मेलबर्नमध्ये भारताची मानहानी; चौथ्या कसोटीत १८४ धावांनी दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-१ अशी आघाडी

२०२४ या वर्षाची विजयाने सांगता करण्यास भारतीय संघ अपयशी ठरला. मेलबर्नच्या महासंग्रामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला मानहानीस सामोरे जावे लागले.
मेलबर्नमध्ये भारताची मानहानी; चौथ्या कसोटीत १८४ धावांनी दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-१ अशी आघाडी
एक्स @ICC
Published on

मेलबर्न : २०२४ या वर्षाची विजयाने सांगता करण्यास भारतीय संघ अपयशी ठरला. मेलबर्नच्या महासंग्रामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताला मानहानीस सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने चौथ्या कसोटीत भारताला १८४ धावांनी धूळ चारून पाच लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. त्यामुळे प्रामुख्याने भारताच्या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याशिवाय जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशांनाही काहीसा धक्का बसला.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या उभय संघांतील या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र भारताचा दुसरा डाव सोमवारी पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रात ७९.१ षटकांत १५५ धावांवर संपुष्टात आला. कर्णधार पॅट कमिन्स कांगारूंच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या डावात ४९, दुसऱ्या डावात ४१ धावा करण्यासह सामन्यात त्याने एकूण ६ बळी मिळवले. त्यामुळे एकवेळ पहिली कसोटी जिंकून आघाडी घेणारा भारतीय संघ आता चार सामन्यानंतर पिछाडीवर पडला आहे. ३ जानेवारीपासून सिडनी येथे पाचवी कसोटी होणार असून ही लढत जिंकून किमान मालिका बरोबरीत सोडवण्याचे भारताचे उद्दीष्ट असेल.

बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत ही मालिका खेळवण्यात येत आहे. कर्णधार रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. मात्र दुसऱ्या लढतीत गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली व ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना १० गडी राखून नेस्तनाबूत केले. त्यानंतर पर्थ येथील तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. त्यामुळे सर्वांचे चौथ्या कसोटीकडे लक्ष लागून होते. मात्र येथेही भारताच्या रथी-महारथींनी दडपणाखाली कच खाल्ली. त्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेत भारताची टक्केवारी आणखी घसरली. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या ६१.४६ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर भारताची टक्केवारी ५२.७८ इतकी आहे. दक्षिण आफ्रिका ६६.६७ टक्क्यांसह अंतिम फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे आता भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी चुरस आहे.

तत्पूर्वी, रविवारच्या ९ बाद २२८ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ८३.४ षटकांत २३४ धावांवर आटोपला. बुमराने नॅथन लायनची चिवट झुंज मोडीत काढताना त्याचा ४१ धावांवर त्रिफळा उडवला. मात्र लायन व स्कॉट बोलंड यांनी अखेरच्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ३३९ धावांपर्यंत नेली. त्यामुळे भारतासमोर ९२ षटकांत ३४० धावांचे लक्ष्य उभे ठाकले. भारतासाठी बुमराने ५, तर मोहम्मद सिराजने ३, तर आकाश दीपने १ बळी मिळवला.

त्यानंतर मग दुसऱ्या डावात भारताचे फलंदाज विजयासाठी जाणार की सामना अनिर्णित राखण्यात समाधान मानणार, याकडे चाहत्यांचे लक्ष होते. रोहित व यशस्वी जैस्वाल या मुंबईकरांच्या सलामी जोडीने मात्र सावध सुरुवात केली. १६ षटकांत त्यांनी २५ धावा केल्या. रोहित यावेळी खेळपट्टीवर स्थिरावला आहे, असे वाटत असतानाच कमिन्सने ९ धावांवर त्याला बाद केले. त्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर के. एल. राहुललाही भोपळा न फोडू देता कमिन्सने माघारी पाठवले. हे कमी म्हणून की काय १० षटकांच्या अंतरात विराट कोहलीसुद्धा अवघ्या ५ धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे भारताची उपहाराला ३ बाद ३३ अशी अवस्था होती.

दुसऱ्या सत्रात मग यशस्वी व ऋषभ पंत यांनी डोलारा सावरला. या दोघांनी दुसऱ्या सत्रात एकही विकेट जाऊ न देता ७९ धावांची भर घातली. २२ वर्षीय यशस्वीने कसोटीतील १०वे अर्धशतक साकारले. तर पंतने नैसर्गिक खेळाच्या विरुद्ध खेळताना १०४ चेंडूंत फक्त ३० धावा केल्या. तिसरे सत्र सुरू झाले तेव्हा, भारताला ३८ षटकांत २२८ धावांची गरज होती. मात्र फिरकीपटू हेडला षटकार लगावण्याच्या प्रयत्नात पंत फसला आणि तेथूनच भारताची घसरगुंडी उडाली. पंत व यशस्वीने चौथ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचली.

४ बाद १२१ धावांवरून यशस्वीला दुसऱ्या बाजूने साथीदाराची गरज होती. परंतु बोलंडने उसळत्या चेंडूवर रवींद्र जडेजाचा (२) अडसर दूर केला. लायनने मग पहिल्या डावातील शतकवीर नितीश रेड्डीला (१) बाद केले. ७१व्या षटकात कमिन्सच्या गोलंदाजीवर यशस्वीला वादग्रस्तरित्या बाद देण्यात आले. यशस्वीच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला आहे की नाही, हे स्निको मीटरमध्ये स्पष्ट होत नव्हते. मात्र रिप्लेमध्ये चेंडूने दिशा बदलल्याने त्याला बाद ठरवण्यात आले. त्यामुळे यशस्वीला आणखी एका शतकाने हुलकावणी दिली.

७ बा १४० अशी अवस्था झाल्यावर भारताला सामना वाचवणे कठीण गेले. वॉशिंग्टुन सुंदर एका बाजूने खिंड लढवत होता. मात्र बोलंडने प्रथम आकाश (७) व नंतर बुमराला (०) माघारी पाठवून भारताला आणखी संकटात टाकले. अखेर ८०व्या षटकात लायनने सिराजला पायचीत पकडले आणि ऑस्ट्रेलियाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. सुंदर ४५ चेंडूंत ५ धावांवर नाबाद राहिला. मात्र दिवसातील शेवटची ११ षटके शिल्लक असतानाच भारताचा संघ १५५ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियासाठी कमिन्स व बोलंड यांनी प्रत्येकी ३, तर लायनने २ बळी मिळवले.

अनुभवी खेळाडूंचे अपयश भारताला महागात : गावस्कर

रोहित व विराट या अनुभवी खेळाडूंचे अपयश भारताला या मालिकेत महागात पडले, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली. “आघाडीच्या फलंदाजांचे अपयश भारताला महागात पडत आहे. त्यातही प्रामुख्याने अनुभवी खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे पाचव्या ते आठव्या क्रमांकावरील फलंदाजांवर अतिरिक्त दडपण येत आहे. तिसऱ्या सत्रात ३४ धावांत ७ बळी गमावणे लज्जास्पद आहे,” असे गावस्कर म्हणाले.

रोहितला या मालिकेत आतापर्यंत एकाही डावात १० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. दुसरीकडे विराटने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातील शतक सोडले, तर सातत्याने ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर संघर्ष केला आहे.

यशस्वीला बाद देण्यावरून विवाद

यशस्वीला ७१व्या षटकात चुकीचे बाद देण्यात आले, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. कमिन्सच्या लेग- साइडकडील चेंडूला टोलवण्याच्या प्रयत्नात यशस्वीच्या ग्लोव्ह्जला चेंडू लागल्याचे जाणवले. मैदानावरील पंचांनी नाबाद ठरवल्यावर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. कारण रिप्लेमध्ये चेंडूने विकेटकीपरकडे जाण्यापूर्वी दिशा बदलल्याचे दिसले. मात्र स्निको मीटरमध्ये चेंडू जेव्हा बॅट अथवा ग्लोव्ह्जच्या जवळून गेला, त्यावेळी काहीही दिसून आले नाही. तसे असतानाही तिसऱ्या पंचांनी यशस्वीला बाद घोषित केले. यानंतर मैदानातील भारतीय चाहत्यांनी ‘चीटर, चीटर’चा नारा पुकारला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १२२.४ षटकांत सर्व बाद ४७४

भारत (पहिला डाव) : ११९.३ षटकांत सर्व बाद ३६९

ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ८३.४ षटकांत सर्व बाद २३४ (मार्नस लबूशेन ७०, नॅथन लायन ४१; जसप्रीत बुमरा ५/५७)

भारत (दुसरा डाव) : ७९.१ षटकांत सर्व बाद १५५ (यशस्वी जैस्वाल ८४, ऋषभ पंत ३०; पॅट कमिन्स ३/२८)

सामनावीर : पॅट कमिन्स

logo
marathi.freepressjournal.in