विक्रमी विजयाची यशस्वी गाथा! जैस्वालची पुन्हा द्विशतकी खेळी, जडेजाचे पाच बळी; मालिकेत २-१ अशी आघाडी

दुसऱ्या सत्रात या दोघांनी अधिक मुक्तपणे फलंदाजी केली. सर्फराझने पदार्पणाच्या कसोटीतील दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले.
विक्रमी विजयाची यशस्वी गाथा! जैस्वालची पुन्हा द्विशतकी खेळी, जडेजाचे पाच बळी; मालिकेत २-१ अशी आघाडी

राजकोट : राजकोट येथे भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडचा चार दिवसांतच फडशा पाडून कसोटीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. भारताने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा तब्बल ४३४ धावांनी धुव्वा उडवला. द्विशतकी खेळी साकारणारा यशस्वी जैस्वाल आणि पाच फलंदाज बाद करणारा रवींद्र जडेजा विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात भारताने षटकारांच्या बाबतीतही दोन विक्रम रचले. यापूर्वी २०२१मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध ३७२ धावांच्या फरकाने विजय मिळवला होता. तो विक्रम भारताने यावेळी मोडीत काढला.

मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या (२३६ चेंडूंत नाबाद २१४ धावा) सलग दुसऱ्या द्विशतकाला डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (४१ धावांत ५ बळी) प्रभावी गोलंदाजीची अप्रतिम साथ लाभली. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने राजकोटवर विक्रमी विजय नोंदवला. तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशीच भारताने इंग्लंडची त्यांच्याच ‘बॅझबॉल’ शैलीत तब्बल ४३४ धावांच्या फरकाने धूळधाण उडवली. भारताचा हा कसोटी इतिहासातील स‌र्वोत मोठा विजय ठरला. याबरोबरच भारताने पाच लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या या कसोटीत भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी ५५७ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले होते. मात्र या शिखराचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या दीड सत्रांत ३९.४ षटकांत १२२ धावांत आटोपला. त्यामुळे चौथ्या दिवशीच सामन्याचा निकाल लागला. आक्रमक खेळाच्या जोरावर कसोटीचे क्रिकेटचे रूप पालटण्यासाठी निघालेल्या इंग्लंडवर त्यांच्याच डाव उलटला. भारतीय फलंदाजांनी केलेल्या आक्रमणापुढे त्यांचे गोलंदाज हतबल झाले. मग भारताच्या गोलंदाजांनी त्यांना बचावात्मक खेळ करण्यास प्रवृत्त करून ठराविक अंतराने बळी मिळवले. त्यामुळे एकवेळ मालिकेत १-० अशी आघाडी मिळवणारा बेन स्टोक्सचा संघ आता पिछाडीवर पडला आहे. उभय संघांतील चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवण्यात येईल.

शनिवारच्या २ बाद १९६ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करताना भारताने दमदार फलंदाजी केली. शुभमन गिल व कुलदीप यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भर घातली. कुलदीपने ३ चौकार व १ षटकारासह उपयुक्त २७ धावा काढून इंग्लंडला सतावले. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात त्याच्यात व गिलमध्ये गैरसमज झाला व याचा फटका गिलला बसला. त्यामुळे गिलचे शतक हुकले. त्याने ९ चौकार व २ षटकारांसह १५१ चेंडूंत ९१ धावा केल्या. यानंतर शनिवारी पाठदुखीमुळे ‘रिटायर्ड हर्ट’ होऊन पॅव्हेलियनमध्ये जाणारा यशस्वी पुन्हा मैदानात परतला. १०४ धावांवरून त्याने पुढे खेळण्यास प्रारंभ केला.

कुलदीपसुद्धा काही षटकांच्या अंतरात रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेथून मग यशस्वी व सर्फराझ खान या मुंबईकरांची जोडी जमली. आझाद मैदानात तसेच मुंबईच्या रणजी संघात एकत्रित खेळणाऱ्या या दोघांनी आक्रमक रूप धारण करताना इंग्लंडच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. यशस्वीने जेम्स अँडरसनच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. दुसऱ्या बाजूने सर्फराझने फिरकीपटूंना हैराण करून भारताला उपाहारापर्यंत ४ बाद ३१४ धावांपर्यंत नेले.

दुसऱ्या सत्रात या दोघांनी अधिक मुक्तपणे फलंदाजी केली. सर्फराझने पदार्पणाच्या कसोटीतील दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. तर पुढच्याच षटकात यशस्वीने सलग दुसरे द्विशतक साकारले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १७२ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा आघाडी तब्बल ५५० धावांपलीकडे नेली. सर्फराझने ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ६८, तर यशस्वीने १४ चौकार व १२ उत्तुंग षटकारांसह नाबाद २१४ धावा केल्या. अखेर ९८ षटकांत ४३० धावा झाल्यावर रोहितने दुसरा डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इंग्लंडपुढे विजयासाठी ५५७ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.

लक्ष्याचा पाठलाग करताना बेन डकेट (४) धावचीत झाला, तर जसप्रीत बुमराने झॅक क्रॉलीला (११) पायचीत पकडले. चहापानालाच इंग्लंडची २ बाद १८ अशी अवस्था होती. त्यातून ते सावरू शकले नाहीत व तिसऱ्या सत्रात जडेजाच्या गोलंदाजीपुढे त्यांची फलंदाजी ढेपाळली. रविचंद्रन अश्विनही या सत्रात खेळपट्टीवर उतरला. जडेजाने ओली पोप (३), जॉनी बेअरस्टो (४), जो रूट (७) व बेन फोक्स (६) यांना बाद केले. कुलदीपने स्टोक्सचा (१५) अडथळा दूर केला. ९ बाद ९१ धावांवरून मार्क वूड (३३) व अँडरसन (नाबाद १) या अखेरच्या जोडीने ३१ धावा फटकावून भारताच्या विजयाची प्रतीक्षा लांबवली. अखेर जडेजानेच वूडला बाद करून बळींचे पंचक पूर्ण केले व भारताच्या महाविजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. कुलदीपने दोन, तर रविचंद्रन अश्विन, बुमरा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात शानदार शतक झळकावण्यासह कसोटीत एकूण ७ बळी मिळवल्याने जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

यशस्वी हा सलग दोन कसोटी सामन्यांत द्विशतक झळकावणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी विनोद कांबळी (वि. इंग्लंड, झिम्बाब्वे, १९९३) आणि विराट कोहली (वि. श्रीलंका, २०१७) यांनी अशी कामगिरी केली होती. एकाच मालिकेत दोन द्विशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय आहे.

यशस्वीने या मालिकेत आतापर्यंत २२ षटकार लगावले आहेत. याबरोबरच त्याने एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार लगावण्याचा रोहितचा विक्रम मोडीत काढला. रोहितने २०१९मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींमध्ये १९ षटकार लगावले होते.

यशस्वीने द्विशतकादरम्यान तब्बल १२ षटकार लगावले. याबरोबरच त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमच्या एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली. अक्रमने १९९६मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १२ षटकार ठोकले होते.

या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत यशस्वी ५४५ धावांसह अग्रस्थानी आहे. त्याने तीन कसोटींच्या सहा डावांत अनुक्रमे ८०, १५, २०९, १७, १०, २१४* अशा धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वात कमी वयात दोन द्विशतके झळकावणाऱ्यांच्या यादीत यशस्वीने (२२ वर्षे, ५२ दिवस) तिसरे स्थान मिळवले. भारताचा विनोद कांबळी (२१ वर्षे, ५४ दिवस) आणि ऑस्ट्रेलियाचे सर डॉन ब्रॅडमन (२१ वर्षे, ३१८ दिवस) या यादीत पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.

भारताने प्रथमच कसोटी इतिहासात ४३४ धावांच्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी २०२१मध्ये भारताने न्यूझीलंडला मुंबईत ३७२ धावांनी धूळ चारली होती.

कारकीर्दीतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत किमान ५० धावा करणारा सर्फराझ खान हा चौथा भारतीय ठरला. यापूर्वी दिलावर हुसैन (१९३४), सुनील गावसकर (१९७१), श्रेयस अय्यर (२०२१) यांनी अशी कामगिरी केली होती.

भारताने या सामन्यात एकूण २८ षटकार लगावले. याबरोबरच भारताने स्वत:चाच विश्वविक्रम मोडीत काढला. यापूर्वी, २०१९मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारताने २७ षटकार ठोकले होते.

एकाच कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार खेचण्याच्या बाबतीतही भारताने विश्वविक्रम रचला. भारताने या तीन कसोटींमध्ये आतापर्यंत ४८ षटकार लगावले आहेत. यापूर्वी २०१९मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटींत भारताने ४७ षटकार मारले होते.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : सर्व बाद ४४५

इंग्लंड (पहिला डाव) : सर्व बाद ३१९

भारत (दुसरा डाव) : ९८ षटकांत ४ बाद ४३० डाव घोषित (यशस्वी जैस्वाल नाबाद २१४, शुभमन गिल ९१, सर्फराझ खान नाबाद ६८; टॉम हार्टली १/७८)

इंग्लंड (दुसरा डाव) : ३९.४ षटकांत सर्व बाद १२२ (मार्क वूड ३३, बेन फोक्स १६; रवींद्र जडेजा ५/४१, कुलदीप यादव २/१९)

सामनावीर : रवींद्र जडेजा

logo
marathi.freepressjournal.in