भारत-इंग्लंड कसोटी मालिका: विराटची वैयक्तिक कारणास्तव दोन सामन्यांतून माघार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २५ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडशी दोनहात करणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका: विराटची वैयक्तिक कारणास्तव दोन सामन्यांतून माघार

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. तारांकित फलंदाज विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराटची विनंती मान्य केली असून त्यांनीच ट्विटरवर याविषयी माहिती दिली.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २५ जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडशी दोनहात करणार आहे. उभय संघांतील पहिल्या कसोटीसाठी बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचे खेळाडू सोमवारी हैदराबाद येथे दाखल झाले. भारतीय संघ २४ तारखेपर्यंत येथे दाखल होणार असल्याचे समजते. बीसीसीआयने विराटच्या निर्णयाचा आदर राखतानाच समाज माध्यमे तसेच चाहत्यांनी याविषयी अतिरिक्त चर्चा करून अफवा पसरवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच विराटने याविषयी कर्णधार रोहित व संघ व्यवस्थापनाशी आधीच संवाद साधला होता, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

३५ वर्षीय विराट सोमवारी अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उपस्थित होता की नाही, हेसुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. विराटच्या माघारीमागील नेमके वैयक्तिक कारण कोणते हे स्पष्ट झालेले नसले तरी तो तिसऱ्या कसोटीपर्यंत संघात परतेल, असे अपेक्षित आहे. यापूर्वी आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमधूनही विराटने विश्रांती घेणे पसंत केले होते. मग आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी खेळल्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांत खेळला. पहिल्या टी-२० सामन्यातही विराटने वैयक्तिक कारणास्तव न खेळण्याचा निर्णय घेतला होता. ११३ कसोटींमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विराटच्या खात्यात २९ शतकांसह ८,८४८ धावा जमा आहेत.

पुजारा, पाटिदार, सर्फराझ संघातील स्थानासाठी शर्यतीत

विराटच्या जागी बीसीसीआय लवकरच पर्यायी खेळाडूची निवड करणार आहे. यासाठी सध्या रणजी स्पर्धेत छाप पाडणारा चेतेश्वर पुजारा, रजत पाटिदार आणि मुंबईचा सर्फराझ खान यांच्यात चुरस असेल. इंग्लंड लायन्सविरुद्ध झालेल्या भारत-अ संघाच्या सामन्यात पाटिदार आणि सर्फराझ यांनी अनुक्रमे दीडशतक व अर्धशतक झळकावले. रोहित व यशस्वी जैस्वाल सलामीवीर म्हणून पक्के असून तिसऱ्या स्थानी शुभमन गिल फलंदाजी करेल. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकासाठी के. एल. राहुलला प्राधान्य देण्यात येईल. पाचव्या स्थानी श्रेयस अय्यरसह अन्य नावांमध्ये स्पर्धा पाहायला मिळू शकते.

logo
marathi.freepressjournal.in