भारत-इंग्लंड कसोटी मालिका: भारताला विजयी आघाडीचे वेध

हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या इंग्लंडने बाजी मारली. मात्र त्यानंतर भारताने विशाखापट्टणम व राजकोट येथे साहेबांचा पूर्णपणे धुव्वा उडवला
भारत-इंग्लंड कसोटी मालिका: भारताला विजयी आघाडीचे वेध

रांची : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेण्याची उत्तम संधी आहे. उभय संघांतील पाच लढतींच्या मालिकेतील चौथी कसोटी शुक्रवारपासून रांची येथे खेळवण्यात येईल. त्यामुळे बॅझबॉलला पूर्णपणे निष्प्रभ करून भारत सलग तिसरा सामना जिंकणार का, याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागून आहे. झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होणार असून तिसऱ्या व चौथ्या दिवशी येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हैदराबादला झालेल्या पहिल्या कसोटीत बेन स्टोक्सच्या इंग्लंडने बाजी मारली. मात्र त्यानंतर भारताने विशाखापट्टणम व राजकोट येथे साहेबांचा पूर्णपणे धुव्वा उडवला. त्यातच तिसरी कसोटी ४३४ धावांच्या विक्रमी फरकाने जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयय अय्यर, मोहम्मद शमी यांसारखे खेळाडू दुखापत तसेच विविध कारणास्तव संघाबाहेर असूनही युवा खेळाडूंच्या जोरावर भारताने इंग्लंडला हैराण केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अननुभवी फलंदाजांसह फिरकीपटूंवर भारताची भिस्त असेल. जसप्रीत बुमराला या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली असल्याने गोलंदाजीतही आता नवा चेहरा पाहायला मिळू शकतो.

रांचीच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. येथे झालेल्या दोन कसोटींपैकी भारताने एक लढत जिंकली आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ या कामगिरीत सातत्य राखेल, असे अपेक्षित आहे.

मुंबईच्या त्रिकुटाकडून अपेक्षा

कर्णधार रोहित, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराझ खान या मुंबईतील तीन खेळाडूंवर प्रामुख्याने भारताच्या फलंदाजीची मदार असेल. रोहितने गेल्या सामन्यात शतक साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले, तर सलग दोन द्विशतके झळकावणारा यशस्वीचा इंग्लंडने धसकाच घेतला आहे. मालिकेत यशस्वीने सर्वाधिक ५४५ धावा केल्या आहेत. त्याशिवाय गेल्या लढतीत पदार्पण करणाऱ्या सर्फराझने दोन्ही डावांत अर्धशतक झळकावून आपले कौशल्य सिद्ध केले. याव्यतिरिक्त, शुभमन गिल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजाही लयीत आहेत. फक्त दोन सामन्यांत अवघ्या ४६ धावा करणाऱ्या रजत पाटिदारऐवजी देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

बुमराच्या अनुपस्थितीत फिरकीपटूंकडे लक्ष

बुमरा या कसोटीत खेळणार नसल्याने मोहम्मद सिराजसह दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून आकाशदीप सिंग किंवा मुकेश कुमारला संधी मिळेल. तूर्तास, २७ वर्षीय आकाशदीपला पदार्पण देण्यात येणार असल्याचे समजते. रविंचंद्रन अश्विन, जडेजा व कुलदीप यादव हे फिरकी त्रिकूट भारतासाठी मोलाचे ठरेल. अश्विन (११), जडेजा (१२), कुलदीप (८) यांनी तीन कसोटींमध्ये ३१ बळी मिळवले आहेत. अक्षर पटेलला मात्र पुन्हा संघाबाहेर राहावे लागेल, असे दिसते. बुमराने एकट्याने तीन सामन्यांत १७ गडी बाद केले होते. त्यामुळे त्याची उणीव संघाला भासू शकते.

बशीर, रॉबिन्सनला संधी; वूड, रेहानला विश्रांती

इंग्लंडने या लढतीसाठीसुद्धा एक दिवस अगोदरच अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार लेगस्पिनर रेहान अहमद व वेगवान गोलंदाज मार्क वूड यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी ऑफस्पिनर शोएब बशीर व ऑली रॉबिन्सन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. रूट व जॉनी बेअरस्टोचे अपयश इंग्लंडला फलंदाजीत महागात पडत आहे. रूटने या मालिकेत फक्त ७७ धावा केल्या आहेत, त्याउलट १०७ षटके गोलंदाजी केली आहे. तर बेअरस्टोने तीन सामन्यांत १०२ धावा केल्या आहेत.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रजत पाटिदार, मुकेश कुमार, आकाशदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, जो रूट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, शोएब बशीर, टॉम हार्टली, जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन.

वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in