ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच...भारताचे दोन्ही टेबल टेनिस संघ ठरले पात्र

भारताच्या पुरूष आणि महिलांच्या दोन्ही टेबल टेनिस संघांनी सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे तिकीट मिळवले.
ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच...भारताचे दोन्ही टेबल टेनिस संघ ठरले पात्र

नवी दिल्ली : भारताच्या पुरूष आणि महिलांच्या दोन्ही टेबल टेनिस संघांनी सोमवारी पॅरिस ऑलिम्पिक २०२४चे तिकीट मिळवले. जागतिक सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांना उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र क्रमवारीतील स्थानाच्या बळावर भारताच्या दोन्ही संघांनी ऑलिम्पिकचा प्रवेश पक्का केला. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताचे संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

बुसान येथे झालेल्या जागतिक सांघिक स्पर्धेत शरथ कमल, जी. साथियान यांचा समावेश असलेल्या पुरुष संघाला दक्षिण कोरिया, तर मनिका बत्राच्या नेतृत्वाखालील महिला संघाला चायनीज तैपेईकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र पुरुषांचा संघ जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानी आहे, तर महिलांचा संघ क्रमवारीत १३व्या क्रमांकावर आहे.

“ऑलिम्पिक पात्रतेचे अखेरचे सात संघ ठरलेले आहेत. जे संघ क्रमवारीत वरच्या स्थानी आहेत, त्यांचे ऑलिम्पिक तिकीट पक्के झाले आहे,” असे ट्वीट आंतररराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने केले. त्यानंतर भारतीय टेबल टेनिस महासंघानेसुद्धा भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच शरथने ट्वीट करून आनंद व्यक्त केला.

“भारतीय संघ अखेरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. माझे स्वप्न पूर्ण झाले. हे यश नक्कीच संस्मरणीय आहे. माझ्या कारकीर्दीतील ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्धा असेल. महिला संघाचेही अभिनंदन,” असे शरथ म्हणाला. २००८मध्ये टेबल टेनिसचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला. तेव्हापासून भारताचे खेळाडू एकेरी-दुहेरीत खेळत होते. मात्र यंदा प्रथमच भारताचे दोन्ही संघ सांघिक प्रकारातही खेळतील. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे.

२०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने टेबल टेनिसमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे आगामी ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून तशीच दमदार कामगिरी अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in