कबड्डीत भारतच आशियाचा राजा! सलग तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद

अंतिम फेरीत झुंजार वृत्तीच्या इराणवर ४२-३२ अशी मात
कबड्डीत भारतच आशियाचा राजा! सलग तिसऱ्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद
Published on

नवी दिल्ली : भारतीय पुरुष संघाने त्यांना कबड्डीतील महासत्ता म्हणून का ओळखले जाते, हे शुक्रवारी पुन्हा एकदा सिद्ध केले. आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने झुंजार इराणवर ४२-३२ असे वर्चस्व गाजवून सलग तिसऱ्यांदा आणि एकंदर आठव्यांदा जेतेपदावर नाव कोरले.

दक्षिण कोरिया येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम लढतीत पवन सेहरावतने कर्णधाराला साजेशी कामगिरी करताना भारतासाठी चढायांमध्ये सर्वाधिक १० गुण मिळवले. मुख्य म्हणजे सुरुवातीच्या पाच मिनिटांत भारतीय संघ ५ गुणांनी पिछाडीवर होता. मात्र तरीही भारताने मध्यंतराला २३-११ अशी आघाडी मिळवली आणि अखेरीस १० गुणांच्या फरकाने विजयही मिळवला. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारनेसुद्धा आक्रमणात छाप पाडली. इराणचा कर्णधार मोहम्मद चिनाये याने संघाच्या विजयीसाठी अथक प्रयत्न केले. मात्र त्याला संघातील अन्य खेळाडूंची अपेक्षित साथ लाभली नाही.

भारताने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रम केला. गुरुवारी साखळी सामन्यातसुद्धा त्यांनी इराणवर ३३-२८ अशी सरशी साधली होती. तर शुक्रवारी सकाळी हाँगकाँगचा भारताने ६४-२० असा धुव्वा उडवून गटात अग्रस्थान मिळवले. भारताने पाचही लढती जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. भारत, इराण, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि चायनीज तैपई अशा सहा देशांत ही स्पर्धा खेळवण्यात आली. २००५ व २०१७मध्ये झालेल्या यापूर्वीच्या दोन हंगामातसुद्धा भारतानेच जेतेपद मिळवले होते.

आता २३ सप्टेंबरपासून चीनमध्ये सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची खरी कसोटी असेल. २०१८मध्ये झालेल्या अखेरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने भारताला उपांत्य फेरीत नमवले आणि त्यानंतर सुवर्णपदकही जिंकण्याची किमया साधली.

८ भारताने एकंदर आठव्यांदा आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. यंदा या स्पर्धेचे ११वे पर्व होते. भारताने १९८०, १९८८, २०००, २००१, २००२, २००५, २०१७, २०२३ या आठ वर्षांत ही स्पर्धा जिंकली.

logo
marathi.freepressjournal.in