भारताने वर्चस्वाची संधी गमावली! चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ७ बाद ३०२

रांची येथील झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालेल्या या कसोटीसाठी भारतीय संघाने विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराऐवजी आकाशला पदार्पणाची संधी दिली.
भारताने वर्चस्वाची संधी गमावली! चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ७ बाद ३०२

रांची : वेगवान गोलंदाज आकाश दीपने (७० धावांत ३ बळी) पदार्पणातच केलेल्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवण्याची भारताला नामी संधी होती. मात्र त्यानंतर अनुभवी जो रूटने (२२६ चेंडूंत नाबाद १०६ धावा) झुंजार शतक साकारले. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ७ बाद ३०२ धावांपर्यंत मजल मारली.

रांची येथील झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालेल्या या कसोटीसाठी भारतीय संघाने विश्रांती देण्यात आलेल्या जसप्रीत बुमराऐवजी आकाशला पदार्पणाची संधी दिली. हाच भारतीय संघातील एकमेव बदल ठरला. उभय संघांतील पाच लढतींच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २-१ असा आघाडीवर असल्याने इंग्लंडवर दडपण आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकताच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

मात्र बंगालच्या २७ वर्षीय आकाशने इंग्लंडची पहिल्या तासाच भंबेरी उडवली. त्याने वैयक्तिक दुसऱ्याच षटकात झॅक क्रॉलीचा त्रिफळा उडवला होता. मात्र दुर्दैवाने तो चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. यानंतर क्रॉली व बेन डकेट यांनी आक्रमण केले. मात्र तरीही १४०च्या गतीने गोलंदाजी करणारा आकाश घाबरला नाही. अखेर १०व्या षटकात ४७ धावा झालेल्या असताना डकेटच्या रूपात त्याने भारताला पहिले यश मिळवून दिले. डकेट ११ धावांवर यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल देऊन माघारी परतला. दोन चेंडूंच्या अंतरात आकाशने ओली पोपला शून्यावरच पायचीत पकडले. मग दोन षटकांनंतर त्याने क्रॉलीचा पुन्हा त्रिफळा उद्ध्वस्त केला. क्रॉलीने ६ चौकार व १ षटकारासह ४२ धावा केल्या.

३ बाद ५७ स्थितीतून रूट व जॉनी बेअरस्टो यांची जोडी जमली. बेअरस्टोने आक्रमण केले, तर रूट यावेळी त्याच्या नैसर्गिक संयमी शैलीत खेळताना दिसला. मालिकेत आतापर्यंत ३ सामन्यांत रूटने फक्त ७७ धावा केल्या होत्या. मात्र शुक्रवारी तो पुन्हा खडूस वृत्तीप्रमाणे खेळताना दिसला. रूट-बेअरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भर घातल्यावर रविचंद्रन अश्विनने बेअरस्टोला पायचीत पकडले. बेअरस्टोने ३५ चेंडूंत ३८ धावा फटकावल्या. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या एका कमी उंचीच्या चेंडूवर स्टोक्स फसला व ३ धावांवरच माघारी परतला. त्यामुळे उपाहारालाच इंग्लंडची ५ बाद ११२ अशी दारुण अवस्था होती.

दुसऱ्या सत्रात इंग्लंडला गुंडाळून पहिल्या दिवशीच फलंदाजी करण्याची भारताकडे संधी होती. मात्र रूट व बेन फोक्स यांनी संपूर्ण संत्र खेळून काढताना ८६ धावा केल्या. त्यामुळे चहापानापर्यंत इंग्लंडने ५ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यान रूटने अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या सत्रात या दोघांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. अखेर २२५ धावांवर मोहम्मद सिराजने फोक्सचा (४७) अडसर दूर करून ११३ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. मग टॉम हार्टलीलासुद्धा (१३) सिराजनेच त्रिफळाचीत केले.

७ बाद २४५ धावांवरून रूटने ओली रॉबिन्सनला साथीला घेत संघाला ३०० धावांपलीकडे नेले. ८४व्या षटकात आकाशला चौकार लगावून त्याने कसोटी कारकीर्दीतील ३१वे शतक झळकावले. गेल्या १५ डावांतील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. तिसऱ्या सत्रापर्यंत भारताने तिन्ही रिव्ह्यू गमावले, तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही काहीसे मंदावले. याचा लाभ घेत रूट व रॉबिन्सन यांनी आठव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली आहे. रूट ९ चौकारांसह १०६, तर रॉबिन्सन ४ चौकार व १ षटकारासह ३१ धावांवर नाबाद खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ९० षटकांत ७ बाद ३०२ (जो रूट नाबाद १०६, बेन फोक्स ४७, ओली रॉबिन्सन नाबाद ३१; आकाश दीप ३/७०, मोहम्मद सिराज २/६०)

यश वडिलांना समर्पित!

जवळपास ३ वर्षांपूर्वी वडिलांना पक्षघाताचा झटका आला होता. त्यानंतर वडील आणि भावाचे दोन महिन्यांच्या अंतरात निधन झाल्यामुळे आमचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होतो. मी आयुष्यात स्वत:च्या बळावर नाव कमावून दाखवावे, अशी वडिलांची इच्छा होती. भारतीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी लाभल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हे यश मी माझ्या वडिलांना समर्पित करतो.

- आकाश दीप, भारतीय गोलंदाज

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in