'सुपर ओव्हर'च्या दुहेरी थरारात भारत सरस; अफगाणस्तानविरुद्धच्या मालिकेत ३-० असे यश

कर्णधार रोहित शर्माने ६९ चेंडूंत नाबाद १२१ धावांची तुफानी खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
'सुपर ओव्हर'च्या दुहेरी थरारात भारत सरस; अफगाणस्तानविरुद्धच्या मालिकेत ३-० असे यश

बंगळुरू : क्षणाक्षणाचा उत्कंठा ‌वाढवणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने अफगाणिस्तानवर १० धावांनी सरशी साधली. कर्णधार रोहित शर्माने ६९ चेंडूंत नाबाद १२१ धावांची तुफानी खेळी साकारून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईने १२ धावांचा यशस्वी बचाव करताना फक्त १ धाव देत दोन बळी पटकावले.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. तसेच भारताचा कर्णधार म्हणून रोहितने ४२वा सामना जिंकण्याचा पराक्रम केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ४ बाद २१२ धावांचा डोंगर उभारला. ४ बाद २२ वरून रोहित व रिंकू सिंग यांनी पाचव्या विकेटसाठी तब्बल १९० धावांची भागीदारी रचली. रोहितने टी-२० कारकीर्दीतील पाचवे शतक साकारले. रोहितने ११ चौकार व ८ षटकारांची आतषबाजी केली. रिंकूने ३९ चेंडूंत ६९ धावा फटकावताना २ चौकार व ६ षटकार लगावले.

लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्ताननेसुद्धा बरोबर २० षटकांत ६ बाद २१२ धावा केल्या. गुलाबदीन नईबने २३ चेंडूंतच नाबाद ५५ धावा फटकावल्या. तसेच इब्राहिम झादरान व रहमनुल्ला गुरबाझ यांनी प्रत्येकी ५० धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना नईबला दोनच धावा घेता आल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत लांबला.

पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने १६ धावा केल्या. मात्र रोहितने लगावलेल्या दोन षटकारांमुळे लढत १ चेंडू २ धावा अशा वळणावर आली. तेव्हा यशस्वी जैस्वालला एकच धाव घेता आल्याने सामना दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला. तेथे रोहितने पुन्हा पहिल्या दोन चेंडूवर १० धावा वसूल केल्या. मात्र त्यानंतर रिंकू व रोहित बाद झाल्याने अफगाणिस्तानपुढे १२ धावांचे लक्ष्य उभे ठाकले. बिश्नोईने मग मोहम्मद नबी व गुरबाझ यांना तीन चेंडूंतच बाद करून भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले.

भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-२० सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत रोहितने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. धोनीने ४१ सामने जिंकले होते. रोहितने मात्र ५४ लढतींमध्ये ४२ सामने जिंकले.

१२१

रोहित शर्मा

६९ चेंडू

११ चौकार

८ षटकार

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in