शतक यशस्वीचे,वर्चस्व भारताचे! तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे तब्बल ३२२ धावांची आघाडी

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात ५१ षटकांत २ बाद १९६ धावांपर्यंत मजल मारली आहे.
शतक यशस्वीचे,वर्चस्व भारताचे! तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे तब्बल ३२२ धावांची आघाडी

राजकोट : भारत-इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार होता. त्यातच फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या माघारीमुळे भारतावर अधिक दडपण आले. मात्र गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीला मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या (१३३ चेंडूंत १०४ धावा रिटायर्ड हर्ट) शानदार शतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने शनिवारी तिसऱ्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतानाच तब्बल ३२२ धावांची आघाडी मिळवली आहे.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताने दुसऱ्या डावात ५१ षटकांत २ बाद १९६ धावांपर्यंत मजल मारली आहे. शुभमन गिल (१२० चेंडूंत नाबाद ६५) आणि नाइट वॉचमन कुलदीप यादव (१५ चेंडूंत ३ धावा) हे दोघे खेळपट्टीवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा (१९) दुसऱ्या डावात लवकर बाद झाला, तर रजत पाटिदार भोपळाही फोडू शकला नाही. जो रूटने रोहितला पायचीत पकडले, तर टॉम हार्टलीने पाटिदारला बाद केले. मात्र यशस्वी व गिल या युवांनी रचलेल्या दीडशतकी भागीदारीच्या बळावर भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.

मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या यशस्वीने ८० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मग जेम्स अँडरसन व हार्टलीच्या लागोपाठच्या षटकात एकूण चार षटकार वसूल करून त्याने १२२व्या चेंडूवर सलग दुसरे शतक साकारले. गेल्या सामन्यात यशस्वीने द्विशतक झळकावले होते. दुसऱ्या बाजूने गिलनेसुद्धा पहिल्या डावातील अपयश बाजूला सारून दमदार फटकेबाजी केली. त्याने ६ चौकार व २ षटकारांसह कसोटी कारकीर्दीतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. गिल व यशस्वीने दुसऱ्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचल्यावर पाठदुखीमुळे यशस्वी रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने ९ चौकार व २ षटकार लगावले आहेत. रविवारी यशस्वी पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वी माघारी परतल्यावर पाटिदार पुन्हा एकदा अपयशी ठरला. दोन कसोटींत त्याने फक्त ४६ धावा केल्या आहेत. त्यानंतर मात्र गिल व कुलदीपने उर्वरित ४ षटके खेळून काढली. रविवारी किमान दुसऱ्या सत्रापर्यंत फलंदाजी करून भारतीय संघ इंग्लंडपुढे विजयासाठी ४०० ते ४५० धावांचे लक्ष्य ठेवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

तत्पूर्वी, शुक्रवारच्या २ बाद २०७ धावांवरून पुढे खेळताना इंग्लंडचा पहिला डाव ७१.१ षटकांत ३१९ धावांत संपुष्टात आला. शतकवीर बेन डकेट व रूट यांनी सुरुवातीचा अर्धा तास संयमाने खेळ केला. मात्र जसप्रीत बुमराला रिव्हर्स स्कूपचा फटका लगावण्याच्या प्रयत्नात रूट १८ धावांवर बाद झाला. तेथून इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. चायनामन फिरकीपटू कुलदीपने पुढच्याच षटकात जॉनी बेअरस्टोला शून्यावर पायचीत पकडले. डकेटने दीडशतक साकारले, मात्र त्यानंतर लगेचच तो कुलदीपच्या गोलंदाजीवर फसला. त्याने २३ चौकार व २ षटकारांसह १५१ चेंडूंत १५३ धावा केल्या. उपाहाराला इंग्लंडची ५ बाद २९० अशी स्थिती होती. बुमरा-कुलदीपने सलग १४ षटके एकत्रित गोलंदाजी केली.

दुसऱ्या सत्रात मग मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजाने सूत्रे हाती घेतली. कर्णधार बेन स्टोक्स (४१) षटकार लगावण्याच्या प्रयत्नात जडेजाचा शिकार ठरला. तर सिराजने बेन फोक्सचा (१३) अडथळा दूर केला. सिराजनेच मग रेहान अहमद व अँडरसनचा त्रिफळा उडवून इंग्लंडच्या डावाला पूर्णविराम लावला. सिराजने एकूण ४ बळी मिळवले. त्याला जडेजा, कुलदीपने प्रत्येकी दोन, तर बुमरा व अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद करून उत्तम साथ दिली. २ बाद २२४ वरून ९५ धावांतच इंग्लंडने ८ फलंदाज गमावले. त्यामुळे भारताला पहिल्या डावात १२६ धावांची मोठी आघाडी मिळाली.

सिराजने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १५० बळींचा टप्पा पार केला. फोक्स त्याचा १५०वा शिकार ठरला. कसोटी प्रकाराचा विचार करता सिराजचे २५ सामन्यांत ७२ बळी आहेत.

जडेजाने मायदेशातील कसोटींमध्ये २०० बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला. यापूर्वी कपिल देव, अनिल कुंबळे, हरभजन सिंग व रविचंद्रन अश्विन यांनी अशी कामगिरी केली आहे.

यशस्वीने १३ डावांत (इनिंग) कसोटीतील तिसरे शतक साकारले. याबाबतीत त्याने वीरेंद्र सेहवाग व संजय मांजरेकर यांची बरोबरी साधली. त्या दोघांनीही कारकीर्दीतील पहिल्या तीन कसोटींसाठी फक्त १३ डाव घेतले होते.

यशस्वीने या मालिकेत सर्वाधिक ४२५ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंतच्या पाच डावांत अनुक्रमे ८०, १५, २०९, १७, १०४* अशी कामगिरी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : सर्व बाद ४४५

इंग्लंड (पहिला डाव) : ७१.१ षटकांत सर्व बाद ३१९ (बेन डकेट १५३, बेन स्टोक्स ४१; मोहम्मद सिराज ४/८४)

भारत (दुसरा डाव) : ५१ षटकांत २ बाद १९६ (यशस्वी जैस्वाल रिटायर्ड हर्ट १०४, शुभमन गिल नाबाज ६५; टॉम हार्टली १/४२)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in