राहुल तिसऱ्या कसोटीलाही मुकणार, पायाच्या दुखापतीतून सावरण्यास विलंब; पडिक्कलचा संघात समावेश

भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुल पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे.
राहुल तिसऱ्या कसोटीलाही मुकणार, पायाच्या दुखापतीतून सावरण्यास विलंब; पडिक्कलचा संघात समावेश

राजकोट : भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुल पायाच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्याच्या जागी डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून सध्या या मालिकेत उभय संघांत १-१ अशी बरोबरी आहे. राजकोट येथे १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी खेळवण्यात येईल. विराट कोहली, मोहम्मद शमी, श्रेयस उर्वरित मालिकेला मुकणार असल्याने किमान राहुल तरी तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त होईल, असे अपेक्षित होते. मात्र ३१ वर्षीय राहुलला पहिल्या कसोटीत उजव्या पायाला दुखापत झाली. त्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे आता थेट चौथ्या कसोटीतच तो खेळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, डावखुरा अष्टपैलू रवींद्र जडेजाने सरावाला प्रारंभ केला असून त्याचे संघातील पुनरागमन पक्के मानले जात आहे. जडेजा व राहुल दोघेही दुसऱ्या कसोटीला मुकले होते. दुसरीकडे २३ वर्षीय पडिक्कलने नुकताच रणजी स्पर्धेतील दोन सामन्यांत शतके झळकावली. तसेच इंग्लंड लायन्स संघाविरुद्धही त्याने शतक साकारले. तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे खेळाडू सोमवारी राजकोट येथे दाखल झाले. भारतीय संघ येथे दोन दिवसांपूर्वीच पोहोचला असून त्यांनी सरावाला प्रारंभ केलेला आहे.

जडेजा, पुजाराचा विशेष सन्मान

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला रवींद्र जडेजा व चेतेश्वर पुजारा या दोन सौराष्ट्रच्या क्रिकेटपटूंचा गौरव करण्यात येणार आहे. सौराष्ट्रासह भारतीय क्रिकेटला त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा सन्मान करण्यात येईल. यावेळीच स्टेडियमला माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निरंजन शहा यांचे नाव देण्यात येणार आहे. निरंजन यांनी सौराष्ट्रासाठी १२ सामने खेळले. १४ तारखेला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या उपस्थितीत स्टेडियमचे नामकरण करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in