India-Zimbabwe T20 Series: टीम इंडियाचे ‘यशस्वी’ भव! झिम्बाब्वेवर १० विकेट्स राखून सहज मात

जैस्वाल, गिलच्या नाबाद अर्धशतकांमुळे भारताची मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी
India-Zimbabwe T20 Series: टीम इंडियाचे ‘यशस्वी’ भव! झिम्बाब्वेवर १० विकेट्स राखून सहज मात
Credits: Twitter
Published on

हरारे : यशस्वी जैस्वालने केलेल्या धुव्वाधार खेळीच्या जोरावर भारताने झिम्बाब्वेचा १० विकेट्स राखून पराभव करत पाच सामन्यांच्या या मालिकेत ३-१ अशी ‘यशस्वी’ आघाडी घेतली आहे. जैस्वाल आणि शुभमन गिल यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेचे आव्हान सहजपणे पार केले.

भारताने दुसऱ्यांदा झिम्बाब्वेचा १० विकेट्स राखून पराभव केला आहे. विशेष म्हणजे २०१६मध्ये याच मैदानावर भारताने इतक्या मोठ्या फरकाने झिम्बाब्वेवर मात केली होती. टी-२० वर्ल्डकपमध्ये एकही सामन्यात संधी न मिळालेला यशस्वी जैस्वाल झिम्बाब्वेविरुद्ध मात्र आक्रमक पवित्र्यात होता. त्याने साकारलेल्या ९३ धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताने झिम्बाब्वेचे १५३ धावांचे लक्ष्य १५.२ षटकात एकही विकेट न गमावता पार केले. कर्णधार शुभमन गिलने नाबाद ५८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. खेळपट्टीकडून चेंडूला चांगली उसळी मिळत असतानाही भारताच्या या सलामीच्या जोडीने यजमानांच्या एकाही गोलंदाजाला यश मिळू दिले नाही.

झिम्बाब्वेच्या गोलंदाजीत अनुभवी खेळाडूंचा भरणा नसल्याचा फायदा उठवत यशस्वीने चांगलाच हल्लाबोल केला. त्याने नऊ चौकारांसह आपले अर्धशतक साजरे केले, त्यावेळी शुभमन १५ धावांवर खेळत होता. मात्र गिलने आपले अर्धशतक पूर्ण केल्यावर यशस्वीच्या शतकासाठी अधिक धावा न ठेवल्याने यशस्वीला शतकासाठी ७ धावा कमी पडल्या.

तत्पूर्वी, भारताचे कामचलाऊ गोलंदाज शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे भारताने झिम्बाब्वेला ७ बाद १५२ धावांवर रोखले. कर्णधार सिकंदर रझा याने २७ चेंडूंत सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली तरी त्याला टी-२०मध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईच्या तुषार देशपांडेने माघारी पाठवले. झिम्बाब्वेच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करता न आल्याने त्यांना जेमतेम दीडशतकी धावसंख्या उभारता आली.

सलामीवीर वेस्ली माधीवेरे आणि तादीवानाशे मारूमानी यांनी झिम्बाब्वेला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी सलामीसाठी ६३ धावा जोडल्या. मात्र अभिषेक शर्माने मारूमानीला बाद करत मैदानावर जमलेली ही जोडी फोडली. मारूमानीने ३१ चेंडूंत ३ चौकारांसह ३२ धावा केल्या. त्यापाठोपाठ माधीवेरे (२५) याला दुबेने माघारी पाठवले. सिकंदर रझा याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावत झिम्बाब्वेला सुस्थितीत आणले, मात्र तुषार देशपांडेने त्याची विकेट मिळवत झिम्बाब्वेच्या धावसंख्येला वेसण घातली. शेवटच्या क्षणी वेगवान गोलंदाज खलील अहमद याने दोन विकेट्स मिळवत झिम्बाब्वेला रोखले. अन्यथा झिम्बाब्वेच्या १७०पेक्षा जास्त धावा धावफलकावर लागल्या असत्या. भारताकडून खलील अहमदने दोन, तर तुषार देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

तुषार देशपांडेचे आंतरराष्ट्रीय पदार्पण

मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. वयाच्या २९व्या वर्षी त्याने टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तुषार देशपांडेने आयपीएलमध्ये ८० सामन्यात ११६ विकेट्स मिळवले आहेत. २०२३च्या आयपीएल विजेत्या चेन्नई संघाचा तो भाग होता. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे त्याला आवेश खानच्या जागी भारतीय संघात संधी मिळाली.

सिकंदर रझाचे दोन विक्रम

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने शनिवारी दोन विक्रम आपल्या नावावर केले. भारताविरुद्ध त्याने २८ चेंडूंत ४८ धावांची खेळी साकारली. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि ५० विकेट्स मिळवणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले आहे. शाकिब अल हसन, मोहम्मद नाबी, वीरनदीप सिंग आणि मोहम्मद हाफीझ यांच्यानंतरचा तो पाचवा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार धावा करणारा तो झिम्बाब्वेचा पहिला फलंदाज ठरला आहे. जवळपास दशकभर झिम्बाब्वेचा ध्वजवाहक असलेल्या सिकंदर रझाने टी-२०मध्ये ६५ विकेट्स मिळवत झिम्बाब्वेचा सर्वाधिक बळी मिळवणारा दुसरा गोलंदाज म्हणून मान मिळवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in