भारत-इंग्लंड कसोटी मालिका; विराटची आणखी दोन सामन्यांतून माघार, राहुल, जडेजा तिसऱ्या कसोटीसाठी परतण्याची दाट शक्यता

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटी सामन्यातही खेळताना दिसणार नाही.
भारत-इंग्लंड कसोटी मालिका; विराटची आणखी दोन सामन्यांतून माघार, राहुल, जडेजा तिसऱ्या कसोटीसाठी परतण्याची दाट शक्यता

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या व चौथ्या कसोटी सामन्यातही खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारणास्तव विराट आणखी दोन सामन्यांतून माघार घेणार असल्याचे समजते. मात्र के. एल. राहुल व रवींद्र जडेजा हे दोघेही जायबंदी खेळाडू तंदुरुस्त होऊन तिसऱ्या कसोटीसाठी संघात परतण्याची दाट शक्यता आहे.

भारत-इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेली पाच सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीवर आहे. बेन स्टोक्सच्या इंग्लंडने पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माच्या शिलेदारांनी १०६ धावांनी विजय मिळवत बरोबरी साधली. उभय संघांतील तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथे खेळवण्यात येईल. त्यानंतर २३ फेब्रुवारीपासून रांची येथे चौथी, तर ७ मार्चपासून धरमशाला येथे पाचवी कसोटी रंगेल.

यापूर्वी डिसेंबरमध्ये आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांमधूनही विराटने विश्रांती घेतली होती. मग आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळल्यावर त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात वैयक्तिक कारणास्तव न खेळण्याचे ठरवले. दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात मात्र तो खेळला. २२ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्यावेळी विराट पहिल्या दोन कसोटींसाठी अनुपलब्ध असल्याचे समोर आले.

दरम्यान, जडेजा व राहुल यांना पहिल्या कसोटीत अनुक्रमे स्नायू व उजव्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे ते दोघेही दुसऱ्या कसोटीला मुकले. मात्र तिसऱ्या लढतीपर्यंत ते परतण्याची शक्यता वाढली आहे. त्याशिवाय मोहम्मद सिराजही या लढतीसाठी उपलब्ध असेल. सिराजला वर्क लोड मॅनेजमेंटच्या कारणास्तव दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली होती.

विराटच्या माघारीमागील नेमके कारण काय?

३५ वर्षीय विराटने अथवा बीसीसीआयने अद्याप माघारीमागील कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र विराटची पत्नी अनुष्का लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार असल्याचे समजते. त्या कारणास्तव विराट सध्या कुटुंबाला प्राधान्य देत आहे. विराटचा जवळचा मित्र एबी डीव्हिलियर्सनेच काही दिवसांपूर्वी याविषयी एका यूट्यूब मुलाखतीत माहिती दिली.

राजकोट स्टेडियमला निरंजन शहा यांचे नाव

भारत-इंग्लंड यांच्यात राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी सौराष्ट्र क्रिकेट संघटेनेने आपल्या स्टेडियमचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजकोट येथील स्टेडियमला माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू निरंजन शहा यांचे नाव देण्यात येणार आहे. निरंजन यांनी सौराष्ट्रासाठी १२ सामने खेळले. तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या उपस्थितीत स्टेडियमचे नामकरण करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in