पॅरालिम्पिकची सांगता! भारताने मिळवले ऐतिहासिक यश; सर्वाधिक पदके कशात? वाचा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

Paralympic Games Paris 2024: पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ऐतिहासिक २९ पदकांवर नाव कोरले. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह भारतीय खेळाडूंनी विक्रमी पदके आपल्या नावे केली.
पॅरालिम्पिकची सांगता! भारताने मिळवले ऐतिहासिक यश; सर्वाधिक पदके कशात? वाचा विजेत्यांची पूर्ण लिस्ट
Credits: Twitter
Published on

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत ऐतिहासिक २९ पदकांवर नाव कोरले. ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह भारतीय खेळाडूंनी विक्रमी पदके आपल्या नावे केली. शनिवारी भारतीय खेळाडूंनी २ पदके जिंकण्याची कामगिरी केली. एकूण २९ पदकांसह भारताने १८वा क्रमांक पटकावला.

सर्वाधिक १७ पदके ॲथलेटिक्समध्ये

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता. मात्र हा विक्रम यंदा भारतीय खेळाडूंनी मोडीत काढला. पॅरिसमध्ये भारताचे एकूण ८४ पॅरा खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात २९ पदकांवर भारतीय खेळाडूंना मोहोर उमटवता आली. भारताला सर्वाधिक १७ पदके ॲथलेटिक्समध्ये जिंकता आली. त्यापाठोपाठ बॅडमिंटनमध्ये ५ पदके, तर नेमबाजीत ४ पदके भारताच्या नावावर झालीत. तिरंदाजीत भारताने दोन पदकांवर ठसा उमटला. ज्युदोमध्ये भारताने पहिलेवहिले आणि एकमेव पदक जिंकले.

दरम्यान गत अनेक वर्षांतील भारतीय खेळाडूंनी यंदा विशेष कामगिरी करत पदक कमाईत मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला एकही पदक जिंकता आले नाही. मात्र शनिवारी भारताने २ पदकांना गवसणी घातली. त्यात एका सुवर्ण आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. त्यामुळे भारताच्या पदकांचा आकडा हा २९ झाला आहे.

सिमरन शर्माची कांस्य कमाई

महिलांच्या २०० मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिमरन शर्माने २४.७५ सेकंदाची वेळ नोंदवत शर्यत पूर्ण करत कांस्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा एलियास ड्युरंडने सुवर्णपदकावर नाव कोरले. ओमराने २३.६२ सेकंदात शर्यत पूर्ण केली. व्हेनेझुएलाच्या पाओला अलेजांद्रा लोपेझ पेरेझने रौप्यपदक कमाई केली. पाओलाने ही शर्यत पूर्ण करण्यासाठी २४.१९ सेकंदाची वेळ घेतली.

पूजा ओझाला पदकाची हुलकावणी

कयाक सिंगल २०० मीटर केएल१ स्प्रिंट कॅनोईंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत पूजा ओझा स्थान मिळवू शकली नाही. त्यामुळे स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रविवारी भारताला पदकाने हुलकावणी दिली. अवघ्या ७.०३ सेकंदाने पूजाचे पदक हुकले. उपांत्य फेरीत पूजाने १.१७.०३ वेळ घेतला. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या इटलीच्या एलिओनोरा डी पाओलिसने तिच्या पेक्षा ७.०३ सेकंद कमी वेळ नोंदवला.

नवदीपची सोनेरी कामगिरी

शनिवारचा दिवस भारतासाठी विशेष ठरला. या दिवशी भारताच्या झोळीत २ पदकांची भर पडली. नवदीप सिंगने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक उंचावले. अंतिम फेरीत नवदीप सिंगने दुसऱ्या प्रयत्नात ४७.३२ मीटर भालाफेक केली. तर इराणच्या सदेघ सयाह बाईतने ४७.६४ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. मात्र ही स्पर्धा संपल्यानंतर इराणचा सदेघ सयाह बाईतने अपात्र ठरला. त्याचा फायदा भारतीय खेळाडूला झाला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या नवदीपला सुवर्ण पदक विजेता म्हणून घोषित केले. या स्पर्धेत चीनच्या पेंग्झियांग सनने ४४.७२ मीटर भालाफेक केली. त्यामुळे त्याने रौप्यपदकावर नाव कोरले. तर इराकच्या विल्डन नुखैलावीने ४०.४६ मीटर भालाफेक करत कांस्यपदकावर ठसा उमटवला. अंतिम फेरीत नवदीपचा पहिला थ्रो फाऊल ठरविण्यात आला. दुसरा थ्रो ४६.३९ मीटर केला. तिसरा थ्रो ४७.३२ मीटर केला. हा थ्रो त्याच्या कामगिरीतील सर्वाधिक होता. चौथा थ्रो पुन्हा फाऊल ठरला. पाचवा थ्रो ४६.०५ मीटर झाला. तर सहावा थ्रो पुन्हा फाऊल ठरविण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in