मालिका विजयाची आज संधी; भारताचा वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना; वैभवकडे पुन्हा नजरा

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टी-२० संघाला मंगळवारी विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना वेलिंग्टन येथे रंगणार असून भारताने पहिल्या दोन्ही लढती जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
मालिका विजयाची आज संधी; भारताचा वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना; वैभवकडे पुन्हा नजरा
मालिका विजयाची आज संधी; भारताचा वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा सामना; वैभवकडे पुन्हा नजराX|BCCI
Published on: 

वेलिंग्टन : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय टी-२० संघाला मंगळवारी विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना वेलिंग्टन येथे रंगणार असून भारताने पहिल्या दोन्ही लढती जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. इशान किशन या लढतीसही मुकणार असल्याने वैभव सूर्यवंशीसह सर्व फलंदाजांच्या कामगिरीवर नजरा असतील.

एकीकडे भारतात नवरात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर आता दिवाळीचे वेध लागले असतानाच तिकडे भारतीय संघाच्या न्यूझीलंड वारीला २२ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. न्यूझीलंडमधील मागील दोन टी-२० मालिकांमध्ये भारत अपराजित आहे. त्यामुळे अय्यरच्या नेतृत्वात खेळताना यंदादेखील भारत त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. या दौऱ्यात न्यूझीलंडमधील खेळपट्टी, वातावरणाशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान भारतापुढे असेल. भारताला या मालिकेपूर्वी फारशी विश्रांती मिळालेली नाही. १७ ऑक्टोबर रोजी भारतात विंडीजविरुद्ध पाचवा टी-२० सामना खेळल्यानंतर २ दिवसांपूर्वीच भारतीय संघ न्यूझीलंडला दाखल झाला. या दौऱ्यात ५ टी-२०, ५ एकदिवसीय व २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. आतापर्यंतच्या दोन्ही लढतींमध्ये भारताने अनुक्रमे ४ गडी राखून विजय मिळवताना अनुक्रमे २२६ व १८१ धावांचे लक्ष्य गाठले. संजू सॅमसन, तिलक वर्मा, नमन धीर हे खेळाडू भारताच्या विजयाचे प्रामुख्याने शिल्पकार ठरले आहेत.

दरम्यान, आयर्लंड आणि इंग्लंडमधील दौऱ्यांत पराभवांनी सुरुवात झाल्यानंतर अय्यरसमोर परदेशातील नेतृत्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे. अलीकडेच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले, तर वेस्ट इंडिजविरुद्धची मायदेशातील मालिका २-२ अशी बरोबरीत संपली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. २०२२च्या दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करणारा हार्दिक यावेळी संघाचा भाग नाही. तसेच वेगवान गोलंदाजीचा शिलेदार जसप्रीत बुमरा या दौऱ्यात केवळ कसोटी सामने खेळणार आहे.

दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच या दौऱ्याचे महत्त्व वाढले आहे. आता विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यानंतर न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा सलग तिसरा भारतीय कर्णधार ठरण्याची संधी अय्यरकडे आहे.

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहिल्या दोन सामन्यांमध्ये मधल्या फळीत तिलक वर्मा, नमन धीर आणि नितीश रेड्डी यांचा केलेला वापर यशस्वी ठरला आहे. मात्र, गोलंदाजी विभागात अजूनही काही त्रुटी दूर करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर कायम आहे. त्यामुळे वैभवसह भुवनेश्वर कुमारच्या कामगिरीकडेही लक्ष असेल.

बुधवारी बेसिन रिझर्व्ह येथे होणाऱ्या लढतीवर काहीसे पावसाचे सावट असेल. मात्र लढत पूर्णपणे रद्द होणार नाही. तसेच वारे जोरदार वाहत असल्याने वेगवान गोलंदाजांना सहाय्य लाभू शकते. ख्राईस्टचर्चच्या तुलनेत येथील मैदान आकाराने लहान आहे. त्यामुळे चौकार-षटकारांचा वर्षावही पाहायला मिळू शकतो. एकूणच तिसरी लढत रंगतदार होऊ शकते.

विराट कोहली, हार्दिक पंड्या यांच्यानंतर न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका जिंकणारा सलग तिसरा भारतीय कर्णधार ठरण्याची संधी अय्यरकडे आहे.

न्यूझीलंडसाठी आता ‘करो या मरो’

मिचेल सँटनरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या यजमान न्यूझीलंड संघासाठी ही लढत ‘करो या मरो’ अशा स्वरूपाची असेल. न्यूझीलंडच्या फिन, टिम सेईफर्ट आणि डॅरेल मिचेल या आघाडीच्या फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मालिका जशी पुढे जात आहे तशी त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. ग्लेन फिलिप्सने दोन अर्धशतके झळकावून आणि मागील सामन्यात बेव्हन जेकॉब्सने महत्त्वाची कामगिरी बजावून संघाचा भार सांभाळला आहे. न्यूझीलंडने कार्यभार व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेन्री यांना विश्रांती दिली असून मॅट फिशर आणि ब्लेअर टिकनर यांचा समावेश करण्यात आला आहे.

तिलक, सॅमसनवर फलंदाजीत भिस्त

भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये १३ खेळाडूंना संधी दिली आहे. इशान किशन दुखापतग्रस्त झाल्यामुळे वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळाले, तर दुसऱ्या सामन्यात मयांक यादवच्या जागी डेथ ओव्हर्सचा तज्ज्ञ प्रिन्स यादवला संधी देण्यात आली. थंड आणि वाऱ्याच्या वातावरणात संध्याकाळी होणारा सामना सरळ फटके मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या तंत्राची परीक्षा घेणारा ठरेल. किशन तिसऱ्या लढतीसही मुकणार असल्याने तृतीय क्रमांकावर येणाऱ्या वैभवकडे लक्ष असेल. सॅमसन व तिलक यांच्यावर भारताची फलंदाजी अवलंबून आहे.

भुवनेश्वरवर कामगिरी उंचावण्याचे दडपण

अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुनरागमन केल्यानंतर फारशी चमक दाखवता आलेली नाही. पहिल्या लढतीत त्याने ४९ धावा लुटल्या, तर दुसऱ्या सामन्यात ५० धावा देत १ बळी मिळवला. बेसिन रिझर्व्हमधील हवेचा प्रवाह भुवनेश्वरच्या कौशल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याला अर्शदीप सिंगची भक्कम साथ लाभेल. फिरकी विभागात अक्षर पटेलवर मदार असेल. नितीश रेड्डीने गोलंदाजीत संमिश्र योगदान दिले आहे. प्रिन्स यादव किंवा मयांक यादवपैकी यावेळी कुणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल. शिवम दुबेला मात्र आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते.

प्रतिस्पर्धी संघ

भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव, नमन धीर, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ॲलन, मायकेल ब्रेसवेल, जोश क्लार्कसन, डेवॉन कॉन्वे, जेकब डफी, बेव्हन जेकब्स, कायले जेमिसन, ॲडम मिल्ने, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, नॅथन स्मिथ, ब्लेर टिकनर, मॅट फिशर.

वेळ : दुपारी १२.३० वाजता ; थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३ वाहिनी आणि सोनी लिव्ह ॲप

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in