भारत-इंग्लंड कसोटी मालिका: डकेटचा शतकी डंका! दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड २ बाद २०७; अद्याप २३८ धावांनी पिछाडीवर

इंग्लंडने मग नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. डकेट व झॅक क्रॉली यांनी मालिकेत चौथ्यांदा अर्धशतकी सलामी नोंदवली.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका: डकेटचा शतकी डंका! दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंड २ बाद २०७; अद्याप २३८ धावांनी पिछाडीवर

राजकोट : इंग्लंडचा डावखुरा सलामीवीर बेन डकेटने (११८ चेंडूंत नाबाद १३३ धावा) शुक्रवारी धडाकेबाज शतक साकारले. ‘बॅझबॉल’ शैलीत केलेल्या फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ३५ षटकांतच २ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या या दिवशी ३७ वर्षीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने मात्र कसोटी कारकीर्दीतील ५०० बळींचा टप्पा पूर्ण करण्याची किमया साधली.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीत इंग्लंड पहिल्या डावात अद्याप २३८ धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेर २९ वर्षीय डकेट १३३, तर अनुभवी जो रूट ९ धावांवर खेळत आहे. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २५ धावांची भर घातली आहे. त्यामुळे भारताचे गोलंदाज शनिवारी डकेटसह इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांना किती धावांत रोखणार, हे पाहणे रंजक ठरेल. उभय संघांतील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे.

तत्पूर्वी, गुरुवारच्या ५ बाद ३२६ धावांवरून पुढे खेळताना भारताचा पहिला डाव १३०.५ षटकांत ४४५ धावांत संपुष्टात आला. नाइट-वॉचमन कुलदीप यादव ४ धावांवर जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याच्याच पुढील शतकात रूटने शतकवीर रवींद्र जडेजाचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेतला. जडेजाने ९ चौकार व २ षटकारांसह ११२ धावा केल्या. ७ बाद ३३१ धावांवरून पदार्पणवीर ध्रुव जुरेल व अश्विन यांनी डोलारा सावरत उपहारापर्यंत संघाला ३८८ धावांपर्यंत नेले. अश्विन व जुरेल यांनी आठव्या विकेटसाठी ७७ धावांची निर्णायक भागीदारी रचली. लेगस्पिनर रेहान अहमदने अश्विनला (३७) बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना जुरेलही आक्रमण करण्याच्या नादात माघारी परतला. रेहाननेच त्याला जाळ्यात अडकवले. जुरेलने २ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या.

९ बाद ४१५ धावांवरून मग जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज या अखेरच्या जोडीने चाहत्यांचे मनोरंजन करतानाच उपयुक्त ३० धावांची भर घातली. विशेषत: बुमराने ३ चौकार व १ षटकार लगावून २८ चेंडूंत २६ धावा फटकावल्या. अखेर वेगवान गोलंदाज मार्क वूडने त्याला पायचीत पकडून १३१व्या षटकात भारताचा डाव संपुष्टात आणला. सिराज ३ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी वूडने सर्वाधिक चार, तर रेहानने दोन बळी मिळवले.

इंग्लंडने मग नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. डकेट व झॅक क्रॉली यांनी मालिकेत चौथ्यांदा अर्धशतकी सलामी नोंदवली. या दोघांनी १३ षटकांतच ८९ धावा फटकावल्या. कुलदीप व सिराजच्या गोलंदाजीवर त्यांनी मुक्तपणे धावा लुटल्या. अखेर १४व्या षटकात अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. लेगस्टम्पच्या बाहेरील चेंडूवर स्वीप करण्याच्या नादात क्रॉली फसला व त्याचा झेल शॉर्ट फाईन लेगवरील रजत पाटिदारने टिपला. अश्विनच्या कारकीर्दीतील हा ५००वा बळी ठरल्याने संपूर्ण संघाने त्याच्या दिशेने धाव घेत एकच जल्लोष केला.

मात्र भारतीय खेळाडूंसाठी हा आनंद फार काळ टिकला नाही. तिसऱ्या क्रमांकावरील ओली पोपने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक पवित्रा घेत डकेटला सुयोग्य साथ दिली. या दोघांनी भारताच्या सर्वच गोलंदाजांच्या प्रत्येक षटकात ५ ते ६च्या सरासरीने धावा वसूल केल्या. ८८व्या चेंडूवर चौकार लगावून डकेटने थाटात शतक साकारले. त्याने पोपसह दुसऱ्या विकेटसाठी १०० चेंडूंतच ९३ धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताला दिवसभरात आणखी यश मिळू देणार नाही, असे वाटत असतानाच सिराजने पोपला ३९ धावांवर पायचीत पकडले. त्यानंतर रूट व डकेट यांनी उर्वरित षटके खेळून काढली. २१ चौकार व २ षटकारांसह कसोटीतील तिसरे व भारताविरुद्धचे पहिले शतक साकारणारा डकेट खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. त्यामुळे शनिवारी त्याला लवकर बाद करण्यासह बेन स्टोक्स, रूट यांना रोखून धावगतीवरही अंकुश ठेवणे भारताच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : १३०.५ षटकांत सर्व बाद ४४५ (रोहित शर्मा १३१, रवींद्र जडेजा ११२, सर्फराझ खान ६२, ध्रुव जुरेल ४६; मार्क वूड ४/११४)

इंग्लंड (पहिला डाव) : ३५ षटकांत २ बाद २०७ (बेन डकेट नाबाद १३३, ओली पोप ३९; रविचंद्रन अश्विन १/३७, मोहम्मद सिराज १/५४)

logo
marathi.freepressjournal.in