
महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आपले आव्हान शाबूत राखण्यासाठी भारताला रविवारी स्पेनविरुध्दच्या क्रॉसओव्हर सामन्यात विजय आवश्यक आहे. हा सामना जिंकल्यास उपांत्यपूर्वफेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुध्द लढत द्यावी लागेल.
हे दोन्ही सामने जिंकल्यास भारताला विजेतेपदासाठी उपांत्य आणि अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करावी लागेल. स्पेनविरुध्दची भारताची आकडेवारी भारतीयांसाठी दिलासादायक आहे. स्पेनविरुध्दच्या १७ पैकी सात सामने भारताने जिंकले आहेत. स्पेनने पाच सामन्यात विजय मिळविला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेत १६ संघांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. अत्यंत अटीतटीने लढल्या गेलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ३-४ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ‘टॉप-एट’मध्ये प्रवेशाची म्हणजेच थेट उपांत्यपूर्व फेरीची भारताची अपेक्षा पुरती मावळली होती.