

नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा रंग बदलण्यावरून ‘हॉकी इंडिया’मध्ये सुरू झालेला अंतर्गत वाद मंगळवारी अधिक तीव्र झाला. जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, याचे स्पष्टीकरण आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी भारतीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी दिलेली मुदत कार्यकारी संचालक कमांडर आर. के. श्रीवास्तव यांनी पाळली नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर विचारविनिमय करण्यासाठी सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी कार्यकारी मंडळाची (इबी) तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली आहे.
तिर्की यांनी श्रीवास्तव यांना पाठवलेल्या कडक ई-मेलमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी श्रीवास्तव यांनी कार्यकारी मंडळाला दिलेले स्पष्टीकरण अपुरे असल्याचे सांगत तिर्की यांनी पुरावे सादर करण्याचे निर्देश कायम असल्याचे स्पष्ट केले. मात्र, दिलेल्या मुदतीत श्रीवास्तव यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुदत संपल्यानंतर लगेचच सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी अध्यक्ष तिर्की यांना पत्र लिहून सर्व प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी कार्यकारी मंडळाची तातडीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली.
१५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकापूर्वी हा वाद उफाळून आला आहे. भारताचे माजी कर्णधार वीरेन रस्किन्हा, अजितपाल सिंह, धनराज पिल्ले आणि परगट सिंह यांनी जर्सीचा पारंपारिक रंग बदलण्यावर आक्षेप घेतला आहे. निळ्या टर्फवर खेळताना खेळाडूंची दृश्यमानता वाढवण्यासाठी हा बदल केल्याचा दावा ‘हॉकी इंडिया’ने केला असला, तरी हा निर्णय अध्यक्ष किंवा कार्यकारी मंडळाच्या मंजुरीशिवाय घेण्यात आल्याचे तिर्की यांचे म्हणणे आहे.
महिला हॉकीपटूचा लैंगिक छळ?
जर्सीच्या वादाव्यतिरिक्त तिर्की यांनी एका अधिकाऱ्याविरोधातील लैंगिक छळाच्या तक्रारींचा पूर्ण चौकशी अहवालही मागवला आहे. तक्रार निवारण समितीची रचना, सदस्यांची पात्रता आणि बैठकांचे स्वाक्षरी केलेले इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश तिर्की यांनी दिले होते. एप्रिल महिन्यात आलेल्या अनामिक तक्रारींनंतर अनेक महिला खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी या आरोपांना दुजोरा दिला होता. मे महिन्यात तिर्की यांनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती आणि जूनमध्ये समिती स्थापन करण्यावर चर्चा झाली होती, परंतु अद्याप कोणतीही समिती स्थापन झालेली नाही.