भारत-इंग्लंड कसोटी मालिका :कोहलीचा ‘का रे दुरावा’! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींमधून माघार

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तसेच पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या निवडीचा विचार करण्यात आला नाही.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका :कोहलीचा ‘का रे दुरावा’! इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींमधून माघार

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ‘का रे दुरावा’ कायम राहिला. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेणाऱ्या कोहलीने आता उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्येही वैयक्तिक कारणास्तव न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याच्या मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तसेच पाठीच्या दुखापतीमुळे त्याच्या निवडीचा विचार करण्यात आला नाही.

“वैयक्तिक कारणास्तव विराट उर्वरित कसोटी मालिकेसाठी उपलब्ध नव्हता. कोहलीच्या निर्णयाचा आम्ही सन्मान राखतो,” असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे. कोहली सध्या कौटुंबिक कारणास्तव परदेशात आहे. कोहलीने वैयक्तिक कारणामुळे न खेळण्याचा निर्णय घेतला असला तरी धरमशाला येथे ७ ते ११ मार्चदरम्यान होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याच्या समावेशाविषयी त्याच्याशी चर्चा केली जाणार आहे. तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवला जाणार आहे.

राष्ट्रीय निवड समितीने रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचा संघात समावेश केला असला तरी बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच त्यांचा अंतिम संघात समावेश करण्याविषयी निर्णय घेण्यात येणार आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. तर राहुलच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती.

श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबतीतचा अहवाल बीसीसीआयने अद्याप सादर केलेला नाही. श्रेयसला पुढील कसोटी सामन्यांसाठी डावलले जाणार होते, मात्र दुखापतीनंतर निवड समितीला हा निर्णय घेणे सोपे झाले. श्रेयसने बऱ्याच कालावधीपासून एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. तसेच भारतातील पाटा खेळपट्ट्यांवर तो ज्याप्रकारे बाद होत आहे, त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भविष्यात त्याचा कसोटी सामन्यांसाठी विचार केला जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

भारताच्या १७ सदस्यीय संघात एकमेव चेहरा समाविष्ट करण्यात आला आहे तो म्हणजे बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीप. प्रथम श्रेणी क्रिकेट तसेच इंग्लंड लायन्सविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारत अ संघाकडून चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. असे असले तरी आकाशला पदार्पणाची संधी मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. जडेजाच्या पुनरागमनामुळे डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमार याला संघातून वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, लोकेश राहुल, रजत पाटिदार, सर्फराझ खान, ध्रूव जुरेल, श्रीकर भारत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in