भारताची स्वप्नपूर्ती! दक्षिण आफ्रिकेवर अंतिम फेरीत ७ धावांनी रोमहर्षक विजय

अखेर १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.
भारताची स्वप्नपूर्ती! दक्षिण आफ्रिकेवर अंतिम फेरीत ७ धावांनी रोमहर्षक विजय
Instagram
Published on

ब्रिजटाऊन : अखेर १७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. जसप्रीत बुमरासह (१८ धावांत २ बळी) सर्व वेगवान गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी सरशी साधली.

संपूर्ण स्पर्धेत संघर्ष केल्यानंतर विराट कोहलीची बॅट अखेर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत तळपली. विराटने ५९ चेंडूंत फटकावलेल्या ७६ धावांच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २० षटकांत ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली. अक्षर पटेलनेसुद्धा ३१ चेंडूंत ४७ धावांचे दमदार योगदान दिले. त्यानंतर भारताने आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांत रोखून जेतेपद काबिज केले.

ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या या लढतीत भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. रोहित व विराट या जोडीने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या दोन षटकांतच २३ धावा वसूल केल्या. मात्र केशव महाराजला तिसरा चौकार लगावण्याच्या प्रयत्नात रोहित फसला व ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतही खाते न उघडताच निराशा केली. पाचव्या षटकात कॅगिसो रबाडाने सूर्यकुमार यादवला अवघ्या ३ धावांवर बाद केले. त्यामुळे भारतीय संघ ३ बाद ३४ अशा संकटात सापडला.

तेथून मग अक्षर व विराट यांनी संघाला सावरले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. विराटने ६ चौकार व २ षटकारांसह या स्पर्धेतील पहिले अर्धशतक साकारले. तसेच अक्षरने ४ षटकार व १ चौकारासह ४७ धावा फटकावल्या. त्यानंतर शिवम दुबेने १६ चेंडूंत २७ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद १७६ (विराट कोहली ७६, अक्षर पटेल ४७; केशव महाराज २/२६) विजयी वि.

दक्षिण आफ्रिका : २० षटकांत ८ बाद १६९ (हेनरिच क्लासेन ५२, क्विंटन डीकॉक ३९; जसप्रीत बुमरा २/१८)

logo
marathi.freepressjournal.in