महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल; शफालीची अष्टपैलू कामगिरी

भारताने बांगलादेशसमोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते. बांगलादेशचा संघ केवळ ७ बाद १०० धावाच करू शकला
महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल; शफालीची अष्टपैलू कामगिरी
Published on

महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेतील पंधराव्या सामन्यात शनिवारी भारताने यजमान बांगलादेशवर ५९ धावांनी दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. सामनावीर ठरलेल्या शफाली वर्माने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. तिने ४४ चेंडूंत ५५ धावा करण्याबरोबरच १० धावांच्या मोबदल्यात दोन विकेट‌्ही मिळविल्या.

भारताने बांगलादेशसमोर १६० धावांचे लक्ष ठेवले होते. बांगलादेशचा संघ केवळ ७ बाद १०० धावाच करू शकला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने डावाची सुरुवात अतिशय संथ केली. यामुळे बांगलादेशची अपेक्षित धावगती वाढून भारताची पकड मजबूत झाली. १४ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या दोन बाद ६८ अशी होती.

कर्णधार निगर सुलतानाने बांगलादेशकडून २९ चेंडूंत सर्वाधिक ३६ धावा केल्या; तर फरगाना हकने ४० चेंडूंत ३० धावा केल्या. मुर्शिदा खातूनने २५ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. भारताकडून दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. स्नेह राणा आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक गडी विकेट मिळविली.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५९ धावा केल्या. शफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधाना यांनी भारताला शानदार सुरुवात करून दिली. दोघींनी ७२ चेंडूत ९६ धावांची सलामी दिली. या जोडीने पॉवरप्लेमध्येही ५९ धावा फटकविल्या. स्मृती (३८ चेंडूंत ४७ धावा) बाराव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाली. त्यानंतर पंधराव्या षटकातील पाचव्या चेंडूवर शफाली वर्माही (४४ चेंडू्ंत ५५ धावा) बाद झाली. रूमाना अहमदने तिला त्रिफळाचीत केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या जेमिमाने २४ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. मात्र रिचा घोष (७ चेंडू्ंत ४), किरण नवगिरे (१ चेंडू्ंत ०) आणि दीप्ती शर्मा (५ चेंडू्ंत १०) झटपट बाद झाल्या. भारताने निर्धारित २० षटकात ५ विकेट्च्या मोबदल्यात १५९ धावा केल्या.

बांगलादेशकडून रुमानाने ३ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत सर्वाधिक तीन विकेट‌्स मिळविल्या. फाहिमा खातून आणि संजीदा अख्तर यांनीही किफायती गोलंदाजी करत भारताच्या बॅर्टसना जखडून ठेवले. फाहिमा खातून हिने एक विकेट मिळविली.

logo
marathi.freepressjournal.in