युवा ताऱ्यांमुळे विजयी आघाडी! भारताचा मायदेशात सलग १७व्या कसोटी मालिकेवर कब्जा

टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित ५५ धावांवर यष्टिचीत झाला.
युवा ताऱ्यांमुळे विजयी आघाडी! भारताचा मायदेशात सलग १७व्या कसोटी मालिकेवर कब्जा

रांची : ‘बॅझबॉल’च्या शैलीत कसोटी क्रिकेटचे रूप पालटण्याच्या मोहिमेवर निघालेल्या इंग्लंड संघाला भारताच्या युवा ताऱ्यांनी आसमान दाखवले. दडपणाच्या स्थितीत २४ वर्षीय शुभमन गिल (१२४ चेंडूंत नाबाद ५२ धावा) आणि २३ वर्षीय ध्रुव जुरेल (७७ चेंडूंत नाबाद ३९ धावा) या युवांनी केलेल्या झुंजार भागीदारीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटीत इंग्डंलवर ५ गडी राखून वर्चस्व गाजवले. चौथ्या दिवशीच साध्य केलेल्या या यशासह भारताने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

झारखंड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेले १९२ धावांचे लक्ष्य भारताने ६१ षटकांत गाठून मायदेशात सलग १७वा कसोटी मालिका विजय साकारला. भारताने गेल्या ११ वर्षांतील ५० कसोटींपैकी तब्बल ३९वा सामना जिंकला. उर्वरित ११पैकी फक्त ४ कसोटी भारताने गमावल्या आहेत, तर ७ सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स व प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम या जोडीविरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा रोहित शर्मा हा विश्वातील पहिला कर्णधार ठरला आहे. आता ७ मार्चपासून धरमशाला येथे उभय संघांतील पाचवी कसोटी खेळवण्यात येईल.

रविवारी भारताने ८ षटकांत बिनबाद ४० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी १५२ धावांची गरज होती. मात्र बेभरवशी खेळपट्टीवर हे आव्हान तितके सोपे नव्हते. रोहित व यशस्वी जैस्वाल या मुंबईकरांनी पुन्हा एकदा उत्तम सुरुवात करताना १७.३ षटकांत ८४ धावांची सलामी नोंदवली. जो रूटच्या गोलंदाजीवर जेम्स अँडरसनने यशस्वीचा (३७) अप्रतिम झेल टिपून ही जोडी फोडली. रोहितने मात्र कसोटी कारकीर्दीतील १७वे अर्धशतक साकारले. कसोटीच्या चौथ्या डावातील रोहितचे हे दुसरेच अर्धशतक ठरले. त्याने अँडरसनला लगावलेला षटकारही नेत्रदीपक होता.

टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित ५५ धावांवर यष्टिचीत झाला. त्याने ५ चौकार व १ षटकार लगावला. चौथ्या क्रमांकावरील रजत पाटिदारने पुन्हा एकदा निराशा केली. तो सहा चेंडूंत भोपळाही न फोडता माघारी परतला. तीन कसोटींमध्ये रजतने फक्त ६३ धावा केल्या आहेत. त्यानंतर गिल व रवींद्र जडेजा यांनी सावध पवित्रा अवलंबल्याने धावगती मंदावली. उपाहाराला भारताची ३ बाद ११८ अशी स्थिती होती. दुसऱ्या सत्रातील दुसऱ्याच षटकात शोएब बशीरने जडेजा (४) व सर्फराझ खान (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या.

५ बाद १२० अशा स्थितीतून गिल व जुरेल यांची जोडी जमली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांच्या बळावर भारताला विजयाच्या दिशेने नेले. यादरम्यान जवळपास २५ षटकांत भारताने एकही चौकार लगावला नाही. अखेर जुरेलने डावाच्या ४७व्या षटकात चौकार लगावून भारताला १५० पलीकडे नेले. मग गिलने ३९ धावांवर असताना बशीरला दोन जबरदस्त षटकार ठोकून मालिकेतील दुसरे अर्धशतक साकारले. टॉम हार्टीलीच्या पुढील षटकात जुरेलने आणखी एक चौकार लगावला. अखेर त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर दोन धावा वसूल करून जुरेलने थाटात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिल व जुरेल यांनी सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची अभेद्य भागीदारी रचली. गिल ५२ धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावात ९० व दुसऱ्या डावात नाबाद ३९ धावा करणाऱ्या जुरेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ३५३

भारत (पहिला डाव) : सर्व बाद ३०७

इंग्लंड (दुसरा डाव) : सर्व बाद १४५

भारत (दुसरा डाव) : ६१ षटकांत ५ बाद १९२ (रोहित शर्मा ५५, शुभमन गिल नाबाद ५२, ध्रुव जुरेल नाबाद ३९; शोएब बशीर ३/७९)

सामनावीर : ध्रुव जुरेल

गिलने कसोटीतील सहावे अर्धशतक साकारले. या मालिकेत त्याने आतापर्यंत एक शतक व दोन अर्धशतकांच्या बळावर ३४२ धावा केल्या आहेत.

ध्रुव जुरेल हा भारतासाठी सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा सर्वात युवा यष्टिरक्षक ठरला. जुरेलचे सध्याचे वय २३ वर्षे, ३३ दिवस आहे. अजय रात्रा यांनी २००२मध्ये विंडीजविरुद्ध २० वर्षे, १४८ दिवस वय असताना सामनावीर पुरस्कार पटकावला होता.

भारताने मायदेशात २००हून कमी धावांचा पाठलाग करताना ३३ सामन्यांपैकी तब्बल ३०वा सामना जिंकला. उर्वरित ३ वेळा कसोटी अनिर्णित राहिली आहे.

भारताने मायदेशात सलग १७वी कसोटी मालिका जिंकली. यापूर्वी २०१२-१३मध्ये इंग्लंडकडूनच भारताने १-२ असा पराभव पत्करला होता. ऑस्ट्रेलियाने १९९४ ते २००० तसेच २००४ ते २००८ या काळात मायदेशात सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

जून २०२२पासून बॅझबॉलचा कार्यकाळ सुरू झाल्यावर इंग्लंडला प्रथमच कसोटी मालिका गमवावी लागली. तसेच प्रथमच ते सलग तीन कसोटींमध्ये पराभूत झाले. यादरम्यानच्या काळात त्यांनी ७ पैकी ४ मालिका जिंकल्या. तर ३ मालिका बरोबरीत सोडवल्या. त्यांनी भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी १८पैकी १३ कसोटींमध्ये यश मिळवले होते.

यशस्वीने (९७१ धावा) भारतासाठी कारकीर्दीतील पहिल्या ८ कसोटींमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान मिळवले. त्याने सुनील गावसकर यांचा ९३८ धावांचा विक्रम मोडीत काढला आहे. यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत ४ कसोटींमध्ये तब्बल ६५५ धावा केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in