श्रेयसचे संघातील स्थान अनिश्चित! स्वत:हूनच दिली माहिती; विराटच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यासाठी मिळाली संधी

मुंबईकर श्रेयस अय्यरने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३६ चेंडूंत ५९ धावांची आक्रमक खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
श्रेयसचे संघातील स्थान अनिश्चित! स्वत:हूनच दिली माहिती; विराटच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यासाठी मिळाली संधी
एक्स @asmemesss
Published on

नागपूर : मुंबईकर श्रेयस अय्यरने गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३६ चेंडूंत ५९ धावांची आक्रमक खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. मात्र या लढतीसाठी श्रेयसचे संघातील स्थान पक्के नव्हते. विराट कोहलीच्या पायाला दुखापत झाल्याने आपल्याला संधी मिळाल्याचे स्वत: श्रेयसने सांगितले. त्यामुळे ‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धा तोंडावर असताना भारतीय खेळाडूंमध्ये संघातील स्थानाबाबत असलेल्या अनिश्चिततेमुळे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी चिंता व्यक्त केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताने नागपूर येथील पहिल्या सामन्यात इंग्लंडला ४ गडी आणि ६८ चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून दुसरा सामना रविवारी कटक येथे होणार आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार असल्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेकडे भारताची पूर्वपरीक्षा म्हणून पाहिले जात आहे. या मालिकेसह चॅम्पियन्स ट्रॉफीतही ३० वर्षीय श्रेयस चौथ्या क्रमांकावर निश्चितपणे फलंदाजी करेल, असेच सर्वांना वाटत होते. कारण गेल्या २ वर्षांपासून श्रेयसने या स्थानी फलंदाजी करताना सातत्याने छाप पाडली आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. बुधवारी सायंकाळी सरावादरम्यान विराटच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने श्रेयसचे अंतिम ११ खेळाडूंतील स्थान पक्के झाले. स्वत: श्रेयसनेच सामना संपल्यानंतर स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी मत मांडले.

“मी पहिल्या लढतीत खेळलो, यामागे एक रंजक कहाणी आहे. खरेतर काल रात्री (बुधवारी) मी चित्रपट पाहण्यात व्यस्त होतो. मध्यरात्रीपर्यंत जागे राहण्याचा प्लॅनही मी केला होता. मात्र रात्री ११च्या सुमारास मला रोहितचा फोन आला. विराटच्या गुडघ्याला सूज असल्याने तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तुला संधी मिळू शकते, असे रोहित मला म्हणाला. त्यामुळे मी लगेच माझ्या रूममध्ये झोपण्यास गेलो,” असे श्रेयस म्हणाला.

“विराटला सरावावेळी झालेल्या दुखापतीमुळे मला अंतिम ११ खेळाडूंत स्थान लाभले. मात्र मी यासाठी तयार होतो. संघासाठी कोणत्याही क्षणी हव्या त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मी सज्ज आहे. गेल्या वर्षी मला दुखापत झाल्यावर माझ्या जागी संधी मिळालेल्या खेळाडूनेही शतक झळकावले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या संधी मिळेल, तेव्हा तिचा लाभ घेण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे,” असेही श्रेयसने सांगितले.

श्रेयसच्या बोलण्यावरून भारतीय संघ या मालिकेत यशस्वी जैस्वाल व रोहित यांना सलामीला, तर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणार असल्याचे समजते. अशा स्थितीत विराट परतल्यावर तो चौथ्या क्रमांकावर खेळेल. मात्र यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापन भारताचा फलंदाजी क्रम बिघडवून तर टाकणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. कारण एकदिवसीय प्रकारात रोहित-गिल सलामीला, विराट तिसऱ्या, तर श्रेयस चौथ्या स्थानी, याच क्रमानुसार भारतीय संघ २०२३च्या आशिया चषकापासून खेळत आला आहे.

समालोचक पार्थिव पटेलनेसुद्धा श्रेयसला प्रश्न विचारला की, आम्हाला असे वाटले, यशस्वी विराटच्या जागी खेळत आहे आणि तुझे संघातील स्थान पक्के आहे. त्याविषयी तू काय सांगशील? मात्र यावर श्रेयसने हुशारीने उत्तर दिले. “माझ्या तोंडून तुम्हाला काय ऐकायचे आहे, हे मला ठाऊक आहे. मात्र मी माझ्या आधी कुणाला संधी मिळत आहे, याचा फारसा विचार करत नाही. जे माझ्या हाती आहे, तितकेच करण्याला प्राधान्य देतो. त्यामुळे सध्या मी फक्त विजयाचा आनंद लुटत आहे,” असे श्रेयसने अखेरीस नमूद केले.

२४९ धावांचा पाठलाग करताना २ बाद १९ अशा स्थितीत फलंदाजीला येत श्रेयसने ९ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक साकारून भारताला विजयाचा मार्ग दाखवला. त्यामुळे गिल व अक्षर पटेल यांच्यावरील दडपण कमी झाले, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. २०२३च्या विश्वचषकापासून श्रेयसने भारताचे चौथ्या क्रमांकाचे कोडे सोडवले आहे. मात्र आता दुसऱ्या सामन्यात विराट संघात परतल्यावर श्रेयस अथवा यशस्वीपैकी कुणाला वगळण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

श्रेयसच्या स्थानावरून गोंधळ म्हणजे आश्चर्यच : पाँटिंग

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील पंजाब किंग्ज संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने श्रेयसच्या संघातील स्थानावरून सुरू असलेल्या चर्चांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. गेली २-३ वर्षे एकदिवसीय प्रकारात श्रेयस चौथ्या स्थानी भारताचा सर्वोत्तम फलंदाज आहे. तसे असूनही जर त्याचे संघातील स्थान पक्के नसेल, तर नक्कीच काहीतरी चुकत आहे. कसोटीतून श्रेयस संघाबाहेर गेला. मात्र टी-२० व एकदिवसीय प्रकारात तो मधल्या षटकात फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाईत आहे. क्षेत्ररक्षणातही तो नेहमीच योगदान देतो,” असे पाँटिंग म्हणाला. आयपीएलमध्ये श्रेयसची पंजाब संघाच्या कर्णधारपदी नेमणूक करण्यात आली असून श्रेयस व पाँटिंग यंदा एकत्रित काम करताना दिसतील.

देशांतर्गत स्पर्धेचा लाभ!

श्रेयसच्या नेतृत्वात मुंबईने डिसेंबरमध्ये मुश्ताक अली या देशांतर्गत टी-२० स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. त्या स्पर्धेत श्रेयसने १ शतक व १ अर्धशतकासह ८ सामन्यांत ३४५ धावा केल्या. त्यानंतर विजय हजारे स्पर्धेतही त्याने दोन शतके साकारली. तसेच यंदाच्या रणजी स्पर्धेत श्रेयसने एका द्विशतकासह ५ सामन्यांतच ४८० धावा कुटल्या आहेत. याचेच फलित गुरुवारी इंग्लंडविरुद्धच्या लढतीतही दिसून आले. यापूर्वी बाऊन्सरवर फसणाऱ्या श्रेयसच्या तंत्रात आता सुधारणा झाली आहे. “देशांतर्गत हंगामात खेळल्याचा मला प्रचंड लाभ झाला. माझ्या फलंदाजीत कितपत सुधारणा आवश्यक आहे, हे मला उमगले. मी खेळण्याच्या शैलीत काहीसा बदल केला आणि त्यामुळे यशही लाभले. त्यामुळे मी आता कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करेन,” असे श्रेयस म्हणाला.

चौथ्या क्रमांकावर श्रेयसची कामगिरी कशी?

श्रेयस हा एकदिवसीय प्रकारात चौथ्या क्रमांकावर ५०ची सरासरी आणि १००च्या स्ट्राइक रेटने १,००० धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

२०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात श्रेयसने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २ शतकांसह ५३० धावा केल्या होत्या. भारतासाठी विश्वचषकात प्रथमच एखाद्या फलंदाजाने चौथ्या स्थानी इतक्या धावा फटकावल्या.

श्रेयसने चौथ्या क्रमांकावर आतापर्यंत ३४ सामन्यांत ५२च्या सरासरीने १,४५६ धावा केल्या आहेत. यामध्ये ४ शतके व ९ अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट दुसऱ्या सामन्यात परतण्याची शक्यता

विराट कोहली दुसऱ्या सामन्यात परतण्याची शक्यता आहे. त्याच्या गुडघ्याची सूज कमी झाली असल्याची माहिती गिलने दिली. शुक्रवारी सायंकाळी भारतीय संघ कटकला रवाना झाला. आता शनिवारी विराट सरावादरम्यान कसा खेळतो, यावरूनच पुढील आढावा घेता येईल. विराटचा गेल्या काही काळापासून धावांसाठी संघर्ष सुरू असल्याने एकदिवसीय प्रकारात त्याच्या दमदार पुनरागमनाची चाहते आस बाळगून आहेत.

बुमराच्या निकालाकडे आज लक्ष

तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) तंदुरुस्ती चाचणी पूर्ण केलेली आहे. त्याच्या पाठीचे स्कॅन्स काढण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुढील २४ ते ४८ तासांत तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात परतू शकेल की नाही, याचे उत्तर मिळेल. १२ फेब्रुवारीपर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेल्या संघात बदल करण्याची सर्वांना मुभा आहे. ३१ वर्षीय बुमराची जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीत पाठ दुखू लागल्याने त्याने मैदान सोडले होते.

logo
marathi.freepressjournal.in