भारत-इंग्लंड कसोटी मालिका: इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचची माघार

राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी पाहुण्या इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका: इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लीचची माघार

नवी दिल्ली : भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आता राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी पाहुण्या इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार फिरकीपटू जॅक लीच याने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या उर्वरित दौऱ्यातून माघार घेतली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली.

३२ वर्षीय जॅक लीच याला हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. “इंग्लंड आणि सोमरसेटचा फिरकीपटू जॅक लीच आता भारताविरुद्धच्या उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. हैदराबाद येथील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघ विजयी ठरला होता, त्याच सामन्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जॅक लीचला दुखापतीला सामोरे जावे लागले होते. दुखापतीमुळे तो विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता,” असे ईसीबीच्या पत्रकात म्हटले आहे. लीच आता येत्या २४ तासांत मायदेशी रवाना होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in