भारत-इंग्लंड कसोटी मालिका; गिलवरून 'गदारोळ'! युवा फलंदाजाचे भारताच्या कसोटी संघातील स्थान धोक्यात

गेल्या काही काळापासून गिलने कसोटी प्रकारात सातत्याने निराश केले आहे. त्यातच कसोटीत तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला फार महत्त्व असल्याने गिलच्या सुमार कामगिरीचा परिणाम भारताच्या कामगिरीवरही होत असल्याची चर्चा सगळीकडे रंगत आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका; गिलवरून 'गदारोळ'! युवा फलंदाजाचे भारताच्या कसोटी संघातील स्थान धोक्यात

हैदराबाद : २४ वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिल भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही काळापासून गिलने कसोटी प्रकारात सातत्याने निराश केले आहे. त्यातच कसोटीत तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला फार महत्त्व असल्याने गिलच्या सुमार कामगिरीचा परिणाम भारताच्या कामगिरीवरही होत असल्याची चर्चा सगळीकडे रंगत आहे.

गिलच्या जागी अन्य एका युवा खेळाडूला संधी द्यावी. गिलला जितक्या संधी मिळाल्या, तितक्या अनुभवी खेळाडूंना देण्यात आलेल्या नाहीत, अशी टिपण्णी काही माजी क्रिकेटपटूंनी केली. मात्र काहींनी गिलची पाठराखण करताना त्याला पुन्हा एकदा सलामीला पाठवावे, असेही काहींनी सुचवले आहे. इंग्लंडने भारताला पहिल्या कसोटीत २८ धावांनी नमवून पाच लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उभय संघांतील दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येईल.

डिसेंबर २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे लढतीद्वारे गिलने कसोटीत पदार्पण केले. त्यानंतर २०२३पर्यंत तो कसोटीतही भारताचा उत्तम सलामीवीर म्हणून उदयास आला. मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी तसेच आफ्रिकेविरुद्धची मालिका व इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर गिलच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गिलने २१ कसोटींमध्ये फक्त २९.५२च्या सरासरीने १,०६३ धावा केल्या आहेत.

त्यातच जुलैमध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून गिलने स्वत:च त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यामुळे रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल अशी नवी सलामी जोडी भारतासाठी मैदानात उतरली. तेव्हापासून गिलने ११ कसोटींमध्ये एकही अर्धशतक साकारलेले नाही. अहमदाबाद येथे मार्चमध्ये गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर त्याची सर्वाधिक धावसंख्या ही फक्त ३६ आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दोन डावांत गिल अनुक्रमे २३ व ० धावांवर बाद झाला. गेल्या १० डावांत गिलने अनुक्रमे ६, १०, नाबाद २९, २, २६, ३६, १०, २३, ० अशा धावा केल्या आहेत.

पुजाराला इतकी संधी का नाही?

गिलने स्वत:हून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने ढासळली आहे. पुजाराला इतकी संधी देण्यात नव्हती आली, असे मला वाटते. पुजारा अद्यापही तिसऱ्या क्रमांकासाठी योग्य खेळाडू आहे. मात्र गिलने दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी साकारून स्वत:ला सिद्ध करावे. - अनिल कुंबळे

गिलने सलामीला फलंदाजीस यावे!

गिल व यशस्वी यांनी भारतासाठी सलामीला यावे. रोहित फिरकीला अधिक चांगल्या प्रकारे खेळू शकतो. त्यामुळे त्याने तिसऱ्या स्थानी फलंदाजी करावी. फलंदाजीसाठी थांबून राहणे गिलला जमत नसल्याचे दिसते. कसोटीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज फार महत्त्वाचा असतो. गिल सध्या त्या आव्हानासाठी सज्ज दिसत नाही.

- वासिम जाफर आणि सरणदीप सिंग

गिलविषयी चर्चा निष्फळ!

गिलविषयी उगाच अतिरिक्त चर्चा रंगत आहे. त्याच्यावर दडपण असेल, हे मान्य आहे. मात्र तो युवा असून या आव्हानांवर मात करूनच तो सावरेल. त्याच्या संघातील स्थानाविषयी चर्चा करू नये. तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटींमध्येही तिसऱ्या स्थानीच फलंदाजी करेल.

- झहीर खान

गरज पडल्यास चार फिरकीपटू खेळवू -मॅकलम

विशाखापट्टणम : इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक ब्रँडन मॅकलमने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसापासूनच फिरकीला पोषक खेळपट्टी असेल, तर आपण चार फिरकीपटूंना खेळवू, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे टॉम हार्टली, जॅक लीच, रेहान अहमद यांच्यासह ऑफस्पिनर शोएब बशीरही संघात खेळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत आपण मार्क वूडला संघाबाहेर ठेवू, असेही मॅकलम स्पष्टपणे म्हणाला.

रोहितचा सुवर्ण काळ संपला -बॉयकॉट

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा फलंदाजीतील सुवर्ण काळ आता संपलेला आहे. त्यातच विराट कोहली दुसऱ्या कसोटीसाठीही अनुपलब्ध असल्याने इंग्लंडला १२ वर्षांनी भारतात कसोटी मालिका जिंकण्याच्या दिशेने कूच करण्याची उत्तम संधी आहे, असे मत इंग्लंडचे माजी सलामीवीर जेफ्री बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. ३६ वर्षीय रोहितने गेल्या चार वर्षांत मायदेशात दोनच कसोटी शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याने मोठी खेळी साकारावी, असेही बॉयकॉट यांनी सुचवले.

logo
marathi.freepressjournal.in