भारत-इंग्लंड कसोटी मालिका:भारत १७५धावांनी आघाडीवर; दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१ धावांपर्यंत मजल

गुरुवारच्या १ बाद ११९ धावांवरून पुढे खेळताना भारताने यशस्वी जैस्वालला (८०) दिवसाच्या पहिल्याच षटकात गमावले.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका:भारत १७५धावांनी  आघाडीवर; दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१ धावांपर्यंत मजल

हैदराबाद : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भक्कम आघाडी मिळवताना विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. के. एल. राहुल (१२३ चेंडूंत ८६ धावा) आणि रवींद्र जडेजा (१५५ चेंडूंत नाबाद ८१ धावा) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर ११० षटकांत ७ बाद ४२१ धावांपर्यंत मजल मारली असून ते १७५ धावांनी आघाडीवर आहेत.

राजीव गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर जडेजा ८१, तर अक्षर पटेल ६२ चेंडूंत ३५ धावांवर खेळत आहे. या डावखुऱ्या जोडीने आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी रचली आहे. त्यामुळे शनिवारी भारतीय संघ आणखी आघाडी वाढवून इंग्लंडवर डावाच्या फरकाने विजय मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल. इंग्लंडकडून ऑफस्पिनर जो रूट आणि डावखुरा फिरकीपटू टॉम हार्टली यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत.

गुरुवारच्या १ बाद ११९ धावांवरून पुढे खेळताना भारताने यशस्वी जैस्वालला (८०) दिवसाच्या पहिल्याच षटकात गमावले. रूटने त्याला बाद केले. त्यानंतर शुभमन गिलही (२३) मोठी खेळी साकारू शकला नाही. राहुलने मात्र संयमी फलंदाजी करताना ८ चौकार व २ षटकारांसह कारकीर्दीतील १४वे अर्धशतक झळकावले. मुंबईकर श्रेयस अय्यरसह त्याने चौथ्या विकेटसाठी ६४ धावांची भर घातली.

श्रेयस ३५ धावांवर बाद झाल्यावर राहुलने सहाव्या स्थानी आलेल्या जडेजासह सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. हार्टलीने राहुलचा अडथळा दूर केला. मग जडेजाने सूत्रे हाती घेत यष्टिरक्षक के. एस. भरतसह ६८ धावांची भागीदारी केली. ४१ धावा करणाऱ्या भरतला रूटने पायचीत पकडले. रविचंद्रन अश्विन १ धावेवरच धावचीत झाला. ७ बाद ३५८ धावांवरून मग जडेजा व अक्षरने आणखी पडझड होऊ न देता भारताला ४०० धावांचा पल्ला गाठून दिला. जडेजाने ७ चौकार व २ षटकारांसह कसोटीतील २०वे अर्धशतक साकारले. अक्षरने ५ चौकार व १ षटकारासह ३५ धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : ६४.३ षटकांत सर्व बाद २४६ (बेन स्टोक्स ७०, जॉनी बेअरस्टो ३७; रविचंद्रन अश्विन ३/६८, रवींद्र जडेजा ३/८८)

भारत (पहिला डाव) : ११० षटकांत ७ बाद ४२१ (के. एल. राहुल ८६, रवींद्र जडेजा नाबाद ८१, यशस्वी जैस्वाल ८०; जो रूट २/७७)

logo
marathi.freepressjournal.in