
क्वालालंपूर : निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय युवतींच्या संघाने रविवारी सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरण्याचा मान मिळवला. मलेशिया येथे झालेल्या महिलांच्या १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी आणि ५२ चेंडू राखून धुव्वा उडवला. त्यामुळे भारताच्याच पोरी जगात भारी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. अष्टपैलू योगदान देणारी त्रिशा गोंगडी (नाबाद ४४ धावा आणि ३ बळी) भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली.
२०२३मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकातही भारतानेच जेतेपद मिळवले होते. त्यावेळी शफाली वर्मा भारताची कर्णधार होती. तसेच डिसेंबरमध्ये भारतीय मुलींनी आशिया चषकाला गवसणी घालून जगज्जेतेपदासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. विश्वचषकात भारताने अपराजित राहून जेतेपद मिळवले, हे आणखी विशेष. साखळीत २ विजय मिळवल्यानंतर भारताने सुपर-सिक्स फेरीत ३ संघांना धूळ चारली. मग उपांत्य फेरीत इंग्लंडला भारताने नेस्तनाबूत केले. आता अंतिम फेरीतील विजयासह भारताने आपला दबदबा कायम राखला.
ब्युमस ओव्हल येथे झालेल्या या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत ८२ धावांत गारद झाला. पारुणिका सिसोदिया आणि आयुषी शुक्ला या डावखुऱ्या फिरकीपटूंसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. मग त्रिशाने मधल्या षटकांत सातत्याने बळी मिळवून आफ्रिकेला १०० धावांच्या आतच रोखले. मिक वॅन (२३) व जेमा बोथा (१६) वगळता कुणीही फारसा प्रतिकार करू शकले नाहीत. भारतासाठी त्रिशाने ३, तर वैष्णवी शर्मा, आयुषी व पारुणिका यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ११.२ षटकांत एका फलंदाजाच्या मोबदल्यातच विजय मिळवला. त्रिशा आणि यष्टिरक्षक कमलिनी गुनालन यांनी २७ चेंडूंत ३६ धावांची सलामी नोंदवली. कमलिनी ८ धावांवर बाद झाली. त्यानंतर मग त्रिशाने मुंबईकर सानिका चाळकेच्या साथीने संघाचा विजय साकारला. स्पर्धेतील एकवेश शतकवीर असलेल्या त्रिशाने ८ चौकारांसह ३३ चेंडूंत नाबाद ४४ धावा फटकावल्या. सानिकाने ४ चौकारांसह २२ चेंडूंत नाबाद २६ धावा केल्या. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अखेर १२व्या षटकात डावखुऱ्या सानिकाने विजयी चौकार लगावला आणि भारताच्या सर्व खेळाडूंनी मैदानात धाव घेत एकच जल्लोष केला.
त्रिशाला सामनावीर तसेच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. २०२३मध्येही टी-२० विश्वचषकाचा भाग असलेल्या त्रिशाने यावेळी ७ सामन्यांत ३०९ धावा करण्यासह ७ बळीसुद्धा मिळवले. तसेच फिरकीपटूंनी या वाटचालीत मोलाचे योगदान दिले. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते भारताला जेतेपदाचा चषक देण्यात आला. भारतीय युवतींच्या या यशामुळे महिला क्रिकेटला पुन्हा उभारी मिळणार असून येणाऱ्या काळात आपला वरिष्ठ महिला संघही आयसीसी जेतेपद पटकावेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका : २० षटकांत सर्व बाद ८२ (मिक वॅन २३, जेमा बोथा १६; त्रिशा गोंगडी ३/१५, पारुणिका सिसोदिया २/६) पराभूत वि.
भारत : ११.२ षटकांत १ बाद ८४ (त्रिशा गोंगडी नाबाद ४४, सानिका चाळके नाबाद २६, कमलिनी गुनालन ८; कायला रेनेक १/१४)
सामनावीर आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : त्रिशा गोंगडी