मँचेस्टर : शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय कसोटी संघावर सध्या दुहेरी संकट ओढावले आहे. एकीकडे विविध खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापुढे आहे. भारत-इंग्लंड यांच्यात बुधवारपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर चौथी कसोटी खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या कसोटीत भारतापुढे योग्य संघनिवड करण्याचेही आव्हान असेल. या कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे आता युवा गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
मात्र गिल-गंभीर पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. त्यामुळे उभय संघांतीलल पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर आहे. भारताने आजवर कोणत्याही मालिकेत २-१ अशा पिछाडीवर असताना मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ यावेळी विक्रम रचणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे अष्टपैलू नितीश रेड्डी उर्वरित मालिकेस मुकणार आहे. तसेच डावखुरा गोलंदाज अर्शदीप सिंगही डाव्या हाताच्या बोटांना झालेल्या दुखापतीमुळे चौथ्या कसोटीसाठी अनुपलब्ध असेल. आकाश दीपलाही दुखापत झाल्याने तो या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारताला संघाची योग्य घडी बसवावी लागणार आहे. तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा मात्र खेळत असल्याने भारताच्या चाहत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. यावेळी भारताला १८ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी असून गिल आणि कंपनी यामध्ये यशस्वी ठरेल का, हे पाहणे रंजक ठरेल.
पंत यष्टिरक्षणासाठी तंदुरुस्त
कर्णधार गिलने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पंत यष्टिरक्षणासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तिसऱ्या कसोटीत पंत फक्त फलंदाजीस आला होता, तर यष्टिरक्षण ध्रुव जुरेलने केले होते. मात्र पंत तंदुरुस्त असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. नितीशच्या जागी भारतीय संघ साई सुदर्शन किंवा जुरेल यांच्यापैकी एकाला संधी देऊ शकतो. त्यामुळे करुण नायर तिसऱ्या स्थानी कायम असेल, असे अपेक्षित आहे. अष्टपैलू म्हणून सहाव्या अथव्या सातव्या स्थानी शार्दूलला संधी दिली जाऊ शकते. फलंदाजीत मुंबईकर यशस्वी जैस्वालने जबाबदारीने खेळ करणे गरजेचे आहे. सलामीवीर के. एल. राहुल व गिल मात्र उत्तम लयीत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावरच फलंदाजीची धुरा असेल.
बुमरावर मदार, कंबोजला पदार्पणाची संधी?
गोलंदाजीत भारताची मदार पुन्हा एकदा बुमरावर असेल. त्याशिवाय मोहम्मद सिराजकडूनही त्याला पुरेशी साथ लाभणे आवश्यक आहे. बुमरा या मालिकेत तीनच सामने खेळणे अपेक्षित आहे. त्यामुळे तो पाचव्या कसोटीसाठी संघात असेल की नाही, याविषयी साशंका आहे. अशा स्थितीत भारतीय संघाला बुमराचा योग्य वेळी वापर करावा लागणार आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हरयाणाच्या २४ वर्षीय अंशुल कंबोजला संधी मिळू शकते. त्याशिवाय प्रसिध कृष्णा व शार्दूल ठाकूर यांचेही पर्याय भारतापुढे उपलब्ध आहेत. फिरकी विभागात वॉशिंग्टन सुंदर व डावखुरा रवींद्र जडेजा यांच्यावर भारताची भिस्त असेल. सुंदरने गेल्या कसोटीत चमक दाखवली, मात्र जडेजा गोलंदाजीत तितका प्रभावी दिसलेला नाही.
स्टोक्स, आर्चर इंग्लंडची ताकद
इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या कसोटीसाठी ऑफस्पिनर शोएब बशीरच्या जागी डावखुरा फिरकीपटू लियाम डॉसनला संधी देण्यात आली आहे. अन्य १० खेळाडू हे तिसऱ्या कसोटीतीलच कायम आहेत. बशीरला तिसऱ्या कसोटीत हाताला दुखापत झाल्याने तो उर्वरित मालिकेस मुकणार आहे. त्यामुळे ३५ वर्षीय डॉसनला २०१७ नंतर कसोटी संघात स्थान लाभले आहे. गेल्या वर्षभरात डॉसनने कौंटी क्रिकेटमध्ये छाप पाडली. इंग्लंडला चौथी कसोटी जिंकून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. स्टोक्स व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यावर इंग्लंडची भिस्त आहे. तसेच फलंदाजीत जो रूट त्यांच्यासाठी सातत्याने धावा करत आहे.
ओल्ड ट्रॅफर्ड भारतासाठी अनलकी
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम भारतासाठी आजवर पूर्णपणे अनलकी म्हणजेच दुर्दैवी ठरले आहे. भारताने येथे आजवरच्या ९ कसोटींपैकी ४ लढती गमावल्या आहेत, तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने २०१४मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे अखेरची कसोटी खेळला होती. त्यानंतर आता ११ वर्षांनी भारतीय संघ या स्टेडियमवर खेळणार आहे. तसेच १९९०मध्ये सचिन तेंडुलकरने येथे कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक साकारले होते. त्यानंतर गेल्या ३५ वर्षांत एकाही भारतीय फलंदाजांना मँचेस्टरला शतक झळकावलेले नाही. त्यामुळे आता एखादा भारतीय फलंदाज हा दुष्काळ संपुष्टात आणून भारतीय संघही येथे विजय मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरेल.