![India In Paris Olympics 2024](http://media.assettype.com/freepressjournal-marathi%2F2024-08-12%2Fs0tearsh%2Fr6tu.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पॅरिस : पदकांचे दशक गाठण्याच्या हेतूने पॅरिसवारीला गेलेल्या भारतीय पथकाला यावेळी सहा पदके जिंकण्यात यश आले. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी ७ पदके कमावली होती. त्याची पुनरावृत्ती करण्यात अपयश आले असले तरी यंदाचे ऑलिम्पिक नेमबाजी आणि हुकलेल्या पदकांसाठी चाहत्यांना कायम स्मरणात राहील.
भारतासाठी यावेळी नेमबाजीत मनू भाकरने महिलांच्या १० मीटर पिस्तूलमध्ये कांस्य, तसेच दुहेरीत सरबजोत सिंगच्या साथीनेही कांस्यपदक पटकावले. त्यानंतर महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेने ५० मीटर रायफल प्रकारात कांस्यपदकाचा वेध साधला. भारतीय हॉकी संघाने मग सलग दुसऱ्यांदा कांस्यपदकाची कमाई केली. गेल्या ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरजला यावेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर कुस्तीपटू अमन सेहरावतने वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी कांस्यपदक जिंकून भारताया सर्वात युवा ऑलिम्पिक पदकविजेता ठरण्याचा मान मिळवला.
मात्र वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूचे चौथे स्थान, बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकाच्या लढतीत झालेला पराभव, सात्विक-चिराग, सिंधू यांचे अपयश, तिरंदाजी, बॉक्सिंग, टेबल टेनिसमध्ये पदरी पडलेली निराशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुस्तीपटू विनेश फोगटचे अंतिम फेरीत मजल मारूनही हुकलेले पदक. यांसारख्या विविध बाबींमुळे हे ऑलिम्पिक भारतीय चाहते सहज विसरू शकणार नाहीत.