विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त! युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव

लिम्बानीच्या आत जाणाऱ्या चेंडूने कोन्स्टासच्या यष्ट्यांचा वेध घेतला. त्यानंतर हॅरी डिक्सॉन आणि कर्णधार ह्यू वेबगेन यांनी ऑस्ट्रेलियाची पडझड रोखली.
विश्वविजेतेपदाचे स्वप्न पुन्हा उद्ध्वस्त! युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभव

बेनोनी : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या आणखी एका आयसीसी स्पर्धेेच्या अंतिम फेरीत भारताच्या पदरी निराशा पडली. आयसीसी युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (१९ वर्षांखालील) अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ७९ धावांनी दारुण पराभव केला. याबरोबरच उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. गेल्या ८ महिन्यांच्या कालावधीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिसरा पराभव पत्करावा लागला, हे विशेष. बेनोनी येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २५४ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ ४३.५ षटकांत १७४ धावांत गारद झाला. सलामीवीर आदर्श सिंग (७७ चेंडूंत ४७ धावा), मुरुगन अभिषेक (४६ चेंडूंत ४२) यांच्या व्यतिरिक्त कोणीही प्रतिकार करू शकले नाहीत. मध्यमगती गोलंदाज माहिल बीर्डमनने १५ धावांतच ३ बळी पटकावून सामनावीर पुरस्कार पटकावला. त्याला ऑफस्पिनर रॅफ मॅकमिलनने ३ गडी बाद करून उत्तम साथ दिली. मुंबईकर मुशीर खान (२२), उदय सहारन (८), सचिन धस (९), अर्शीन कुलकर्णी (३) यांनी निराशा केली. गतवर्षी जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही भारताच्या वरिष्ठ संघाला ऑस्ट्रेलियाकडूनच पराभव पत्करावा लागला होता. तत्पूर्वी, भारतीय वेगवान गोलंदाज राज लिम्बानी आणि नमन तिवारी यांनी वेळोवेळी ऑस्ट्रेलियाला हादरे देत ५० षटकांत ७ बाद २५३ धावांवर रोखले. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हरजस सिंगचा (५५) अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी साकारता आली नाही. बेनोनी येथील विलोमूरे पार्कच्या फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाला आश्वासक सुरुवात करता आली नाही. लिम्बानीने तिसऱ्याच षटकांत सॅम कोन्स्टास (०) याला त्रिफळाचीत करत भारताला पहिले यश मिळवून दिले.

लिम्बानीच्या आत जाणाऱ्या चेंडूने कोन्स्टासच्या यष्ट्यांचा वेध घेतला. त्यानंतर हॅरी डिक्सॉन आणि कर्णधार ह्यू वेबगेन यांनी ऑस्ट्रेलियाची पडझड रोखली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी रचली.

डिक्सॉनने नमन तिवारीला एकाच षटकांत दोन चौकार आणि एक षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला होता. या दोघांनी भारताच्या फिरकी गोलंदाजांना चोख उत्तर देत ऑस्ट्रेलियाच्या डावाची पायाभरणी केली. डिक्सॉन आणि वेबगेन यांनी मोठे फटके मारले नसले तरी त्यांनी धावफलक हलता ठेवला. अखेर नमन तिवारीने वेबगेनचा (४८) अडसर दूर केल्यानंतर लगेचच डिक्सॉनलाही (४२) माघारी पाठवले. त्यामुळे ३ बाद ९९ अशा स्थितीतून हरजस सिंग आणि रायन हिक्स (२०) यांनी सहाव्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी रचली. हरजसला पहिल्या पाच धावा काढण्यासाठी २० चेंडूंचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने मात्र तुफान फटकेबाजी करत चौकार, षटकारांची आतषबाजी केली. फिरकीपटू प्रियांशू मोलिया याला षटकार, चौकार लगावल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढत गेला.

-भारताने चौथ्यांदा युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभव पत्करला. यापूर्वी २००६, २०१६, २०२०मध्येही भारतावर अशी वेळ ओढवली होती.

-भारताला तब्बल सहाव्यांदा विश्वचषक उंचावण्याची संधी होती. मात्र त्यांचे स्वप्न भंगले. नवव्यांदा अंतिम फेरीत खेळणाऱ्या भारताने यापूर्वी २०००, २००८, २०१२, २०१८ व २०२२मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

-ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा युवा विश्वचषक उंचावला. यापूर्वी त्यांनी १९८८, २००२ व २०१०मध्ये अशी कामगिरी केली होती. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in