नवी दिल्ली : २८ ऑगस्टपासून रंगणाऱ्या पॅरालिम्पिक (अपंगांच्या) क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून २५ पदके अपेक्षित आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (पीसीआय) अध्यक्ष देवेंद्र झझारिया यांनीही यासंबंधी आशावाद व्यक्त केला.
यंदा भारताचे ८४ खेळाडू पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरले असून पॅरिसमध्येच ही स्पर्धा होणार आहे. २०२०च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना १९ पदके जिंकली होती. त्यामध्ये ५ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्यपदकांचा समावेश होता.
“यंदा भारताचे प्रथमच ८४ खेळाडूंचे मोठे पथक पॅरालिम्पिकसाठी दाखल झाले आहेत. भारताचे खेळाडू किमान २५ पदक जिंकण्यात यशस्वी होतील, अशी आशा आहे. १२ प्रकारांत आपले खेळाडू सहभागी होणार असून यामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, सायकलिंग, कॅनोइंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, तायक्वांदो असे खेळ आहेत,” असे झझारिया म्हणाले.