानंतर हर्षित राणाने पुढाकार घेत मधल्या फळीला गुंडाळले. अक्षर पटेलने मार्शचा त्रिफळा उडवला. मॅट रेनशॉने (५६) अर्धशतकी झुंज दिली. वॉशिंग्टन सुंदरने त्याला पायचीत पकडले. ३ बाद १८३ अशा स्थितीतून ऑस्ट्रेलियाचा संघ २३६ धावांत गारद झाला.

मग लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून साहजिकच रोहित-गिलच्या जोडीसह विराटवर लक्ष होते. रोहित-गिलने ६२ चेंडूंत ६९ धावांची सलामी नोंदवली. रोहितने आक्रमक रूप धारण करताना झटपट अर्धशतकाच्या दिशेने कूच केली. मात्र गिलला २४ धावांवर हेझलवूडने बाद केले. त्यानंतर रोहित व विराटने सूत्रे हाती घेतली. विराटने एकेरी धाव घेताच गमतीत आनंद व्यक्त केला, तसेच चाहत्यांनीही टाळ्या वाजवल्या. या दोघांनी जानेवारी २०२० नंतर प्रथमच शतकी भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियन भूमीवर दोघांची ही अखेरची लढत ठरण्याची शक्यता होती. दोघांनी त्याचप्रमाणे जणू खेळ केला.

झाम्पाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत रोहितने ३३वे एकदिवसीय शतक साकारले. मग काही षटकांतच विराटनेही ७५वे अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस विराटनेच ३९व्या षटकात अप्पर कटच्या रूपात विजयी चौकार लगावला आणि तमाम चाहत्यांना दिलासा दिला. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका होणार असून त्यानंतर आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यामध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा रोहित-विराटला एकत्रित खेळताना पाहायला मिळेल.

व्हाइटवॉश हुकला; मात्र मालिकेवर कब्जा

ऑस्ट्रेलियाचे भारतावर पहिलावहिला व्हाइटवॉश मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मात्र त्यांनी एकदिवसीय मालिकेत २-१ अशी बाजी मारली. आता २९ ऑक्टोबरपासून उभय संघांत ५ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. तेथेसुद्धा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्शच करणार आहे. त्यांचे प्रमुख खेळाडू काही सामन्यांसाठीच उपलब्ध असतील. दुसरीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणारा भारताचा टी-२० संघ शनिवारीच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे.

ऑस्ट्रेलियन चाहत्यांचे आभार

सामना संपल्यानंतर रोहित व विराट दोघेही एकत्रितपणे स्टार स्पोर्ट्स वाहिनशी संवाद साधण्यासाठी आले. त्यावेळी अनेकांना आधी भीती वाटली, की कदाचित निवृत्तीची घोषणा तर करणार नाही ना. मात्र रोहित व विराट यांनी ऑस्ट्रेलियन तसेच तेथे स्थायिक असलेल्या भारतीय चाहत्यांचे आभार मानले. २०२७-२८पर्यंत भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नाही. त्यामुळे तोपर्यंत रोहित व विराट एकदिवसीय प्रकारांतून निवृत्त होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दोघांनीही आठवणींना उजाळा दिला. तसेच २०२७चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची दोघांचीही इच्छा असल्याचेही दिसून आले.

रोहितने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शतकांचे अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या नावावर कसोटीत १२ एकदिवसीय प्रकारात ३३, तर टी-२०मध्ये ५ शतके आहेत. विश्वभरात फक्त ९ फलंदाजांनीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्याहून अधिक शतके साकारली आहेत.

रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत एकंदर सहावे शतक झळकावले. विदेशी फलंदाजाद्वारे ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके साकारणाऱ्यांच्या यादीत रोहित सध्या अग्रस्थानी आहे. विराट व संगकारा प्रत्येकी ५ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

धावांचा पाठलाग करताना रोहितने एकदिवसीय कारकीर्दीतील १७वे शतक साकारले. याबाबतीत् त्याने सचिनशी बरोबरी केली. विराटने सर्वाधिक २८ शतके धावांचा पाठलाग करताना साकारली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in