फिरकीपुढे भारताची भंबेरी! दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद २१९ अशी अवस्था; यशस्वीची अर्धशतकी झुंज

झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत इंग्लंडने ७ बाद ३०२ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला.
फिरकीपुढे भारताची भंबेरी! दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद २१९ अशी अवस्था; यशस्वीची अर्धशतकी झुंज

रांची : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांची फिरकीच्या जाळ्यात कोंडी झाली. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताची ७३ षटकांत ७ बाद २१९ अशी स्थिती असून ते पहिल्या डावात अद्याप १३४ धावांनी पिछाडीवर आहेत. ऑफस्पिनर शोएब बशीरने चार, तर डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टलीने दोन गडी बाद करून इंग्लंडला सामन्यावर पकड मिळवून दिली आहे. भारताकडून डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने ११७ चेंडूंत ७३ धावांची झुंजार खेळी साकारली.

झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत इंग्लंडने ७ बाद ३०२ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. जो रूट व ओली रॉबिन्सन यांनी अर्धा तास सहज फलंदाजी करतानाच आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. मालिकेत प्रथमच संधी मिळालेल्या रॉबिन्सनने कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारताना ९ चौकार व १ षटकार लगावला. अखेर रवींद्र जडेजाला रिव्हर्स स्वीप करण्याच्या प्रयत्नात रॉबिन्सन फसला व ३४७ धावांवर इंग्लंडने आठवा बळी गमावला. त्याच षटकात बशीरही शून्यावर माघारी परतला. मग जडेजानेच दोन षटकांच्या अंतरात जेम्स अँडरसनला शून्यावर पायचीत पकडून इंग्लंडचा डाव १०४.५ षटकांत ३५३ धावांत गुंडाळला. रूट १० चौकारांसह १२२ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जडेजाने चार, आकाश दीपने तीन, मोहम्मद सिराजने दोन व रविचंद्रन अश्विनने एक बळी मिळवला.

त्यानंतर भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा २ धावांवरच अँडरसनचा शिकार ठरला. त्यानंतर शुभमन गिल व यशस्वी यांनी उपहारापर्यंत अधिक पडझड होऊ दिली नाही. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. मात्र २० वर्षीय बशीरचे गोलंदाजीसाठी आगमन झाले व भारताचा डाव गडगडला. बशीरने सर्वप्रथम गिलला ३८ धावांवर पायचीत पकडले. मग रजत पाटीदार (१७) व जडेजा (१२) यांना त्याने लागोपाठच्या षटकांत बाद केले. पाटीदार सलग पाचव्या डावांत अपयशी ठरला. त्याने अद्याप एकाही डावात ४० धावासुद्धा केलेल्या नाहीत. तर जडेजा २ षटकार लगावूनही आक्रमण करण्याच्या नादात फसला.

दुसऱ्या बाजूने यशस्वीने कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक साकारले. यशस्वी व सर्फराझ खान या मुंबईकरांनी पाचव्या विकेटसाठी ३१ धावांची भर घातली. यशस्वी आणखी एक शतक साकारणार, असे वाटले. मात्र बशीरच्या एका खाली बसलेल्या चेंडूवर यशस्वी 'प्लेड ऑन' झाला. त्याने ८ चौकार व १ षटकार लगावला. ठराविक अंतराने हार्टलीने सर्फराझचा (१४) अडसर दूर केला. तर अश्विनही हार्टलीच्या गोलंदाजीवर १ धावेवरच पायचीत झाला. ७ बाद १७७ धावांवरून यष्टिरक्षक ध्रुव जुरेल व कुलदीप यादव यांनी शेवटचा पाऊणतास खेळून काढताना आठव्या विकेटसाठी ४२ धावांची उपयुक्त भागीदारी रचली आहे. दिवसअखेर जुरेल ३०, तर कुलदीप १७ धावांवर नाबाद आहे. बशीरने कारकीर्दीत प्रथमच डावात ४ बळी पटकावले असून तिसऱ्या दिवशी त्याच्याविरुद्ध भारताचे उर्वरित फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहणे रंजक ठरेल.

यशस्वीची विक्रमांची रांग

यशस्वीने ७३ धावांच्या खेळीदरम्यान असंख्य विक्रमांची रांग लावली. त्याने मालिकेत ६०० धावांचा टप्पा पार केला. यशस्वीने इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांतील आतापर्यंतच्या ७ डावांत एकूण ६१८ धावा केल्या आहेत.

याबरोबरच एका कसोटी मालिकेत ६०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. यापूर्वी सुनील गावसकर, विराट कोहली, दिलीप सरदेसाई आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला होता.

एका कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गावसकर (७७४) यांच्या नावावर आहे, तर विश्वभरातील फलंदाजांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन या यादीत अग्रस्थानी आहेत. त्यांनी १९३०मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच मालिकेतील पाच कसोटींमध्ये तब्बल ९७४ धावा कुटल्या होत्या.

त्याशिवाय यशस्वी हा भारताकडून एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज ठरला. त्याने सौरव गांगुलीचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. गांगुलीने २००७मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५३४ धावा केल्या होत्या.

अँडरसनच्या कसोटी कारकीर्दीतील बळींची संख्या ६९७ झाली असून ७००च्या आकड्यापासून तो फक्त ३ विकेट्स दूर आहे.

यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत ६१८ धावा केल्या असून यामध्ये दोन द्विशतके व दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

कारकीर्दीतील दुसराच सामना खेळणाऱ्या बशीरने सलग ३२ षटके गोलंदाजी केली. त्याने दुसऱ्या सत्रात एका एंडने १२, तर तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून सलग २० षटके गोलंदाजी केली.

logo
marathi.freepressjournal.in