भारत-इंग्लंड महिला कसोटी;चौंघीमुळे चारशे पार

भारताने या लढतीसाठी जेमिमा, शुभा व मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंग यांना पदार्पणाची संधी दिली.
भारत-इंग्लंड महिला कसोटी;चौंघीमुळे चारशे पार
PM

नवी मुंबई : डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारपासून सुरू झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार दिवसीय कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसावर भारतीय महिला संघाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पदार्पणवीर सतीश शुभा (७६ चेंडूंत ६९ धावा), मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (९९ चेंडूंत ६८), यष्टिरक्षक यास्तिका भाटिया (८८ चेंडूंत ६६) आणि डावखुरी दीप्ती शर्मा (९५ चेंडूंत नाबाद ६०) या चौंघीनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारताने ४०० धावांचा पल्ला गाठला.

दिवसअखेर दीप्तीच्या साथीने पूजा वस्त्रकार ४ धावांवर खेळत असून भारताने ९४ षटकांत ७ बाद ४१० धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताने मायदेशातील कसोटीत प्रथमच एकाच दिवशी इतक्या धावा केल्या, हे विशेष. त्याशिवाय भारताने स्वत:च्याच विक्रमांचा विचार करता कसोटीतील वैयक्तिक तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने ४६७, तर १९८६मध्येही इंग्लंडविरुद्धच ९ बाद ४२६ (डाव घोषित) इतक्या धावा केल्या होत्या.

दरम्यान, जवळपास दशकभरानंतर मायदेशात भारतीय संघ कसोटी सामना खेळत आहे. तसेच नुकताच इंग्लंडविरुद्ध भारताने टी-२० मालिका गमावली. त्यामुळे यातून सावरत भारतीय खेळाडू कसोटीच्या आव्हानासाठी मानसिकदृष्ट्या कसे सज्ज होतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून होते. कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून साहजिकच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच सर्व काही भारताच्या बाजूने घडत गेले. भारताने या लढतीसाठी जेमिमा, शुभा व मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंग यांना पदार्पणाची संधी दिली.

सलामीवीर स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी सावध सुरुवात केली. मात्र लॉरेन बेलने स्मृतीचा १७ धावांवर, तर केट क्रॉसने शफालीचा १९ धावांवर त्रिफळा उडवून भारताला २ बाद ४७ अशा अडचणीत आणले. तेथून मग भारतीय फलंदाजांनी खेळ उंचावला. कर्नाटकची २४ वर्षीय शुभा व मुंबईची २३ वर्षीय जेमिमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागीदारी रचली. कारकीर्दीतील पहिल्याच कसोटीत दोघींनी अर्धशतके झळकावून भारताला १५० धावांपलीकडे नेले. शुभाने १३, तर जेमिमाने ११ चौकार लगावले. फिरकीपटू सोफी एक्केलस्टोनने शुभाला बाद करून ही जोडी फोडली. पाच षटकांच्या अंतरात बेलने जेमिमालाही त्रिफळाचीत केले.

४ बाद १९०वरून मग हरमनप्रीत व यास्तिका यांची जोडी जमली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी ११६ धावांची भर घातली. यास्तिकाने १० चौकार व १ षटकारासह कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साकारले, हरमनप्रीतही अर्धशतक साकारणार असे वाटत असतानाच ४९ धावांवर डॅनिएल वॅटने तिला धावचीत केले. चार्ली डीनने दुसऱ्या बाजूने यास्तिकाला माघारी पाठवले. मात्र दीप्तीने स्नेह राणाच्या (३०) साथीने सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचून इंग्लंडला थकवले. राणा माघारी परतली असली तरी कारकीर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावून ९ चौकार व १ षटकारासह दीप्ती खेळपट्टीवर टिकून आहे.

 संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ९४ षटकांत ७ बाद ४१० (सतीश शुभा ६९, जेमिमा रॉड्रिग्ज ६८, यास्तिका भाटिया ६६, दीप्ती शर्मा नाबाद ६०; लॉरेन बेल २/६४)

 १-भारताने मायदेशातील कसोटी सामन्यात प्रथमच इतकी धावसंख्या रचली. २०१४मध्ये आफ्रिकेविरुद्ध भारताने ६ बाद ४०० धावा केल्या होत्या.

 २-महिला क्रिकेटच्या इतिहासात भारताने (४१०) कसोटीच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या नोंदवली. इंग्लंडने १९३५मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच दिवशी ४ बाद ४३१ धावा केल्या होत्या.

३-महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा एका संघातील चार फलंदाजांनी एकाच डावात अर्धशतके झळकावली. यापूर्वी भारताने २००२मध्ये आफ्रिकेविरुद्ध, तर ऑस्ट्रेलियाने २०१९मध्ये इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केलेली आहे.

४९-शुभाने ४९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भारतासाठी हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक ठरले. संगीता डाबिरने १९९५मध्ये इंग्लंडविरुद्ध ४० चेंडूंत अर्धशतक साकारले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in