Ind vs Eng: भारताचा धडाकेबाज विजयारंभ; पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून वर्चस्व; फिरकीपटू वरुण सामनावीर

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा धडाक्यात विजयी प्रारंभ केला.
Ind vs Eng: भारताचा धडाकेबाज विजयारंभ; पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून वर्चस्व; फिरकीपटू वरुण सामनावीर
एक्स @BCCI
Published on

कोलकाता : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बुधवारी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा धडाक्यात विजयी प्रारंभ केला. वरुण चक्रवर्ती (२३ धावांत ३ बळी), अर्शदीप सिंग (१७ धावांत २ बळी) यांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीला अभिषेक शर्माच्या (३४ चेंडूंत ७९ धावा) तुफानी अर्धशतकाची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडचा ७ गडी आणि ४३ चेंडू राखून धुव्वा उडवला.

कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २० षटकांत १३२ धावांत गारद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने फिल सॉल्ट (०), बेन डकेट (४) यांना स्वस्तात गुंडाळले. मग फिरकीपटू वरुणने हॅरी ब्रूक (१७), लियाम लिव्हिंगस्टोन (०) यांना एकाच षटकात माघारी पाठवले. अक्षर पटेल व हार्दिक पंड्या यांनीही प्रत्येकी दोन गडी टिपून उत्तम साथ दिली. कर्णधार जोस बटलरने ४४ चेंडूंत ६८ धावांची एकाकी झुंज दिल्यामुळे इंग्लंडने किमान १३० धावांचा पल्ला गाठला. वरुणनेच बटलरचाही अडसर दूर केला.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सुरुवातीपासूनच आक्रमण करताना १२.५ षटकांत विजय साकारला. अभिषेक आणि संजू सॅमसन यांनी ४१ धावांची सलामी नोंदवली. सॅमसन २६ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार भोपळाही न फोडता जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मात्र अभिषेक आणि तिलक वर्मा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. विशेषत: अभिषेकने टी-२०तील पहिले अर्धशतक झळकावताना ५ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. १२व्या षटकात आदिल रशिदने अभिषेकचा अडसर दूर केला. मग तिलक (नाबाद १९) आणि हार्दिक (नाबाद ३) यांनी उर्वरित ८ धावा काढून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. निर्णायक तीन बळी घेणारा वरुण सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत सर्व बाद १३२ (जोस बटलर ६८, हॅरी ब्रूक १७; वरुण चक्रवर्ती ३/२३, अर्शदीप सिंग २/१७) पराभूत वि.

भारत : १२.५ षटकांत ३ बाद १३३ (अभिषेक शर्मा ७९, संजू सॅमसन २६, तिलक वर्मा नाबाद १९; जोफ्रा आर्चर २/२१)

सामनावीर : वरुण चक्रवर्ती

logo
marathi.freepressjournal.in