युवांच्या कामगिरीने प्रभावित! विक्रमी विजयानंतर कर्णधार रोहितकडून यशस्वी, सर्फराझ, जुरेलचे कौतुक

भारतीय संघ विश्वातील कोणत्याही खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू शकतो. आम्ही खेळपट्टीविषयी तक्रार करण्यात कधीच उत्सुक नसतो
युवांच्या कामगिरीने प्रभावित! विक्रमी विजयानंतर कर्णधार रोहितकडून यशस्वी, सर्फराझ, जुरेलचे कौतुक

राजकोट : भारतीय संघाने रविवारी कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवताना इंग्लंडचा तब्बल ४३४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयाचे श्रेय कर्णधार रोहित शर्माने प्रामुख्याने युवा खेळाडूंना दिले. मिळालेल्या संधीचा पूरेपूर लाभ उचलून युवांनी कामगिरी उंचावल्याने आपण प्रभावित झालो आहोत, असे रोहित पत्रकार परिषदेत म्हणाला.

राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दिलेल्या ५५७ धावांच्या शिखराचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १२२ धावांत आटोपला. त्यामुळे भारताने चौथ्या दिवशी ४३४ धावांनी विक्रमी विजय नोंदवून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. उभय संघांतील चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवण्यात येईल. भारताने यापूर्वी २०२१मध्ये न्यूझीलंडला ३७२ धावांनी धूळ चारली होती. मात्र यंदा त्यापुढे जात त्यांनी विक्रमी विजय नोंदवला. मुंबईकर सर्फराझ खान, यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांनी पदार्पणाच्या सामन्यातच छाप पाडली. त्याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वालने सलग दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले. यामुळे ३६ वर्षीय रोहितने त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. तसेच रोहितने इन्स्टाग्रामवर या तिन्ही खेळाडूंचे छायाचित्र टाकताना त्याखाली ‘ये आज-कल के बच्चे’ असे कौतुकाच्या हेतूने कॅप्शन दिले आहे.

“युवा खेळाडूंसह अशाप्रकारे विक्रमी सामना जिंकणे खरच अभिमानास्पद बाब आहे. अनेक अनुभवी खेळाडू विविध कारणास्तव या मालिकेचा भाग नाहीत. तसेच तिसऱ्या कसोटीत संघात दोन पदार्पणवीर होते. याव्यतिरिक्त, संघातील ११ खेळाडूंच्या एकूण कसोटी सामन्यांचा अनुभवही फारसा नव्हता. मात्र तरीही आम्ही इंग्लंडवर वर्चस्व गाजवू शकलो, याचा आनंद आहे,” असे रोहित म्हणाला.

“हैदराबादमधील पराभवाद्वारे आम्ही शिकलो व विशाखापट्टणम येथे झोकात पुनरागमन केले. तिसऱ्या सामन्यात मात्र सर्फराझ, यशस्वी व जुरेल यांचा खेळ पाहून मी प्रभावित झालो. ते कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ सत्ता गाजवण्यासाठी सज्ज आहेत, असे दिसते. त्यांना संघातील अनुभवी खेळाडू वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत,” असेही रोहितने स्मित हास्याद्वारे सांगितले.

विराट कोहलीने या मालिकेतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी दुखापतींमुळे सामन्यांना मुकले. त्यामु‌ळे सर्फराझ, रजत पाटिदार, जुरेल यांना या मालिकेत पदार्पणाची संधी लाभली. तसेच कारकीर्दीतील अवघ्या तिसऱ्या कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत जबाबदारीने खेळ करताना दोन द्विशतकांसह सर्वाधिक ५४५ धावा केल्या आहेत.

गोलंदाजांकडे दुर्लक्ष करू नका!

भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रात जेव्हा डाव घोषित केला. त्यावेळी अवघ्या दीड सत्रात गोलंदाज इंग्लंडच्या संघाला गुंडाळतील, असा विचारही केला नव्हता, असे रोहितने प्राजंळपणे सांगितले. “गोलंदाजांच्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. चौथ्या दिवशीच ही कसोटी संपेल, असे मला वाटलेही नव्हते. आम्ही १२० षटकांचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून डाव घोषित करून इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र रवींद्र जडेजाने ५ गडी बाद केले, तर जसप्रीत बुमरा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज व कुलदीप यादव यांनीही आपापल्या परीने छाप पाडून ४० षटकांच्या आतच इंग्लंडला गुंडाळले,” असे रोहित म्हणाला. त्याशिवाय अश्विनच्या मानसिक कणखरतेची रोहितने स्तुती केली. अश्विनने वैयक्तिक कारणास्तव लढतीतून माघार घेतली होती. मात्र चौथ्या दिवशी तो पुन्हा खेळपट्टीवर परतला.

कोणत्याही खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू!

भारतीय संघ विश्वातील कोणत्याही खेळपट्टीवर वर्चस्व गाजवू शकतो. आम्ही खेळपट्टीविषयी तक्रार करण्यात कधीच उत्सुक नसतो, असे रोहितने ठामपणे सांगितले. “अशाप्रकारच्या खेळपट्ट्यांवर आम्ही यापूर्वीही खेळलो आहे. पहिल्या दिवसापासून चेंडू वळला अथवा पहिल्या दिवशी एखाद्या संघाने ४०० धावा केल्या, तरी आम्ही दोन्ही आ‌व्हानांसाठी सज्ज आहोत. गेल्या तीन्ही कसोटींमध्ये वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर आम्ही खेळलो. संघातील विविध खेळाडू गरजेनुसार जबाबदारी घेत असल्याने प्रतिकूल परिस्थितीतही सामन्याला कलाटणी देणे शक्य होते,” असेही रोहितने अखेरीस नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in