वनडे वर्ल्ड कपच्या आयोजनाद्वारे भारत मालामाल! ICC ने सांगितली किती झाली कमाई

गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा भारताला मोठा आर्थिक लाभ झाला असून या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : गतवर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा भारताला मोठा आर्थिक लाभ झाला असून या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल १.३९ अब्ज डॉलरचा (अंदाजे ११ हजार ६३७ कोटी) महसूल निर्माण झाला. या स्पर्धेच्या आयोजनामुळे देशातील पर्यटनाला सर्वाधिक फायदा झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ही माहिती दिली. आयसीसीसाठी ‘निल्सन’ कंपनीने केलेल्या आर्थिक प्रभाव मूल्यांकनात ही माहिती देण्यात आली असून, भारतात झालेली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सर्वार्थाने भव्य होती, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. “या स्पर्धेने क्रिकेटची आर्थिक शक्ती समोर आली असे अहवालात ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. भारताला या स्पर्धेतून १.३९ अब्ज डॉलर म्हणजेच अंदाजे ११ हजार ६३७ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे,” असे ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलर्डाइस यांनी निवेदनात म्हटले आहे.

मायदेशात झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करताना सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, भारताची घोडदौड ऑस्ट्रेलियाने रोखली होती. ट्रॅव्हिस हेडच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने विक्रमी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक उंचावला होता.

भारताला सर्वाधिक फायदा हा क्रिकेट पर्यटनातून झाल्याचा मुद्दा अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. भारतीयांसह परदेशातील व्यक्तींच्या उपस्थितीने निवास, प्रवास, वाहतूक आणि खाद्यापदार्थ, पेये यातून देशाला थेट ८६ कोटी १४ लाख डॉलर इतका घसघशीत नफा मिळाला आहे.

भारताचे सराव शिबीर सुरू

बांगलादेशविरुद्ध १९ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचे चेन्नई येथे सराव शिबीर सुरू झाले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांच्यासह कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, शुभमन गिल असे तारांकित खेळाडू या शिबिराचा भाग आहेत. बांगलादेशचा संघ १५ तारखेपर्यंत भारतात येणे अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in