

ॲम्स्टेलवीन : सामन्याच्या सुरुवातीलाच गोल स्वीकारण्याचा दबाव आणि बचावफळीतील चुकांमुळे भारतीय पुरुष हॉकी संघाचे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगले आहे. सोमवारी पार पडलेल्या पूल ई-मधील लढतीत अर्जेंटिनाने भारताचा ३-५ अशा फरकाने पराभव केला. या पराभवासह भारतीय संघ गटात तीन सामन्यांतून एकही गुण न मिळवता चौथ्या स्थानावर राहिला असून आता संघाला सातव्या किंवा आठव्या स्थानासाठी खेळावे लागणार आहे.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी भारताला हा सामना किमान तीन गोलच्या फरकाने जिंकणे आवश्यक होते. मात्र, अर्जेंटिनाने आक्रमक सुरुवात करत सामन्याच्या ३९ व्या सेकंदालाच जोआक्विन तोस्कानीच्या गोलद्वारे १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सहाव्या मिनिटाला निकोलस डेला टोरेने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत अर्जेंटिनाची आघाडी २-० केली. भारताकडून १० व्या मिनिटाला सुखजीत सिंगने गोल नोंदवून फरक कमी केला. पहिल्या १५ मिनिटांअखेर अर्जेंटिना २-१ ने पुढे होते. दुसरा सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही.
सामन्याच्या ३३ व्या आणि ४५ व्या मिनिटाला टोमास डोमेनने गोल करत अर्जेंटिनाला ४-१ अशी मजबूत स्थिती मिळवून दिली. ५३ व्या मिनिटाला लुकास तोस्कानीने पाचवा गोल केला. सामन्याच्या ५८ व्या मिनिटाला सुखजीतने वैयक्तिक दुसरा गोल केला, तर ५९ व्या मिनिटाला हार्दिक सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल नोंदवला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला. पूल ई-मधून नेदरलँड्सने आधीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
दुसरीकडे ‘करो या मरो’ अशा अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दबावाखाली आलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे भारतीय संघाचे महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक होता. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी केवळ बरोबरी पुरेशी होती.
सामन्यात दोन्ही संघांचा गोलफरक उणे दोन असा समान होता, मात्र ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत तीन गोल केले होते तर भारताला केवळ दोनच गोल करता आले होते. या अधिकच्या गोलसंख्येच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली. दोन्ही संघांनी यापूर्वी 'पूल डी'मधील आपला पहिला सामना चीनविरुद्ध बरोबरीत सोडवला होता. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सकडून दोन गोलने पराभूत होण्यापूर्वी भारतीय संघाने शानदार खेळ केला होता, मात्र शनिवारी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध भारतीय खेळाडू लयीत दिसले नाहीत.
सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंना अनेक संधी मिळाल्या, परंतु त्यांना मिळालेला चेंडूचा ताबा कायम राखता आला नाही. मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी शेवटच्या पाच मिनिटांत गोलकीपर बिचू देवीला मैदानाबाहेर काढून अतिरिक्त मैदानी खेळाडू उतरवण्याचा धोका पत्करला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १५ मिनिटांत वर्चस्व राखले होते. सामन्याच्या दुसऱ्या मिनिटालाच ऑस्ट्रेलियाने गोल नोंदवला होता, परंतु भारताने 'रेफरल' घेतल्याने व्हिडिओ अंपायरने तो गोल धोकादायक ठरवत रद्द केला.
सामन्याच्या दहाव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या एमी लॉटन हिचा रिव्हर्स शॉट अनुभवी गोलकीपर सविता हिने उत्कृष्टपणे रोखला. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु तो भारतीय बचावफळीने निष्प्रभ केला. यादरम्यान मध्यफळीतील इशिका आणि लालरेमसियामी दुखापतग्रस्त झाल्या. अखेरीस भारताच्या पदरी निराशा पडली.
५१ वर्षांचा दुष्काळ कायम
तब्बल ५१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ मैदानात उतरला होता. मात्र त्यांना उपांत्य फेरीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला. भारताने एकमेव विश्वचषक १९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली क्वालालंपूर येथे पाकिस्तानचा पराभव करून जिंकला होता. त्यापूर्वी भारताने १९७१मध्ये कांस्य आणि १९७३मध्ये रौप्यपदक पटकावले होते. मुख्य म्हणजे भारताचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हरमनप्रीतला अजित यांच्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी होती. अजित यांनी दुसऱ्या प्रयत्नात म्हणजेच १९७५मध्ये विश्वचषक उंचावला. त्यानंतर सलग दोन विश्वचषकांत (२०२३, २०२६) भारताचे नेतृत्व करणारा हरमनप्रीत हा दुसराच कर्णधार ठरला. दुसरीकडे भारतीय महिला संघाने १९७४च्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून चौथा क्रमांक पटकावला होता. हीच भारताची विश्वचषकातील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारताची कामगिरी खालावली.