गिल-गंभीर पर्वाची आजपासून कसोटी! लीड्स येथील पहिल्या सामन्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित मालिकेला प्रारंभ

भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शुक्रवार, २० जूनपासून नवा अध्याय सुरू होईल. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या निमित्ताने शुभमन गिल प्रथमच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून हेडिंग्लेच्या मैदानात उतरेल.
गिल-गंभीर पर्वाची आजपासून कसोटी! लीड्स येथील पहिल्या सामन्यापासून भारत-इंग्लंड यांच्यातील बहुप्रतीक्षित मालिकेला प्रारंभ
Published on

लीड्स : भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शुक्रवार, २० जूनपासून नवा अध्याय सुरू होईल. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. लीड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या निमित्ताने शुभमन गिल प्रथमच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून हेडिंग्लेच्या मैदानात उतरेल. त्यामुळे गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे पर्व या पाच सामन्यांच्या बहुप्रतीक्षित मालिकेत काय कमाल करणार, याकडे अवघ्या विश्वाचे लक्ष लागून असेल.

आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. मायदेशात भारताने तब्बल १२ वर्षांनी कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धही बॉर्डर-गावस्कर मालिकेत सपाटून मार खाल्ला. रोहित शर्मा व विराट कोहली या तारांकित फलंदाजांची कामगिरी यादरम्यान खालावली. परिणामी दोघांनीही जून महिन्यात कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये स्थित्यंतराची वेळ आली आहे. २०२५-२७च्या दोन वर्षांच्या डब्ल्यूटीसी हंगामाकडे पाहता २५ वर्षीय गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. म्हणूनच या मालिकेची सर्वांना उत्सुकता लागून आहे.

इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच येथे कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. त्यानंतर महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौरे केले. मात्र त्यांना यश लाभले नाही. २०२१मध्ये भारताने इंग्लंडला २-२ असे बरोबरीत रोखले. त्यावेळी काही सामन्यांत विराट, तर काही सामन्यात बुमरा भारताचा कर्णधार होता. रोहितच्या नेतृत्वात प्रथमच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला असता. परंतु त्याने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यामुळे आता गिलला हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

दुसरीकडे, बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडलासुद्धा आजपर्यंत एकदाही डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठता आली नाही. त्यामुळे आता नव्या हंगामात ते ‘बॅझबॉल’ शैली कायम राखणार की कामगिरीत सुधारणा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. इंग्लंडने अंतिम लढतीसाठी ११ खेळाडूंचा संघ आधीच जाहीर केला आहे. तर भारतीय संघातील काही स्थानांविषयी अद्याप संभ्रम कायम आहे. या लढतीवर पावसाचे फारसे सावट नाही. मात्र इंग्लंडच्या थंड वातावरणात आणि शिस्तबद्ध क्रिकेटप्रेमींच्या साक्षीने कसोटीचा आस्वाद लुटण्यासाठी पुढील दीड महिना जगभरातील क्रीडाप्रेमी सज्ज आहेत.

सुदर्शन की नायर, तिसरा कोण?

भारतीय संघातील फलंदाजी क्रमाविषयी फार चर्चा रंगते आहे. सलामीला के. एल. राहुल व यशस्वी जैस्वाल यांचे स्थान पक्के आहे. मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी डावखुरा साई सुदर्शन व अनुभवी करुण नायर यांच्यात चुरस आहे. चौथ्या स्थानी गिल, तर पाचव्या स्थानी ऋषभ पंत फलंदाजी करणार आहे. तसेच रवींद्र जडेजाचेही स्थान पक्के आहे. मात्र नितीश रेड्डी किंवा शार्दूल ठाकूर यांच्यापैकी एकाच अष्टपैलूला संघात संधी मिळू शकते.

बुमरावर भारताच्या गोलंदाजीची भिस्त

विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा भारतीय माऱ्याचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. बुमरा या मालिकेत तीनच सामने खेळणार असल्याने त्याचा प्रभाव संघाच्या कामगिरीवर आपसुकच होईल. बुमराच्या साथीला मोहम्मद सिराजचे स्थान पक्के आहे. मात्र तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा व आकाश दीप यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार, हे पहावे लागेल. तसेच गरज पडल्यास जडेजाच्या साथीने वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलदीप यादव यांचा फिरकी पर्यायही भारतापुढे उपलब्ध आहे. त्यामुळे संघरचेनकडे लक्ष असेल.

स्टोक्स, रूट, वोक्स इंग्लंडची ताकद

कर्णधार स्टोक्सची अष्टपैलू कामगिरी व नेतृत्व तर, वेगवान गोलंदाजीत ख्रिस वोक्सचा भेदक मारा ही इंग्लंडची ताकद आहे. त्याशिवाय अनुभवी फलंदाज जो रूटच्या समावेशामुळे त्यांची फलंदाजी आणखी बळकट होते. बेन डकेट, ओली पोप, हॅरी ब्रूक असे आक्रमक खेळणारे फलंदाज इंग्लंडकडे आहेत. गोलंदाजीत मात्र त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही. शोएब बशीर एकमेव फिरकीपटू आहे. जोश टंग व ब्रेडन कार्स वोक्सच्या साथीने वेगवान माऱ्याची धुरा वाहतील.

३५-५१

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १३६ कसोटी सामन्यांपैकी भारताने ३५, इंग्लंडने ५१ लढती जिंकल्या आहेत. ५० कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. भारताने आतापर्यंत ३ वेळा (१९७१, १९८६, २००७) इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली आहे.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली कसोटी : २० ते २४ जून (लीड्स)

  • दुसरी कसोटी : २ ते ६ जुलै (बर्मिंघम)

  • तिसरी कसोटी : १० ते १४ जुलै (लॉर्ड्स)

  • चौथी कसोटी : २३ ते २७ जुलै (मँचेस्टर)

  • पाचवी कसोटी : ३१ जुलै ते ४ ऑगस्ट (ओव्हल)

प्रतिस्पर्धी संघ

  • भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, आकाश दीप, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमरा, अभिमन्यू ईश्वरन, हर्षित राणा, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, करुण नायर, नितीश रेड्डी, प्रसिध कृष्णा, के. एल. राहुल, साई सुदर्शन, शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर.

  • इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

  • वेळ : दुपारी ३.३० वाजता

  • थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३, सोनी सिक्स आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in