गिल चौथा, पंत पाचवा; तिसरा कोण? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सुदर्शन किंवा नायरपैकी एकालाच मिळणार संधी

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता फक्त एका दिवसाचा अवधी शिल्लक आहे. हेडिंग्ले (लीड्स) येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचा फलंदाजी क्रम कसा असणार, याविषयी काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होती.
गिल चौथा, पंत पाचवा; तिसरा कोण? इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सुदर्शन किंवा नायरपैकी एकालाच मिळणार संधी
Published on

लीड्स : भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यासाठी आता फक्त एका दिवसाचा अवधी शिल्लक आहे. हेडिंग्ले (लीड्स) येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाचा फलंदाजी क्रम कसा असणार, याविषयी काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू होती. अखेर यष्टिरक्षक आणि उपकर्णधार ऋषभ पंतने बुधवारी याबाबत महत्त्वाची माहिती देताना कर्णधार शुभमन गिल चौथ्या, तर तो स्वत: पाचव्या स्थानी फलंदाजी करणार असल्याचे सांगितले. मात्र तिसऱ्या स्थानी कोणाला संधी द्यावी, हे अद्याप ठरलेले नाही.

२० जूनपासून गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या २०२५-२७च्या हंगामाला प्रारंभ करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या तारांकित फलंदाजांच्या निवृत्तीनंतर प्रथमच भारतीय संघ कसोटीच्या रणांगणात उतरणार आहे. त्यामुळे संपूर्ण दौऱ्यात भारतीय फलंदाजीकडे सर्वांचेच लक्ष असेल. एकीकडे इंग्लंडने दोन दिवसांपूर्वीच पहिल्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे भारताचा अंतिम संघ काय असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क बांधण्यात आले. त्यांपैकी सलामीला के. एल. राहुल व यशस्वी जैस्वाल यांचे स्थान पक्के आहे. मात्र तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोण खेळणार, याविषयी चर्चा सुरू आहे. अखेर पंतने तूर्तास चौथ्या व पाचव्या क्रमांकाचा तिडा सोडवला आहे.

“तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यावी, याविषयी अद्याप संघ व्यवस्थापनाची चर्चा सुरू आहे. मात्र चौथ्या व पाचव्या क्रमांकाचे ठरले आहे. गिल चौथ्या, तर मी पाचव्या स्थानी फलंदाजी करणार आहे. सहाव्या स्थानाविषयीसुद्धा सामन्याच्या आदल्या दिवशीच निर्णय घेण्यात येईल,” असे पंत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

“गिल व माझे संघाविषयी सातत्याने संभाषण सुरू असते. मैदानाबाहेरही आम्ही चांगले मित्र आहोत. त्यामुळे मैदानात आम्हाला एकत्रित निर्णय घेणे सोपे जाईल. तिसऱ्या क्रमांकासाठी उपलब्ध असलेल्या पर्यांयापैकी आम्ही प्रशिक्षक गौतम गंभीरशीही संवाद साधला आहे. साई सुदर्शन, करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन असे पर्याय आमच्याकडे आहेत,” असेही पंतने सांगितले.

२३ वर्षीय डावखुरा फलंदाज सुदर्शनने आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावत लक्ष वेधले. मुख्य म्हणजे टी-२० प्रकारातही त्याने केलेली फटकेबाजी नेत्रदीपक व कसोटीला साजेशी वाटली. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीनेही सर्वांचे लक्ष वेधले. इतकेच नव्हे तर स्थानिक हंगामात व इंग्लंडकडून कौंटी स्पर्धेत खेळल्याचाही अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे तोच या शर्यतीत अग्रेसर असल्याचे समजते. सुदर्शन ३ एकदिवसीय व १ टी-२० सामना खेळला आहे. मात्र यंदा त्याचे कसोटीत पदार्पण होऊ शकते.

दुसरीकडे ३३ वर्षीय अनुभवी फलंदाज करुण जवळपास ८ वर्षांनी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करत आहे. २०१७मध्ये अखेरची कसोटी खेळलेल्या करुणच्या नावावर कसोटीत त्रिशतक आहे. मात्र त्यानंतर कामगिरी खालावल्याने त्याने संघातील स्थान गमावले. यंदा आयपीएलमध्ये छाप पाडण्यासह त्याने रणजी ट्रॉफी, विजय हजारे या स्पर्धांमध्येही सातत्याने धावांच्या राशी उभारल्या. त्यामुळेच विदर्भाने रणजीचे जेतेपदही पटकावले. इतकेच नव्हे तर नुकताच इंग्लंड लायन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात भारत-अ संघाकडून खेळताना करुणने द्विशतक झळकावले. तसेच बुधवारी करुण स्लीपमध्येही झेल घेण्याचा सराव करताना दिसला. अशा स्थितीत करुणला तिसऱ्या अथव्या सहाव्या स्थानी संधी दिली जाऊ शकते.

तूर्तास, वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराजचे स्थान पक्के असून तिसरा पर्याय म्हणून प्रसिध कृष्णाला संधी मिळू शकते.

logo
marathi.freepressjournal.in