कोलंबो : अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या मॅरेथॉन खेळीसह दुनीथ वेल्लेलेजने शानदार गोलंदाजी करत बुधवारी टीम इंडियाला दारूण पराभवाचा धक्का दिला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यातील विजयामुळे श्रीलंकेने २-० ने मालिका खिशात घातली. १९९७ नंतर म्हणजेच तब्बल २७ वर्षांनी टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम चारीथ असलंकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेच्या संघाने केला.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या भारताची दुनीथ वेल्लेलेज समोर घसरगुंडी झाली. कर्णधार रोहित शर्माने ३५ धावा जमवत थोडा फार प्रतिकार केला. मात्र भारताच्या अन्य फलंदाजांनी अगदीच निराशा केली. संघाला लागलेली गळती शेवटपर्यंत रोखता आली नाही. तळात वॉशिंग्टन सुंदरने ३० धावांची भर घालत पराभवाचे अंतर थोडे फार कमी केले. २६.१ षटकांत अवघ्या १३८ धावांवर भारताचा संघ गारद झाला. दुनीथ वेल्लेलेजने भारताच्या ५ फलंदाजांना माघारी धाडले.
कोलंबोच्या संथ खेळपट्टीवर यजमानांनी सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो या सलामीच्या जोडगोळीने संयमी फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांची परिक्षा घेतली. धावसंख्येचा वेग काहीसा कमी असला तरी त्यांनी विकेट विचविण्यावर भर दिला. या जोडीने श्रीलंकेला ८९ धावांची सलामी भागीदारी करून दिली. त्यानंतर अविष्का फर्नांडोने ९६ आणि कुसल मेंडिसने ५९ धावा करत श्रीलंकेला २४८ धावा जमवून दिल्या. भारताच्या रियान परागने ३ विकेट्स मिळवल्या.