न्यूझीलंडची वारी आजपासून! टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज; वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान

एकीकडे भारतात नवरात्रोत्सव संपलेला असतानाच भारतीय संघ गुरुवारपासून न्यूझीलंडच्या वारीला प्रारंभ करणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंडची वारी आजपासून! टी-२० मालिकेसाठी भारत सज्ज; वातावरणाशी जुळवून घेण्याचे आव्हान
Published on: 

ख्राइस्टचर्च : एकीकडे भारतात नवरात्रोत्सव संपलेला असतानाच भारतीय संघ गुरुवारपासून न्यूझीलंडच्या वारीला प्रारंभ करणार आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे मुंबईकर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळताना यंदादेखील भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

या दौऱ्यात न्यूझीलंडमधील खेळपट्टी, वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान भारतापुढे असेल. भारताला या मालिकेपूर्वी फारशी विश्रांती मिळालेली नाही. १७ ऑक्टोबर रोजी भारतात विंडीजविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळल्यानंतर २ दिवसांपूर्वीच भारतीय संघ न्यूझीलंडला दाखल झाला. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. प्रवासाचा थकवा झटकून यजमानांना नमवण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर असेल. भारताचा २०२२ मधील न्यूझीलंड दौरा पावसामुळे प्रभावित झाला होता. नेपियर येथे झालेला सामना डकवर्थ-लुईस पद्धतीने बरोबरीत सुटला होता. मात्र, पावसाचा अडथळा न आलेला एकमेव सामना जिंकत भारताने मालिका आपल्या नावावर केली होती.

भारतीय संघातील फलंदाजांपैकी केवळ श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनाच न्यूझीलंडमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि अवघ्या १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्याकडे आक्रमक फलंदाजीची क्षमता असली, तरी न्यूझीलंडमधील वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. ते पहिल्यांदाच न्यूझीलंड दौऱ्यावर आले आहेत.

आयर्लंड आणि इंग्लंडमधील दौऱ्यांत सलग पराभवांनी सुरुवात झाल्यानंतर अय्यरसमोर परदेशातील नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. अलीकडेच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले, तर वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. आमचा संघ वेगवेगळ्या हवामानात खेळण्यास सवयीचा असल्याचा विश्वास कर्णधार अय्यरने सामन्यापूर्वी व्यक्त केला.

२०२२च्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे यावेळी संघाचा भाग नाही. तसेच वेगवान गोलंदाजीचा शिलेदार जसप्रीत बुमरा या दौऱ्यात केवळ कसोटी सामने खेळणार आहे. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्धच्या घरगुती मालिकेत अभिषेक आणि सॅमसन यांनी दाखवून दिल्याप्रमाणे भारतीय फलंदाजी बळकट आहे. कर्णधार अय्यरच्या मते, संघाच्या गोलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे.

दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच या दौऱ्याचा शुभारंभ थाटात होईल. बुधवारी भारतीय खेळाडूंचे न्यूझीलंडमधील विशिष्ट पारंपरिक पद्धतीत स्वागतही करण्यात आले. सरावात भारतीय खेळाडूंनी कसून मेहनत केली. आता विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यानंतर न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा सलग तिसरा भारतीय कर्णधार ठरण्याची संधी श्रेयसकडे आहे.

भुवनेश्वरकडे नजरा; वैभवची पुन्हा प्रतीक्षा

भारताला अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि प्रमुख वेगवान गोलंदाज बुमरा यांची उणीव जाणवू शकते. दुखापतीमुळे हार्दिक मालिकेत खेळणार नाही, तर बुमराह केवळ कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे जवळपास चार वर्षांनंतर पुनरागमन करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध बेंगळुरू येथे झालेल्या पाचव्या टी-२० सामन्यासाठीदेखील भुवनेश्वर भारतीय संघात होता. मात्र पावसामुळे ही लढत भारताची प्रथम फलंदाजी सुरू असतानाच रद्द करण्यात आली. भुवनेश्वरने यापूर्वी २०२२ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्धच शेवटचा टी-२० सामना खेळला होता. त्यामुळे आता या दौऱ्यात त्याची कामगिरी निर्णायक ठरेल. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचे संघात येणे भारतासाठी दिलासादायक आहे. फलंदाजीत भारतीय संघ संजू सॅमसन व अभिषेक शर्मा याच जोडीसह मैदानात उतरेल, हे पक्के आहे. अशा स्थितीत या दौऱ्यातदेखील वैभव सूर्यवंशीला प्रतीक्षा करावी लागू शकते. श्रेयस, तिलक, किशनवर मधली फळी अवलंबून असेल.

सँटनर, मिचेल किवींची ताकद

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरला भारताच्या आक्रमक फलंदाजीची जाणीव आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना मदत करणाऱ्या सपाट खेळपट्ट्या देणे योग्य ठरणार नाही, असे त्याचे मत आहे. ग्लेन फिलिप्स आणि फिन ॲलन यांच्याकडून त्याला मोठ्या खेळींची अपेक्षा असेल. दुखापतीमुळे रचिन रवींद्र मालिकेतून बाहेर झाल्याने अनुभवी डेवॉन कॉन्वेला वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळू शकते. डॅरेल मिचेल भारतासाठी पुन्हा डोकेदुखी ठरू शकतो. गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन, कायले जेमिसन व मॅट हेन्रीवर किवींची भिस्त आहे. तसेच फिरकी विभागात सँटनरसह ब्रेसवेलही योगदान देऊ शकतो. भारतीय फलंदाजीविरुद्ध न्यूझीलंडचे गोलंदाज यांच्यातील द्वंद्व पाहण्यास मजा येईल.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मिचेल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, बेव्हन जेकब्स, कायले जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, नॅथन स्मिथ, ब्लेर टिकनर.

वेळ : दुपारी १२.३० वाजता; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लाइव्ह ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in