अर्जुन पुरस्कार विजेता हॉकीपटू वरुण कुमारवर बलात्काराचा आरोप ; POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार २०१८मध्ये तिची व वरुणची इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. त्यावेळी ती १७ वर्षांची होती. तेव्हा वरुण बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) केंद्रात प्रशिक्षणासाठी होता. त्यावेळी वरुणने तिला सातत्याने...
अर्जुन पुरस्कार विजेता हॉकीपटू वरुण कुमारवर बलात्काराचा आरोप ; POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Published on

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचा सदस्य असलेल्या हॉकीपटू वरुण कुमारवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एका २२ वर्षीय मुलीने केलेल्या तक्रारीनुसार २०१८मध्ये वरुणने तिच्याशी अल्पवयीन असतानाही लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध राखल्याचे उघडकीस आले आहे.

२८ वर्षीय वरुणला २०२१मध्ये अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. तसेच २०२३मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही तो भाग होता. त्याव्यतिरिक्त, लवकरच सुरू होणाऱ्या प्रो लीग हॉकीसाठी भारताच्या २४ सदस्यीय संघातही वरुणचा समावेश करण्यात आला आहे. मात्र वरुणच्या या स्पर्धेत खेळण्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरुणला नुकताच पंजाबमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली. वरुण सध्या हॉकी संघासह भुवनेश्वर येथे आहे, असे भारतीय हॉकी महासंघाने स्पष्ट केले आहे.

पीडित महिलेने केलेल्या आरोपानुसार २०१८मध्ये तिची व वरुणची इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. त्यावेळी ती १७ वर्षांची होती. तेव्हा वरुण बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) केंद्रात प्रशिक्षणासाठी होता. त्यावेळी वरुणने तिला सातत्याने मेसेज पाठवून भेटण्यास बोलावले. जेव्हा या तरुणीने काहीही रिप्लाय दिला नाही. तेव्हा वरुणने मित्रांना तिला मनवण्याची विनंती केली. अखेर कालांतराने ती वरुणला भेटण्यास राजी झाली. पीडीतीने एफआयआरमध्ये सर्व प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

यानंतर दोघांमध्ये उत्तम मैत्री झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. जुलै २०१८मध्ये वरुणने बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये पीडितेला नेले. यावेळी ती अल्पवयीन आहे, हे ठाऊक असूनही तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. पीडितेने यावेळी वरुणला नकार केला. मात्र वरुणने भविष्यात लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले. जवळपास पाच वर्षे हे दोघे संबंधांत होते. मात्र पीडितेच्या वडिलांचे निधन झाल्यावर वरुणने फक्त एकदाच तिची भेट घेतली व त्यानंतर तो तिच्यापासून दूर राहू लागला. तसेच तिने त्या मुलीशी मोबाईल अथवा कोणत्याही माध्यमाद्वारे संवाद साधणे बंद केले.

यादरम्यान, पीडितेने यासंबंधी पोलिसांकडे तक्रार केल्यावर वरुण पुन्हा तिच्याशी बोलू लागला. मात्र पीडितेने लग्नाचा विषय काढल्यावर वरुणने पुन्हा संवाद बंद केला. तसेच लग्नासाठी दबाव टाकल्यास आपले अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली, असेही त्या मुलीने एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

हॉकीपटू वरुणविरोधात आम्ही ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी चौकशी सुरू असून लवकरच योग्य ती कारवाई करू.

- बंगळुरू पोलीस अधिकारी

logo
marathi.freepressjournal.in